दिग्गजांच्या गडांना धक्के; हिवरेबाजार पोपटरावांचेच; पाटोद्यात पेरे पाटलांना धक्का

कल्याण - कल्याण तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडाल्यानंतर सोमवारी जल्लोष करताना भाजप कार्यकर्ते.
कल्याण - कल्याण तालुक्‍याच्या ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत शिवसेनेचा धुव्वा उडाल्यानंतर सोमवारी जल्लोष करताना भाजप कार्यकर्ते.

पुणे - चांद्यापासून बांद्यापर्यंत अवघा ग्रामीण महाराष्ट्र आज गुलालामध्ये न्हाऊन निघाला. निमित्त होते ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचे. अनेक ठिकाणांवर तरुण मंडळी गावची कारभारी झाली असून प्रस्थापितांना नेत्यांना मोठे धक्के बसले आहेत. महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबतच प्रमुख विरोधक भाजपनेही आम्हीच सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा केला आहे. 

तीस वर्षानंतर पहिल्यांदाच निवडणूक झालेल्या आदर्श गाव हिवरेबाजारमधील जनतेने पोपटराव पवार यांनाच पसंती दिली. पवार गटाच्या सातही जागा मोठ्या फरकाने निवडून आल्या आहे. आदर्श गाव राळेगणसिद्धीतही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे समर्थक जयसिंग मापारी यांच्या हाती सत्ता आली. औरंगाबाद तालुक्‍यातील आदर्श गाव पाटोदा येथे मात्र भास्करराव पेरे-पाटील यांच्या कन्या अनुराधा पाटील यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

विदर्भात मनसेचा चंचुप्रवेश
विदर्भात महाविकास आघाडी, भाजप प्रणीत पॅनेलला संमिश्र यश मिळाले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गोंदिया जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींवर चार उमेदवार निवडून आणत सर्वांना धक्का दिला आहे. यवतमाळ तालुक्यात भाजपची सरशी झाली. पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांचे मूळ गाव असलेल्या पाटणसावंगी येथे केदार पॅनलचे १७ उमेदवार विजयी झाले. 

गृहमंत्री देशमुखांची सरशी
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मतदारसंघ असलेल्या काटोल तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींवर राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. वर्धा जिल्ह्यातील बहुतांशी ग्रामपंचायतींवर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस समर्थक उमेदवारांनी यश संपादन केले. मोर्शी तालुक्यातील काही ग्रामपंचायतींवर भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनिल बोंडे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलने विजय मिळविला.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रावसाहेब दानवेंना धक्का
जालना जिल्ह्यातील पाथरवाला बु. व कुरण ग्रामपंचायतीवर विजय मिळवून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गड कायम राखला. भोकरदन तालुक्‍यातील दहा मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये झालेले सत्ता परिवर्तन केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंना धक्‍का मानले जात आहे. माजी विधानसभा अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्या मुळ चित्तेपिंपळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपप्रणीत सदस्य विजयी झाले.

माणिकराव कोकाटेंना धक्का
नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्रस्थापितांनी सत्ता राखली तर काही ठिकाणी सत्ता परिवर्तन झाले आहे. नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळ यांच्या मतदारसंघातील ग्रामपंचायतींमध्ये उलथापालथ झाली आहे. मतदारांनी स्थानिक पातळीवरील दिग्गज नेत्यांना नाकारल्याचे चित्र आहे. सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या राजकारणाला गावातच धक्का बसला आहे.

शाळा, कॉलेज पुन्हा बंद होणार? केंद्र सरकारने केला खुलासा
 
सांगलीत भाजपला दणका
सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने आघाडी घेत भाजपला धक्का दिला आहे. पलूस-कडेगाव तालुक्यात कॉँग्रेसची, तर आटपाडी-खानापूर तालुक्यात शिवसेनेची सत्ता आली आहे. तासगाव तालुक्यात खासदार संजय पाटील यांना धक्का बसला असून, राष्ट्रवादीने १७ ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या आहेत. जिल्ह्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कोकणात भाजपची बाजी 
सिंधुदुर्गमध्ये ७० पैकी ४४ ग्रामपंचायतींवर भाजपचे तर २२ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. चार ग्रामपंचायतींवर स्थानिक पॅनेलची सत्ता आली आहे. रत्नागिरीत शिवसेनेला कौल मिळाला आहे. चिपळूण, संगमेश्‍वरसह खेड, दापोली तालुक्यात राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलला यश मिळाले; मात्र सुरवातीपासूनच दंड थोपटणाऱ्या भाजपला फारसे यश मिळवता आलेले नाही.

कोल्हापुरात स्थानिकांचे वर्चस्व
कोल्हापुरात बहुतांश ठिकाणी स्थानिक आघाड्यांचेच वर्चस्व राहिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला बालेकिल्ल्यात ही विजयासाठी झगडावे लागले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या खानापूर गावातच त्यांच्या गटाला पराभव पत्करावा लागला.

प्रस्थापितांनी गड राखले
साताऱ्यातील कऱ्हाड उत्तरमध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या राष्ट्रवादी गटाच्या कार्यकर्त्यांची सरशी झाली आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार महेश शिंदे, रामराजे नाईक-निंबाळकर गटाने बहुतांशी गावात सत्ता कायम ठेवली आहे. माण मतदारसंघात आमदार जयकुमार गोरे, प्रभाकर देशमुख, शेखर गोरे यांच्या गटांना संमिश्र यश मिळाले आहे.

