
“अवचट यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले”
ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झालं. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनिल अवचट यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
अनिल अवचट यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट द्वारे अनिल अवचट यांना श्रध्दांजली वाहली. शरद पवार यांनी ट्वीट केले, “ ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत, पत्रकार डॉ. अनिल अवचट यांच्या निधनाने डोळसपणे सामाजिक क्षेत्रात योगदान देणारे हळवे-सहृदयी व्यक्तिमत्व हरपले.मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी केलेले भरीव कार्य तळागाळातील अनेकांसाठी नव्या आयुष्याची सुरुवात ठरले. शोकाकुल अवचट कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. दिवंगत अनिल अवचट यांना भावपूर्ण श्रद्धांजली!”
हेही वाचा: Corona : कोरोनाचा नवा व्हेरिअंट ओमीक्रॉनपेक्षा अधिक वेगाने पसरणार
पृथ्वीराज चव्हाण यांनी सुध्दा अनिल अवचट यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. ट्वीटद्वारे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “महाराष्ट्राला व्यसनमुक्तीच्या मार्गावर नेणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकार अनिल अवचट यांच्या निधनाची बातमी दु:खद आहे. साहित्यिक, शिल्पकार, संगीताची आवड आणि सामाजिक जाणीव असणारे एक बहुआयामी आणि व्यासंगी व्यक्तीमत्व आज आपल्यातून गेले. भावपूर्ण श्रद्धांजली!!”
पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ अनिल अवचट यांच्या निधनावर म्हणाले, "प्रसिध्द आणि संवेदनशील लेखक, समाजसेवक डॉ. अनिल अवचट यांचे निधन पुण्याच्या सामाजिक-साहित्यिक विश्वात मोठी पोकळी निर्माण करणारे आहे. आधी पत्रकार, मग लेखक आणि त्यानंतर सामाजिक कार्यकार्यात त्यांनी स्वतःला झोकून देणे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे"
राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे, मंत्री जितेंद्र आव्हाड असे अनेकांनी अनिल अवचट यांना श्रध्दांजली वाहली.
Web Title: Anil Avchat Death Condolences From Sharad Pawar And So Many Others
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..