#स्पर्धापरीक्षा - लियोनेल मेस्सी

किशोर पेटकर 
शुक्रवार, 23 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत.  स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी  http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

जून 2016 मध्ये अमेरिकेत झालेल्या कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेत लियोनेल मेस्सीच्या नेतृत्वाखालील अर्जेंटिना संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. चिलीने त्यांना अंतिम लढतीत पेनल्टी शूटआऊटवर हरविले. या स्पर्धेच्या अंतिम लढतीत अर्जेंटिनाला चिलीने सलग दुसऱ्यांदा हरविले. 2016 मधील अंतिम लढतीत मेस्सी पेनल्टी फटका मारताना गडबडला. दोन वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये झालेल्या विश्‍वकरंडक फुटबॉल स्पर्धेतही मेस्सीच्या नेतृत्वाखालील  अर्जेंटिनास उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. जर्मनीने त्यांना अंतिम लढतीत हरविले होते. मेस्सी हा पाच वेळा सर्वोत्तम खेळाडूचा "बॅलन डी ओर' पुरस्कारप्राप्त खेळाडू, पण देशाचे प्रतिनिधित्व करताना यशाने त्याला वारंवार हुलकावणी दिली आहे. मेस्सी संघात असताना 2007 मध्येही अर्जेंटिनास कोपा अमेरिका  स्पर्धेत उपविजेतेपदावरच समाधान मानावे लागले होते. यावेळच्या कोपा अमेरिका स्पर्धेतील पराभवानंतर मेस्सीने लगेच आंतरराष्ट्रीय निवृत्ती जाहीर करून साऱ्यांनाच अनपेक्षित धक्का दिला. व्यावसायिक क्‍लब पातळीवर स्पेनमधील बार्सिलोना संघातर्फे खेळताना 29 वर्षीय मेस्सी यशस्वी ठरलेला आहे. या क्‍लबतर्फे हुकमी "स्ट्रायकर'ने आठ ला-लिगा व चार वेळा चॅंपियन्स लीग स्पर्धा जिंकलेली आहे. सीनियर पातळीवर देशातर्फे खेळताना यश मिळत नाही याबद्दल निराश झालेल्या मेस्सीने निवृत्ती पत्करली. अठराव्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये पदार्पण केले.

अर्जेंटिनातर्फे सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम त्याच्याच नावावर आहे, परंतु अंतिम लढतीत त्याचा समावेश असताना अर्जेंटिना संघ एकदाही जिंकलेला नाही. 

आंतरराष्ट्रीय पुनरागमन 
कोपा अमेरिका स्पर्धेतील पराभवानंतर अर्जेंटिना संघ मायदेशी परतला, तेव्हा "डॉन्ट गो, लिओ' हे फलक मेस्सीचे स्वागत करत होते. अर्जेंटिनाच्या राष्ट्राध्यक्षांनीही त्याची भेट घेऊन निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याची विनंती केली. देशवासीयांच्या वाढत्या मागणीसमोर झुकून लियोनेलने अखेर निवृत्ती मागे घेण्याचा निर्णय घेतला. सप्टेंबरमधील संघाच्या 2018 विश्‍वकरंडक पात्रता फेरीत खेळण्याचे निश्‍चित केले. अर्जेंटिना संघातून खेळताना तो 10 क्रमांकाच्या जर्सीत पुन्हा दिसला. 1 सप्टेंबर 2016 रोजी तो अर्जेंटिनाकडून पुनरागमनातील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. विश्‍वकरंडक पात्रता फेरीत त्याच्या गोलमुळे अर्जेंटिनाने उरुग्वेला 1-0 फरकाने नमविले. 
 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा-

#स्पर्धापरीक्षा - महाराष्ट्राचे इलेक्‍ट्रॉनिक्‍स धोरण

#स्पर्धापरीक्षा -भारताची पहिली एकात्मिक संरक्षण-संदेशवहन प्रणाली

#स्पर्धापरीक्षा - 'पीएसएलव्ही' अग्निबाणाचे प्रक्षेपण

#स्पर्धापरीक्षा - 'आयएनएस चेन्नई'

#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना

#स्पर्धापरीक्षा - नोटाबंदी

#स्पर्धापरीक्षा - मनरेगा योजना

#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'

#स्पर्धापरीक्षा - भारताचे रणगाडा विरोधी नाग क्षेपणास्त्र

#स्पर्धापरीक्षा - राष्ट्रीय फलोत्पादन अभियान

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

Web Title: esakal news competitive exam series upsc mpsc lionel messi football