
ग्रामपंचायत निवडणुकीत काही हटके निकाल देखील समोर येताना पाहायला मिळत आहेत.
Gram Panchayat Result : एकमेकींविरोधात दोघींचा जोरदार प्रचार; अखेरच्या क्षणी सूनच ठरली सासूवर भारी
Gram Panchayat Election Results : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. मात्र, याचवेळी काही हटके निकाल देखील समोर येतांना पाहायला मिळत आहेत. गोंदिया (Gondia) जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोदरा-देऊळगाव ग्रामपंचायतीमध्ये एकाच कुटुंबातील सासू आणि सून सरपंच पदाकरिता निवडणूक रिंगणात आमने-सामने उभ्या होत्या.
दरम्यान, मतमोजणीनंतर निकाल हाती आले असून सून किरण मिलिंद ढवळे यांनी सासू मंदा योगिराज ढवळे यांचा पराभव केलाय. सासू आणि सून दोघींनीही अपक्ष निवडणूक लढवलीये. सरपंचपदी सून निवडून आल्यामुळं गावात उत्साहाचं वातावरण आहे.
1650 लोकसंख्या असलेल्या या गावाच्या 10 सदस्यीय (9+1) गट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली होती. 15 वर्षांनंतर या ग्राम पंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी महिला सरपंचपद राखीव झालं होतं. गावात प्रभावी महिला किरण ढवळे यांची ओळख होतीच.
गावातील स्थानिक नेत्यांनी सर्व धर्म समभाव पॅनलतर्फे त्यांना सरपंचपदासाठी निवडणुकीत उभं केलं होतं. किरण मिलिंद ढवळे आपल्या काकेसासू विरुद्ध अपक्ष सरपंच पदासाठी निवडणुकीत उभ्या होत्या. मात्र, यामध्ये सुनेनं बाजी मारलीये. त्यामुळं गावात सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय.