पोलिस भरतीची मोठी बातमी! एका जागेसाठी 102 उमेदवार; जागा 17,471 अन्‌ अर्ज 17.76 लाख; 20 मेनंतर मैदानी चाचणी; उन्हामुळे सकाळीच होणार मैदानी चाचणी

राज्यात १७ हजार ४७१ पदांसाठी पोलिस भरती होत असून, त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलला संपली. राज्यातील तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार एका पदासाठी १०२ उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे.
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणी
पोलिस भरतीसाठी प्रथम मैदानी चाचणीSakal

सोलापूर : राज्यात १७ हजार ४७१ पदांसाठी पोलिस भरती होत असून, त्यासाठी अर्ज करण्याची मुदत १५ एप्रिलला संपली. राज्यातील तब्बल १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केले आहेत. त्यानुसार एका पदासाठी १०२ उमेदवार भरतीच्या रिंगणात असतील हे स्पष्ट झाले आहे.

पोलिस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी होणार आहे. त्यात १०० मीटर व १६०० मीटर धावणे (महिलांसाठी ८०० मीटर) आणि गोळाफेक असे प्रकार घेतले जातील. मैदानी चाचणीत उमेदवारास किमान ४० टक्के गुण घेणे बंधनकारक आहे. मैदानी चाचणीनंतर एका पदासाठी १० उमेदवार लेखी परीक्षेसाठी निवडले जातील. १०० गुणांच्या लेखी परीक्षेत किमान ४० टक्के गुण अपेक्षित आहेत.

मैदानी व लेखी चाचणीचे गुण एकत्रित केले जाणार असून, त्या दोन्ही चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण मिळविलेल्यांची मेरिट यादी प्रसिद्ध होईल. त्यानुसार पोलिस शिपायांची निवड होणार असून, चालक पोलिस शिपाई पदासाठी स्वतंत्रपणे वाहतुकीसंदर्भातील चाचणी उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिस अधिकारी- कर्मचारी बंदोबस्तावर आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान २० मे रोजी संपेल आणि त्यानंतर मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन असल्याची माहिती गृह विभागाच्या प्रशिक्षण व खास पथके विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

उन्हामुळे सकाळी ४ तासच मैदानी चाचणी

सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर २० मेनंतर मैदानी चाचणीला सुरवात करण्याचे नियोजन गृह विभागाने केले आहे. सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून अनेक जिल्ह्यांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षाही जास्त आहे. या पार्श्वभूमीवर दररोज सकाळी सहा ते १० या चार तासांतच मैदानी चाचणी घेतली जाणार आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यांत पोलिस भरतीची लेखी परीक्षा एकाच वेळी होणार आहे. साधारणत: ३० ऑगस्टपूर्वी भरती प्रक्रिया संपविण्याचे नियोजन असून, ऑक्टोबरअखेर या भरतीत निवड झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होईल.

भरती अर्जातून ७१ कोटींचे शुल्क जमा

पोलिस भरतीसाठी अर्ज करताना खुल्या प्रवर्गासाठी ४५० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ३५० रुपयांचे शुल्क होते. सध्याच्या पोलिस भरतीसाठी राज्यभरातील १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यात काही उमेदवारांनी दोन-तीन अर्ज केल्याचीही उदाहरणे आहेत. अर्जाच्या शुल्कातून अंदाजे ७१ कोटी रुपये शासनाकडे जमा झाले आहेत.

पोलिस भरतीसंदर्भात ठळक बाबी...

  • एकूण जागा

  • १७,४७१

  • उमेदवारांचे अर्ज

  • १७,७६,०००

  • अर्जातून जमा शुल्क

  • ७१.०४ कोटी

  • मैदानी चाचणीचा वेळ

  • सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com