भाजप खासदार डॉ. महास्वामींच्या १०८ वर्षांपूर्वीच्या जात नोंदीची फॉरेन्सिक लॅबकडून होणार पडताळणी; जात पडताळणी समितीचे निर्देश; तहसीलदार म्हणाले...

नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार संधी देणे आवश्यक असल्याने अक्कलकोट तहसीलदारांनी गौडगाव (बु) येथील १९१५ मधील जन्म-मृत्यू नोंदवहीतील शाई व अक्षरबदलाची तपासणी महाराष्ट्राबाहेरील न्यायवैद्यक प्रयोगशाळेमार्फत करण्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मान्यता दिली आहे.
MP Dr. Jayasiddheshwar Shivacharya Mahaswami
MP Dr. Jayasiddheshwar Shivacharya Mahaswamiesakal

सोलापूर : खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामींच्या जन्म नोंदणीबाबत याचिकाकर्त्यांना शंका असल्याने त्याची सत्यता पडताळणी जरुरी आहे. केवळ प्रकरणाच्या निर्णयास विलंब होतोय म्हणून पडताळणीची संधी नाकारणे योग्य नाही. नैसर्गिक न्याय तत्त्वानुसार संधी देणे आवश्यक असल्याने अक्कलकोट तहसीलदारांनी गौडगाव (बु.) येथील १९१५ मधील जन्म-मृत्यू नोंदवहीतील शाई व अक्षरबदलाची तपासणी महाराष्ट्राबाहेरील न्यायवैद्यक प्रयोगशाळेमार्फत करण्यास जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मान्यता दिली आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी निवडणुकीवेळी बनावट जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी प्रमोद गायकवाड, मिलिंद मुळे, विनायक कंदकुरे यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी खासदार डॉ. महास्वामी यांच्याकडील जात प्रमाणपत्र बनावट असल्याचा निकाल समितीने यापूर्वीच दिला आहे. पण, आपल्याला कागदपत्रे सादर करायला व म्हणणे मांडायला पुरेसा वेळ दिला नसल्याने खासदारांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर ५ जुलै २०२३ रोजी उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सहा महिन्यात फेर पडताळणी करून त्याचा अहवाल सादर करावा, असे आदेश दिले. त्यानुसार समितीने दक्षता पथकाची नेमणूक केली.

आता या प्रकरणावरील सुनावणीला सुरवात झाली आहे. दरम्यान, खासदार डॉ. महास्वामी यांनी २२ डिसेंबर रोजी वकिलांमार्फत एक अर्ज केला होता. वडिलांचे जन्म-मृत्यू नोंदीचे १९१५मधील रजिस्टर पडताळणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवून तपासणी करावी असे त्यात म्हटले आहे. या अर्जाला तक्रारदारांनी आक्षेप घेतला, पण समितीने तहसीलदारांनी राज्याबाहेरील प्रयोगशाळेतून त्या नोंदीची तपासणी करून अहवाल सादर करावा, असे निर्देश दिले आहेत. यासंदर्भात अक्कलकोट तहसीलदारांना विचारले असता ते म्हणाले, ‘वरिष्ठांशी चर्चा करून नोंद तपासणीसाठी कागदपत्र कोणत्या राज्यात पाठवायची याचा निर्णय घेतला जाईल.’ ही तपासणी किती दिवसांत होईल हेही स्पष्टपणे सांगितले जात नाही.

दक्षता पथकाचे दोन्ही सदस्य रजेवर

खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या जात प्रमाणपत्रासंबंधीची चौकशी यापूर्वीच दक्षता पथकाद्वारे झाली आहे. पण, आता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पुन्हा एकदा या प्रकरणाची पडताळणी केली जात आहे. त्यासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने काही महिन्यांपूर्वी दक्षता पथक नेमले आहे. त्यांचा अहवाल अजून तयार झालेला नाही. दरम्यान, काही दिवसांपासून त्यांच्या वैयक्तिक कारणांमुळे पथकातील दोन्ही सदस्य रजेवर असल्याचे समितीतील विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. दक्षता पथकाचा अहवाल आणि १९१५मधील खासदारांच्या वडिलांच्या जन्म-मृत्यू नोंदीची न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून तपासणी झाल्यावर त्याचा अहवाल येणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असेही समितीतील वरिष्ठ सूत्रांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com