राज्यात पोलिस दलात कोरोनाबाधितांचा आकडा उच्चांकीवर, २४ तासात ४२४ पोलिसांना लागण 

अनिश पाटील
Thursday, 3 September 2020

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १६  हजार ०१५ वर पोहोचला आहे. त्यात एक हजार ७३६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बाधित झालेल्या पोलिसांपैकी १३ हजार ०१४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे.

मुंबईः गेल्या २४ तासांत राज्यात ४२४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन घोषित केल्यापासून एका दिवसात कोरोनाबाधित झालेल्या पोलिसांचा हा उच्चांक आहे. यापूर्वी २४ ऑगस्टला एका दिवसात ३५१ पोलिसांना कोरोनाची बाधा झाली होती.

राज्यातील कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा १६  हजार ०१५ वर पोहोचला आहे. त्यात एक हजार ७३६ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बाधित झालेल्या पोलिसांपैकी १३ हजार ०१४ पोलिसांनी कोरोनावर मात केली आहे. त्यातील बहुतांश पोलिस पुन्हा सेवेतही सामील झाले आहेत.

राज्यात पाच पोलिसांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील मृत पोलिसांचा आकडा १६३ वर पोहोचला आहे. ३१ऑगस्ट, १ सप्टेंबर आणि २ सप्टेंबर या तीन दिवसात या पाच पोलिसांचा मृत्यू झाला आहे. वर्धा, नांदेड, नवी मुंबई, नागपूर ग्रामीण आणि ठाणे शहर या ठिकाणी हे पोलिसांचे मृत्यू झालेत.

अधिक वाचाः  संजय राऊत मला उघडपणे धमकी देतायत, कंगना राणावतचं नवं ट्विट

वर्धा येथे हवालदार विलास बाळपांडे (४६) यांचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला. ते दहिगाव पोलिस ठाण्यात कार्यरत होते. २७ ऑगस्टला त्यांना कोरोना झालेल्याचे निदान झाल्यानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बुधवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मुंब्रा पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस हवालदार कारभारी रामभाऊ खाडे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला. ते सफायर रुग्णालयात उपचार घेत होते. २३ ऑगस्टला त्यांना कोरोना झाल्याचे चाचणीत निष्पन्न झाले होते. बुधवारी त्यांचा मृत्यू झाला.

मोठी बातमीः  कंगनाजी...राम कदमांवर टिप्पणी करत काँग्रेसनं कंगनाला दिला 'हा' सल्ला

राज्यातील तिसरा मृत्यू नांदेड येथील हवालदार बालाजी तुकाराम डेंगे यांचा झाला आहे. ते नांदेड पोलिस मुख्यालयात कार्यरत होते. ते वजीराबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. उर्वरीत दोन मृत पोलिस नागपूर ग्रामीण आणि नवी मुंबई पोलिस दलात कार्यरत होते. नागपूर ग्रामीण येतील पोलिस हवालदार गणेश शंकरराव सुरपम यांचा नागपूर मेडीकल कॉलेजमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २६ ऑगस्टला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याशिवाय नवी मुंबईतील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सुरेश म्हात्रे यांचाही डी.वाय.पाटील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ते कलंबोळी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. २० ऑगस्टपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.

हेही वाचाः  क्रॉफर्ड मार्केट दुर्घटनेतल्या आरोपीच्या पोलिस कोठडीत वाढ, वाचा सविस्तर

राज्य पोलिस दलातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या पोलिसांचा आकडा १६३ वर पोहोचला आहे. त्यात १५ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. राज्य पोलिस दलातील १६ हजार कोरोना बाधित पोलिसांमध्ये चार हजार ८०० पोलिस मुंबई पोलिस दलातील आहे. याशिवाय मुंबईत ६९ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईतील मृत पोलिसांमध्ये बहुतांश पोलिसांना उच्च रक्त दाब आणि मधुमेहाचा त्रास होता.

Corona Patients state 424 policemen infected 24 hours


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Corona Patients state 424 policemen infected 24 hours