शिवसेना, काँग्रेसच्या आमदारांना भाजपकडून 'ऑफर'?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2019

भाजपने शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राहिलेले आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

मुंबई : महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच आणखी वाढत चालला असताना, भाजपकडून आमदार फोडाफोडीचा प्रयत्न सुरू असल्याचे आरोप होत आहे. भाजपने शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राहिलेले आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. तर काँग्रेसचे इगतपुरीचे आमदारा हिरामन खोसकर यांनीही आपल्यासाठी मुंबईतून 'मध्यस्थी' केली जात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडालीय. 

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामन खोसकर यांनी एका वृत्त वाहिनीला माहिती देताना, आपल्यासाठी मध्यस्थीचा प्रयत्न झाल्याचे सांगितले. ते म्हणाले, 'काही कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारचा प्रयत्न झाला. मुंबईतून या संदर्भात चर्चेचा प्रयत्न झाला आहे. पण, मी शेवटपर्यंत काँग्रेस सोडणार नाही.' कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही भाजप फोडाफोडीचे राजकारण करेल, अशी भीती काँग्रेस आणि शिवसेनेला आहे. त्यामुळेच काँग्रेसने आपल्या आमदारांना मुंबईत एका हॉटेलमध्ये एकत्र ठेवल्याची तसेच काँग्रेसने आपल्या आमदारांना राजस्थानात जयपूरमध्ये एकत्र ठेवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. दरम्यान, भाजपने शिवसेनेच्या एका आमदाराला 50 कोटी रुपयांची ऑफर दिल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. मात्र, त्यांनी संबंधित आमदाराचे नाव स्पष्ट केलेले नाही.  

अटलबिहारी वाजपेयींची कविता; संजय राऊत यांचं सूचक ट्विट

या  संदर्भात काँग्रेस नेते राजीव सातव यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटले आहे की, भाजपने अनेक राज्यांमध्ये अशाप्रकारे फोडाफोडीचे राजकारण केले आहे. काही महिन्यांपूर्वी गुजरातमध्ये त्यांनी काही नेत्यांना अशीच प्रलोभने दाखवून फोडले. तर मणिपूर, कर्नाटकमध्ये तर उघड-उघड फोडाफोडी झाली. त्यामुळे भाजप अशाप्रकारचं राजकारण करतं. यात शंका नाही.' दरम्यान, भाजपचा सत्ता स्थापन करण्याचा एक पॅटर्न आहे. त्यामुळं त्यांच्या प्रयत्नांविषयी आश्चर्य वाटत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय.

Video : लालकृष्ण अडवानी @93; मोदी, अमित शहांनी दिल्या शुभेच्छा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp offered 50 lakhs to shiv sena mla allegations from congress leader vijay wadettiwar