गुजरात कंपनीचे कंत्राट रद्द; ठाकरे सरकारचा मोदींना दणका

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

मुंबई - राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कामांचा धडाका सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे "ड्रीम प्रोजेक्‍ट' असलेले बुलेट ट्रेनसारखे काही प्रकल्प कायमचे रद्द होण्याची चिन्हे आहेत. या पार्श्‍वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने नंदुरबारच्या घोड्याच्या आंतरराष्ट्रीय जत्रेसाठी गुजरातच्या कंपनीला दिलेले 321 कोटींचे कंत्राट रद्द केले आहे.

फडणवीस सरकारने रेटलेल्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर आणखी एक मोठा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. फडणवीस सरकारकडून घोड्यांच्या आंतरराष्ट्रीय जत्रेच्या आयोजनाचे कंत्राट गुजरातमधील इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीला देण्यात आले होते. मात्र, यात गंभीर स्वरूपाची आर्थिक अनियमितता असल्याचा ठपका ठेवत हे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला.

26 डिसेंबर 2017 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने अहमदाबादमधील लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबत करार केला. त्यामुळे नंदुरबारमध्ये होणाऱ्या सारंगखेडा चेतक फेस्टिव्हलच्या व्यवस्थापनाचे कंत्राट कंपनीला देण्यात आले होते. याच कंपनीला रण उत्सव आणि कुंभमेळ्याचेही कंत्राट मिळाले होते. मात्र, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येताच पर्यटन विभागाने लल्लूजी अँड सन्स कंपनीसोबतचा करार रद्द केला.

याबद्दलचे आदेश मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काढले आहेत. लल्लूजी अँड सन्स कंपनीला कंत्राट देताना केंद्र सरकारच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे म्हटले आहे. याशिवाय, कंत्राटात आर्थिक अनियमिततादेखील आढळून आल्याची माहिती पर्यटन विभागाने दिली. एमटीडीसीकडून दरवर्षी डिसेंबर महिन्यात सारंगखेडा येथे घोड्यांच्या जत्रेचे आयोजन केले जाते. देशातल्या जुन्या जत्रांपैकी एक असणारी ही जत्रा 2016 पासून आंतरराष्ट्रीय स्तरावर भरवली जाते.

समृद्धी महामार्गाचाही आढावा घेणार 
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला असलेला सुरुवातीपासूनचा विरोध आता तीव्र झाला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य टांगणीला लागले आहे. कोकणातील नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकल्पाविरोधात आंदोलने करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. आता प्रकल्पही रद होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्याचबरोबर मुंबई-नागपूर समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या विरोधातही अनेक तक्रारी आल्या असून, या प्रकल्पाचा आढावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच घेणार असल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com