मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्धा कोटी अर्ज! अर्जासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत; पालकमंत्र्यांकडून नावे न आल्याने तालुकास्तरीय समित्या अध्यक्षाविनाच

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाली असून ४ ते ९ जुलै या सहा दिवसात सोलापूर जिल्ह्यातील २४ हजार महिलांनी ऑफलाइन तर अंदाजे ३२ हजार महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. तर राज्यातील अर्जदार लाडक्या बहिणींची संख्या आता ४९ लाखांवर पोचली आहे.
sakal solapur
Ladki Bahini YojanaEsakal
Updated on

सोलापूर : मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सध्या सुरू झाली असून ४ ते ९ जुलै या सहा दिवसात सोलापूर जिल्ह्यातील २४ हजार महिलांनी ऑफलाइन तर अंदाजे ३२ हजार महिलांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. तर राज्यातील अर्जदार लाडक्या बहिणींची संख्या आता ४९ लाखांवर पोचली आहे.

राज्य शासनाच्या माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना १ जुलैपासून दिला जाणार असून प्रतिमहा दीड हजार रूपये त्या महिलांच्या खात्यात थेट जमा होणार आहेत. दुसरीकडे योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत देण्यात आली असून १५ ऑगस्ट रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात लाभाची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे ३१ जुलैपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना पहिल्या टप्प्यात तर १ ते ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या सर्वांना दुसऱ्या टप्प्यात लाभ दिला जाईल, असे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. पण, विधानसभा आचारसंहितेपूर्वी अर्जदार सर्वच लाडक्या बहिणींना योजनेच्या लाभाची रक्कम वितरीत करण्याचेही नियोजन आहे.

पालकमंत्र्यांच्या शिफारसीवर ठरणार अशासकीय सदस्य

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेच्या संनियंत्रणासाठी व योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामीणमध्ये तालुकास्तरीय तर शहरात वॉर्डनिहाय समित्या नेमल्या जाणार आहेत. या समितीचे अध्यक्ष अशासकीय सदस्यच असणार असून त्यांच्याशिवाय दोन सदस्य देखील अशासकीयच असणार आहेत. अजूनपर्यंत अशासकीय सदस्यांची नावे तहसीलदारांपर्यंत पोचलेली नाहीत. पालकमंत्र्यांच्या शिफारसीनुसार अशासकीय सदस्य निश्चित होणार आहेत. समितीत समावेश व्हावा म्हणून अनेकजण आमदारांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहेत. कारण, समितीच्या माध्यमातून आगामी महापालिका, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदांच्या निवडणुकीची त्यांना पायाभरणी करता येणार आहे.

योजनेची सद्य:स्थिती

  • अपेक्षित लाभार्थी महिला

  • ३ कोटी

  • आतापर्यंत अर्ज

  • ४९.२३ लाख

  • योजनेची अंमलबजावणी

  • १ जुलैपासून

  • अर्जाची मुदत

  • ३१ ऑगस्टपर्यंत

विधानसभा आचारसंहितेपूर्वी लाडक्या बहिणींना लाभ

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी योजनेचा लाभ लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्याची लगबग सध्या युध्दपातळीवर सुरू आहे. त्यामुळे महिलांना ऑफलाइन देखील अर्ज करायला सांगण्यात आले असून ते अर्ज अंगणवाडी सेविकांसह महा ई सेवा केंद्रचालक व अन्य घटकांकडून ऑनलाइन भरून घेतले जात आहेत. त्याची पडताळणी झाल्यानंतर यादी अंतिम करून लाभ जमा केला जाणार आहे.

अर्ज कसा अन्‌ कोठे करायचा?

मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र महिलांना घरबसल्या देखील अर्ज करता येईल. ‘नारीशक्ती दूत’ हे ॲप डाऊनलोड करायचे आणि त्यानंतर मोबाइल क्रमांक व ई-मेल टाकून पहिल्यांदा प्रोफाइल तयार करून घ्यायचे. त्यानंतर काहीवेळाने वैयक्तिक माहिती भरण्याचा पर्याय खुला होईल. त्यात आपली वैयक्तिक माहिती भरून झाल्यावर सर्वात शेवटी चार कागदपत्रे अपलोड करावी लागतील, पण त्याची साईज एक ‘एमबी’पेक्षा जास्त नसावी. कागदपत्रे अपलोड केल्यावर शेवटी आपला फोटो काढून अपलोड करावा. त्यानंतर शेवटी एक छोटी चौकट दिसेल, त्यावर क्लिक करून आपण भरलेली माहिती जतन करायची आहे. त्यानंतर आपला अर्ज आपोआप त्या लॉगिनवर दिसणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.