कोरोना योध्दयांना कुटुंबप्रमुखाची साथ; त्याचबरोबर समाजात ‘पोलिस’ मैत्र रूजले 

Anil-Deshmukh
Anil-Deshmukh

कोणत्याही युध्दात लढणाऱ्या वीरांनाही धीर देण्याची, त्यांचे मनोधैर्य वाढविण्याची, ते एकटे नाहीत हे दाखवून देण्याची आवश्‍यकता असते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने युध्दमैदानावरच्या पोलिसांना भेटायचे, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आणि पोलिस दलास अधिक कार्यक्षम करण्याचा प्रयत्न केला आहे…

काळ लॉकडाउनचा. साताऱ्यातील एक गाव. हमरस्त्यावर पोलिसांची नाकेबंदी. तळपत्या उन्हात, मास्क वगैरे लावून पोलिस उभे. अचानक तेथे गाड्यांचा ताफा येऊन थांबला. पाहताक्षणी पोलिसांना अंदाज आलाच होता, की हा मंत्र्यांचा ताफा आहे. तेवढ्यात त्यातल्या एका गाडीतून खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख उतरले. मग फटाफट सलाम्या, पण गृहमंत्री तेथे सलामी घेण्यास आलेले नव्हते. 

सारी औपचारिकता बाजूला सारून ते तेथील अधिकाऱ्यांची, पोलिस शिपायांची चौकशी करू लागले. कोणीतरी तेवढ्यात चहा मागवला. देशमुखांनीही कोणताही अनमान न करता चहाचा प्याला घेतला. चहा पिता-पिता पोलिसांशी गप्पा मारल्या. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या... तशी साधीशीच ही कृती; परंतु पोलिसांचे मनोबल वाढविणारी अशी ती गोष्ट होती. 

कोणत्याही युद्धात लढणाऱ्या वीरांनाही धीर देण्याची, त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचे, ते एकटे नाहीत हे दाखवून देण्याची आवश्‍यकता असते. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आतापर्यंत राज्यातील वीसहून अधिक जिल्ह्यांचा दौरा केला आहे. उद्देश एकच की, पोलिस दलाचा कुटुंबप्रमुख या नात्याने युद्धमैदानावरच्या पोलिसांना भेटायचे, त्यांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आणि पोलिस दलास अधिक कार्यक्षम कसे करता येईल याच्या उपाययोजना करायच्या.

या कोरोना युद्धात पोलिसांवरची जबाबदारी मोठी आहे. सुरक्षा, बंदोबस्त ही नेहमीची कामे आहेत. पण लॉकडाउन यशस्वी करणे हे मोठे काम त्यांच्यावर सोपविण्यात आलेले आहे. त्याचबरोबर परराज्यांतील नागरिकांना परत आणणे आणि येथील परप्रांतीय कामगारांना त्यांच्या-त्यांच्या गावी पोचविण्याची व्यवस्था करणे ही कामेही पोलिसांवर सोपविण्यात आलेली आहेत. एकीकडे कामाचा हा ताण आणि दुसरीकडे इतरांप्रमाणेच सामान्य पोलिसांच्या, त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात असलेले कोरोनाचे भय. यातून पोलिसांचे मनोधैर्य कायम ठेवणे आवश्‍यक असल्याचे ओळखून अनिल देशमुख हे स्वतः आघाडीवर उतरले. 

पोलिसांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा, विशेष कोविड-१९ हेल्पलाईन, पोलिसांना प्रतिबंधात्मक औषधांचे वाटप, ५५ वर्षांवरील पोलिसांना पूर्णपणे सुटी, त्याच सोबत ५० वर्षांवरील पोलिसांचा सामान्य नागरिकांशी संपर्क येईल अशी कामे न देणे, या सर्व बाबी याच पोलिस संपर्काचा परिपाक आहेत. देशमुख यांच्या सूचनेनुसार मुंबई पोलिस आयुक्तालयामार्फतदेखील पोलिस व त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष कोव्हिड हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. दहा अतिरिक्त पोलिस आयुक्त कार्यक्षेत्रात दहा कोव्हिड कक्षांची स्थापना करण्यात आलेली आहे. 

त्याद्वारे पोलिसांसाठी राखीव असलेल्या रुग्णालयातील रिक्त बेडची संख्या, तसेच इतर माहितीही दिली जाते. याशिवाय राज्यातील पोलिस कर्मचाऱ्यांना पोलिस महासंचालक कार्यालयाकडून आतापर्यंत जवळपास ७.५ लाख विविध प्रकारचे मास्क, १५ हजार लिटर सॅनिटायझर, २२ हजार फेस शिल्ड, ४४ हजार हॅन्डग्लोव्हज्‌, ड्रोन कॅमेरा अशा आवश्‍यक असलेल्या जवळपास चार कोटी रुपयांच्या वस्तूंचे वाटप करण्यात आलेले आहे. मुंबई पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील पोलिसांसाठी जवळपास २.५ कोटी रुपयांच्या अशाच आवश्‍यक वस्तू देण्यात आलेल्या आहेत. 

याशिवाय पोलिसांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्‍यक असलेल्या वस्तूंची कमतरता पडू नये, याकरिता कोव्हिड- १९ प्रतिबंधात्मक आवश्‍यक असलेल्या वस्तूंच्या खरेदीकरिता पोलिस कल्याण निधीतून खरेदीचे अधिकार सर्व घटक प्रमुखांना देण्यात आले आहेत. असे अधिकार मुंबई पोलिस आयुक्तालयातही देण्यात आले. जवळपास १३७ कोटी रुपयांचा निधी, पोलिस कल्याण निधीतून मंजूर करण्यात आला आहे. 

प्रत्येक अप्पर आयुक्तालय क्षेत्रासाठी १० कोटी निधीदेखील मंजूर करण्यात आलेला आहे. कोरोना संबंधित साधनसामुग्री घेण्याकरिता राज्यात पोलिस विभागाला ९ कोटी रुपयांचे अनुदान कार्यालयीन खर्चापोटी देण्यात आले; तर मुंबई पोलिस आयुक्तालयातही आतापर्यंत १ कोटी ४५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले. 

कोरोना युद्धातल्या या आघाडीच्या लढवय्यांच्या मागे राज्य सरकार, देशमुख यांचे गृहमंत्रालय ठामपणे उभे आहे, आपले मंत्री हे केवळ मंत्री नाहीत तर ते खऱ्या अर्थाने पोलिसमित्र आहेत, हाच संदेश यातून जात आहे. आजच्या काळात पोलिसांसाठी ती एक महत्त्वाची गोष्ट आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com