

food and drugs action
solapur
तात्या लांडगे
सोलापूर : भेसळयुक्त अन्नपदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेला पाठविल्यानंतर पुढील कारवाईसाठी १४ दिवसांत अहवाल अपेक्षित असतो. मात्र, २५ मेपासून कारवायांत वाढ झाल्याने अन्न पदार्थांच्या नमुन्यांमुळे राज्यातील सर्व लॅब (प्रयोगशाळा) हाऊसफुल्ल झाल्या आहेत. प्रयोगशाळांची संख्या अत्यल्प असल्याने यापूर्वी देखील ८० ते ९० दिवसांनी संशयित अन्नपदार्थाचा अहवाल येत होता. आता नमुन्यांची संख्या वाढल्याने त्यात आणखी ३० ते ४० दिवसांचा विलंब लागणार असल्याचे अधिकारी सांगत आहेत.
राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाली आणि राज्यभरात भेसळयुक्त पदार्थांवरील कारवाई वाढली. संशयित दुकाने, व्यवसायांवर छापे टाकून तेथील खाद्यपदार्थांचे नमुने संकलित करून प्रयोगशाळेला पाठविले जात आहेत. सोलापूरसह राज्यातील सर्व जिल्ह्यातून दररोज अन्नपदार्थांचे सरासरी १०० नमुने प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले जात आहेत. यापूर्वी, हे प्रमाण सरासरी २० ते ३० पर्यंत होते.
दरम्यान, संबंधित दुकानदार, व्यावसायिकांवर पुढील कायदेशीर कारवाई करण्यासाठी आणि त्या अन्नपदार्थांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका होऊ शकतो का? हे समजण्यासाठी अन्नाच्या नमुन्यांचा प्रयोगशाळेकडील अहवाल आवश्यक असतो. मात्र, अहवालच तीन ते चार महिन्यांनी येत असल्याने कारवाई केलेला अन्नपदार्थ भेसळयुक्त की खराब दर्जाचा आहे का? हे समजायला विलंब लागत असल्याची खंत अधिकारीच व्यक्त करीत आहेत.
सोलापुरात प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी प्रयत्न
१ एप्रिल त १४ जूनपर्यंत २०२६ या काळात १५७ अन्नपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीकरिता पाठविले आहेत. त्यातील १४९ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत. सोलापूरसह राज्यभरात अशीच स्थिती आहे. अन्न पदार्थांच्या नमुन्यांचा अहवाल तात्काळ उपलब्ध व्हावा, यासाठी सोलापूर शहरात प्रयोगशाळा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी महापालिकेकडे जागा मागितली असून त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- साहेबराव देसाई, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, सोलापूर
सोलापुरातील घेतलेले नमुने अन् अहवाल
(२०२५-२६)
घेतलेले नमुने
८०१
प्रमाणित
४५१
कमी दर्जाचे अन्न
२३
मिथ्याछाप (बनावट लेबल)
५
असुरक्षित
२५
अहवाल प्रलंबित
२९७
-----------------------------------------------------------------------
(२०२६-२७)
घेतलेले नमुने
१७७
प्रमाणित
८
कमी दर्जाचे अन्न
--
मिथ्याछाप
--
असुरक्षित
--
अहवाल प्रलंबित
१६८
४६५ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित
राज्यात मुंबई, नागपूर व छत्रपती संभाजीनगर येथे अन्न व औषध प्रशासनाच्या विभागीय प्रयोगशाळा आहेत. पण, या तिन्ही प्रयोगशाळांमध्ये सध्या अन्नपदार्थांच्या नमुन्यांचे ढीग लागले आहेत. सोलापूरच्या अधिकाऱ्यांनी मागच्या वर्षी मुंबईतील लॅबकडे पाठविलेल्या ८०१ नमुन्यांपैकी २९७ नमुन्यांचे अहवाल अजूनपर्यंत आलेले नाहीत. या वर्षी एप्रिल ते जून या अडीच महिन्यांत पाठविलेल्या १७७ पैकी १६८ नमुन्यांचे अहवाल देखील अद्याप प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर आता पुण्यात देखील प्रयोगशाळा उभारली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.