शेवटी शिंदे गटाच्या खासदारानं मुलाच्या पराभवाचा वचपा काढलाच; ठाकरे गटाला चारली धूळ! Gram Panchayat Result | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gram Panchayat Election Results

राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत.

Gram Panchayat Result : शेवटी शिंदे गटाच्या खासदारानं मुलाच्या पराभवाचा वचपा काढलाच; ठाकरे गटाला चारली धूळ!

Gram Panchayat Election Results : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. मात्र, याचवेळी काही हटके निकाल देखील समोर येतांना पाहायला मिळताहेत. यात जुन्या निवडणुकीतील पराभवाचा वचपा काढण्यासाठी नेहमीच चुरस पाहायला मिळत असते. अशीच एक लढत चर्चेत होती.

त्यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे (Nashik MP Hemant Godse) यांनी आपल्या मुलाच्या परभवाचा वचपा ग्रामपंचायत निवडणुकीत काढला आहे. नाशिक जिल्ह्यातील एकलहरे ग्राम पंचायत निवडणुकीत (Eklahare Gram Panchayat Election) ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट असा सामना होता. यामध्ये ठाकरे गटाचे शंकर धनवटे तर शिंदे गटाकडून कविता जगताप यांच्यात सरपंचपदासाठी लढत होती.

या लढतीकडं शिवसेनेच्या दोन्ही गटाचं लक्ष लागून होतं. त्यात हेमंत गोडसेंच्या पॅनलच्या कविता जगताप यांनी बाजी मारलीये. शंकर धनवटे यांच्याकडून खासदार हेमंत गोडसे यांच्या मुलाचा जिल्हा परिषदेत पराभव झाला होता, त्यामुळं ग्रामपंचायत निवडणुकीत खासदार गोडसेंच्या संपूर्ण कुटुंबानं मोठी ताकद निवडणुकीत लावली होती.

हेमंत गोडसे हे खासदार होण्यापूर्वी जिल्हा परिषद सदस्य होते. खासदार झाल्यावर हेमंत गोडसे यांनी त्यांचे पुत्र अजिंक्य गोडसेंना जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं होतं. जिल्हा परिषद एकलहरे गटात हेमंत गोडसेंच्या मुलाच्या विरोधात शंकर धनवटे यांनी निवडणूक लढवली होती, त्यात अजिंक्य गोडसेंना पराभूत करून शंकर धनवटे विजयी झाले होते. त्याचाच हेमंत गोडसेंनी शंकर धनवटे यांचा पराभव करत जुन्या परभवाचा वचपा काढलाय.