चीनच्या शेंनझेन शहरातून भारतातल्या हॉस्पिटलना येतोय एक निरोप

मृणालिनी नानिवडेकर : सकाळ न्यूज नेटवर्क 
सोमवार, 6 एप्रिल 2020

मास्क तयार करण्याची पद्धत शास्त्रीय असल्याने निर्मितीसाठी भारतीय कंपन्यांना किमान ३ महिने लागतील. भारतात हा मास्क तयार करणार्या दोन मोठ्या कंपन्या आहेत.

मुंबई Coronavirus : वुहानमधून सुरू झालेली साथ आता जगभर पसरली आहे. ती मानवनिर्मीत जिवाणूयुध्द आहे का?, यावर मतेमतांतरे सुरू असतानाच चीन या साथीचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक ती साधनसामुग्री पुरवण्याच्या व्यवसायासाठी सिध्द झाला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यक क्षेत्राला अत्यावश्यक असलेल्या एन ९५ मास्कची विक्री आम्ही ‍१ किंवा १.५ डॉलरमध्ये करू शकू, असे निरोप शेंनझेन या हॉंगकॉंगलगतच्या चीनमधील व्यापार उद्योग शहरातून भारतातील रुग्णालयांपर्यंत पोहोचू लागले आहेत.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

किमती कशा वाढल्या
कोणत्याही मोठ्या रुग्णालयात एका वेळी ‍१५ कोरोनाग्रस्त रुग्ण असले तरी डॉक्टर नर्स आणि कामगार यांच्या तीन पाळ्यांना धरून एकेका दिवशी किमान ५० मास्क गरजेचे आहेत. ही साथ तीन महिने त्रास देत राहील असे गृहित धरले तर दिवसाची गरज ५०० ते ६०० मास्क असेल. म्हणजेच तीन महिन्याचे ४५ हजार मास्क एका रुग्णालयाला लागतील. कोरोना साथीपूर्वी असा एक मास्क ४५ रुपयांना मिळत होता. तो आता मुंबई पुण्यात १८० ते २५० रुपयापर्यंत गेला आहे. शिवाय किंमत मोजली तरी तो मिळत नाही अशी स्थिती आहे. हा मास्क तयार करण्याची पद्धत शास्त्रीय असल्याने निर्मितीसाठी भारतीय कंपन्यांना किमान ३ महिने लागतील.

आणखी वाचा - अमेरिकेतील नोकऱ्या धोक्यात, पण, भारतीय यातून तरणार

भारतात हा मास्क तयार करणार्या दोन मोठ्या कंपन्या आहेत. त्या औद्योगिक पुरवठाही करतात. काही उद्योगात हा मास्क आवश्यक असतो. त्यांची निर्यात करण्याची परवानगी काढून घेतली आहे. मात्र, तरीही देशांतर्गत उत्पादन फार नसल्याने आता चीनचा पुरवठा हाच मार्ग अंमलात आणावा लागेल असे वैदयकीय पुरवठा तज्ज्ञ विनय चुटके यांनी सकाळशी बोलताना सांगितले. १.५ डॉलरचा मास्क ‍१०० रुपयांना पडेल. भारतात उत्पादन शक्य नसल्याने आता आयातीला पर्याय नाही, असेही ते म्हणाले.

आणखी वाचा - ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सर रुग्णालयात दाखल

पीपीईची किंमत तिप्पट 
दरम्यान डॉक्टरांना उपचार करताना  आवश्यक असलेला पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंटचा सूट साथीआधी मिळे ३५० ते ५०० रुपयांना.आता तो झाला १ हजार ३५० ,१ हजार५०० रुपयांचा. मागणी पुरवठ्यातील तफावतीमुळे किंमत वाढली. पण, भारतातल्या बऱ्याच कंपन्या त्या उत्पादनासाठी सरसावल्या आहेत. त्यांची निर्मिती सोपी आहे. ती अनेक शहरात होवू शकते. त्यामुळे दहा दिवसांत आता हे सूट मोठ्या संख्येने बाजारात येतील. ते  प्लास्टीकसमान कापडापासून तयार केले जातात. पायात त्याच कापडाचे बूट ,अंग झाकणारा गाऊन, डोक्यावर टोपी अन डोळ्याला चष्मा असा तो जामानिमा असतो. सध्या अन्य शस्त्रक्रिया बंद असल्याने हे उत्पादन त्या ऐवजी  वेगाने सुरू झाले आहे असेही चुटके यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus china trying for sell their masks Indian hospitals