नवनिर्वाचित सदस्यांनो, गावाचा विकास करण्यासाठी नागरिकांनी तुमच्यावर विश्‍वास दाखवला आहे. त्यामुळे तुमची जबाबदारी आता वाढली आहे. यशवंतराव चव्हाण यांनी दाखवलेल्या विकासाच्या मार्गावर आपल्या गावाला पुढे घेऊन जाण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे. जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवत ग्रामविकासाचा आदर्श निर्माण करावा. 
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

सहा हजार ग्रामपंचायतींत भाजपचा बहुमताचा दावा
‘राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष सर्वाधिक जागा जिंकणारा पक्ष ठरला असून सहा हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींत भाजप बहुमत मिळवेल,’’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला. भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘सोमवारी सायंकाळपर्यंत जाहीर झालेले निकाल व मतमोजणी सुरु असलेल्या ठिकाणांचे कल पाहता भारतीय जनता पक्षाला १४ हजारांपैकी  ६ हजारांहून अधिक ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळेल, असा अंदाज आहे. सोमवारी जाहीर झालेल्या निकालानुसार भाजपला १९०७ ग्रामपंचायतींमध्ये बहुमत मिळाले आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी अर्थमंत्री  सुधीर मुनगंटीवार, बबनराव लोणीकर, राधाकृष्ण विखे पाटील आदी नेत्यांच्या मतदारसंघात भाजपला  मोठे यश मिळाले आहे. जळगाव जिल्ह्यातील ७४३ पैकी ३७२ ग्रामपंचायतींत भाजपने यश मिळवले.’

‘एकनाथ खडसे यांच्या कोथळी गावातील ग्रामपंचायत भाजपने जिंकली आहे.  राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दत्तक घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील येनकुल ग्रामपंचायतीतही भाजपने विजय मिळवला आहे.  खासदार विनायक राऊत यांनी दत्तक घेतलेल्या देवगड तालुक्यातील तळवडे ग्रामपंचायतीवरही भाजपचा झेंडा फडकला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कऱ्हाड तालुक्यातील  सर्व प्रमुख ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे,’’ असेही ते म्हणाले.

कोकणात भाजप
सिंधुदुर्ग, रत्नागिरी अशा शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्ह्यातील परिस्थिती बदलली असून आता तेथे भाजपचा भगवा फडकला आहे असा दावा भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

महाविकास आघाडीचा विजयाचा दावा
‘राज्यातील चार हजारांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेस पक्षाने बहुमताने विजय मिळवला आहे. राज्याच्या सर्व भागातील ग्रामपंचायतीत महाराष्ट्र विकास आघाडीने ८० टक्के जागा मिळवून प्रचंड मोठा विजय मिळविला आहे. या निकालातून महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या एक वर्षाच्या कामावर जनतेने विश्वास दाखवला आहे. राज्यात भाजपचा दारुण पराभव झाला असून भाजप नेत्यांनी खोटे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करण्याऐवजी खुल्या दिलाने पराभव मान्य करावा,’’ असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज व्यक्त केले.

‘कोल्हापूर, नंदूरबार, लातूर, नांदेड, अमरावती, यवतमाळ, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, उस्मानाबाद, वाशीम, बुलडाणा या जिल्ह्यांत आतापर्यंतच्या निकालावरून प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून काँग्रेस पक्ष म्हणून समोर आला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीप्रमाणेच जनतेने या निवडणुकीतही भाजपचा दारुण पराभव करत महाराष्ट्र विकास आघाडीला कौल देत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांवर विश्वास दाखविला आहे. विदर्भात काँग्रेस पक्षाला प्रचंड मोठे यश मिळाले असून ५० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायतीत काँग्रेसचा विजय झाला आहे. मराठवाड्यात काँग्रेसच्या जागा आणि मतांचाही टक्का वाढला आहे,’’ असे थोरात म्हणाले.

भाजपच्या अनेक नेत्यांना आपले गावही राखता आलेले नाही. भाजप नेत्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटी आकडेवारी जाहीर करून आपलाच पक्ष सर्वांत मोठा असल्याचा दावा या निवडणुकीच्या निकालानंतरही केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

सत्तेचा सारीपाट

  • जयंत पाटलांना धक्का, म्हैसाळमध्ये भाजप
  • अकलूजमधील पंचायतींत मोहिते पाटलांची सरशी 
  • लातूरमध्ये दापक्याळमध्ये आपची बाजी
  • सोलापुरात ऋतुराज देशमुख (वय २१) सर्वांत तरुण सदस्य
  • खानापूरमध्ये चंद्रकांत पाटलांना धक्का
  • परळीतील पंचायतींमध्ये धनंजय मुंडे गटाचे यश
  • एकनाथ खडसेंच्या कोथळीत भाजपची बाजी
  • साताऱ्यातील शरद पवारांच्या येनकुल दत्तक गावामध्ये भाजप उमेदवार जिंकले
  • खा. विनायक राऊत यांच्या तळवडे गावात भाजप जिंकले
  • पृथ्वीराज चव्हाणांना धक्का, कऱ्हाड पंचायतींवर भाजपचा झेंडा
  • जालन्यात आरोग्यमंत्री टोपेंनी गड राखले
  • रावसाहेब दानवेंच्या भोकरदनच्या गडाला सुरुंग
  • तासगावातील ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे
  • कोकणात भाजपचीच बाजी, कोल्हापुरात स्थानिक आघाड्या भारी

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com