औरंगाबादच्या नामांतरावरून आघाडीत बिघाडी; बाळासाहेब थोरातांचे सूचक ट्विट

balasaheb thorat uddhav thackeray
balasaheb thorat uddhav thackeray

मुंबई - राज्यात सध्या महाविकास आघाडीचे सरकार असून विरोधी पक्षात असलेल्या भाजपने औंरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा उचलून धरला आहे. यावरून राज्यातील ठाकरे सरकारवर टीकाही केली जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी कोणत्याही शहराच्या नामांतराला आमचा ठाम विरोध आहे असं स्पष्टपणे सांगितलं आहे. दुसरीकडे शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी नामांतरासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं म्हटलं होतं. यामुळे आता आघाडीत बिघाडी झाल्याची चर्चा सुरु आहे. औंरंगाबादसह पुण्याचेही नामकरण जिजापूर व्हावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली होती. 

बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं की, महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते, भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरणाला आमचा ठाम विरोध आहे.

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने शहरांचे परस्पर नामांतरण करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही असंही त्यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. 

शिवसेनेची भूमिका वेगळीच?
पुण्याचे नामकरण करण्याची मागणी भाजपने केली आहे. त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधीपक्षाच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. याबाबत बोलताना विधानसभेच्या उपसभापती निलम गोऱ्हे म्हणाल्या की, 'पुण्याच्या नामकरणाचा विषय मुळात वादाचा नाही. नवीन इतिहास घडविणे जगजाहीर आहे. संभाजीनगर हा प्रस्ताव आधीच ठेवला आहे. उद्धव ठाकरे योग्य वेळी निर्णय घेतील. काही लोक यामध्ये तेढ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पुणेकरांनी विद्यापीठाचे नामांतर आनंदाने स्वीकारलं आहे. उपसभापती या नात्याने माझं मत मांडणार नाही. जिजामातांचे नाव पुण्याला देण्याची मागणी आहे. त्याबाबत सरकार विचार करेल. नामांतराच्या बाबतीत सरकार कटिबद्ध आहे'' 

योगींनी सुरुवात केल्यानंतर चर्चेला जोर
इतिहासात भारतातील अनेक प्रांतांमध्ये परकीय आक्रमण झाले. त्या आक्रमणावेळी तत्कालीन राजवटींनी अनेक शहरे, ठिकाणांची नावे बदलली. आजही यापैकी काही नावे तशीच आहे. ती बदलण्याची मागणी अलिकडच्या काळात अनेकदा झाली आहे. उत्तर प्रदेशात योगी सरकारने अलाहाबादचे नाव बदलून प्रयागराज केल्यानंतर इतरही काही शहरांच्या नामांतराची चर्चा होऊ लागली. त्यानंतर महाराष्ट्रात औंरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा जोर धरू लागला आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com