विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या! यंदा अकरावी प्रवेशप्रक्रियेतील बदल जाणून घ्या; वाचा सविस्तर

सकाळ वृत्तसेवा 
Wednesday, 24 June 2020

  • प्रवेशप्रक्रियेच्या कालावधीतही कपात;
  • प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी रद्द

 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा दहावीचा निकाल लांबणीवर गेला आहे. यामुळे अकरावी प्रवेशप्रक्रियेत बदल करण्यात आला आहे. यानुसार दरवर्षी आयोजित होणारी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य फेरी रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर कमीत कमी कालावधीत प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल, असे नियोजन करण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. 

300 युनिटपर्यंत वीजबिले माफ करा! भाजपची राज्य सरकारकडे मागणी

अकरावीच्या नियमित फेऱ्या पार पडल्यानंतही महाविद्यालयात जागा शिल्लक राहिल्यास प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही फेरी राबविण्यात येत होती. मात्र यंदा कमी कालावधीत प्रवेशप्रक्रिया राबविण्याच्या दृष्टीने ही फेरी रद्द करण्यात आली आहे. गरज भासल्यास विशेष फेऱ्यांचे आयोजन करण्यात येईल, तसेच या फेऱ्यांना आरक्षण लागू नसेल, असे मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या अध्यादेशात स्पष्ट करण्यात आले आहे.

मुंबई महानगर परीक्षेत्रासह पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर, अमरावती, नाशिक, औरंगाबाद येथे अकरावीची प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन होणार आहे. दरवर्षी गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमांनुसार नियमित प्रवेश फेऱ्या, त्यानंतर रिक्त जागांवर गुणवत्तेनुसार प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्वावरील फेऱ्या आणि यानंतरही राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष प्रवेश फेऱ्या असे प्रवेश प्रक्रियेचे स्वरूप असते.

डाक विभागातील कोरोना बाध‍ितांच्या मदतीसाठी राज्यपालांचा पुढाकार; एक लाख रुपयांची मदत... 

दीड महिन्यात प्रक्रिया पूर्णतेचे नियोजन
जुनमध्ये सुरू झालेली प्रवेशप्रक्रिया वाढणाऱ्या प्रवेश फेऱ्या, विद्यार्थ्यांच्या तक्रारी यांमुळे अगदी ऑक्टोबरपर्यंत लांबते. यंदा जुलै अखेरीस दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पुढील दीड महिन्यात प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव, लांबलेले शैक्षणिक वर्ष यामुळे प्रवेश प्रक्रिया लवकर संपवणे आवश्यक आहे.

संपूर्ण प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन होणार
यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाइन करण्यात येणार आहे. प्रवेश प्रक्रियेचे माहिती पुस्तक उपलब्ध करून देणे, अर्ज भरणे यांपासून ते प्रवेश शुल्क भरणे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार असून त्या अनुषंगाने प्रणालीत बदल करण्यात आले आहेत. विदर्थ्यांना कागदपत्रेही ऑनलाइन अर्जात अपलोड करता येणार आहेत.

पालिकेच्या कॉलेजमध्ये पालिकेतील विद्यार्थ्यांना प्राधान्य
मुंबई आणि पुणे महापालिकेच्या कनिष्ठ महाविद्यालयांतील पन्नास टक्के जागा या पालिकेच्या शाळेतून दहावी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव राहणार आहेत. स्थानिक परिस्थिती, विद्याथ्र्याना होणारे लाभ, या मुद्द्यांची तपासणी करून संचालकांनी याबाबत निर्णय घ्यायचा आहे.

आरक्षणातील बदल
- मागील वर्षी सामाजिक, शैक्षणिक मागास प्रवर्गाकरता (एसईबीसी) गेल्यावर्षी 16 टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या होत्या.
- यंदा शासन निर्णयानुसार हे प्रमाण 12 टक्के करण्यात आले. 
- अपंग विद्यार्थ्यांसाठी 3 टक्के जागा राखीव ठेवण्यात येत होत्या. हे प्रमाण आता चार टक्के करण्यात आले आहे.

प्रवेश फेऱ्यांचे स्वरुप
-    द्वीलक्षी अभ्यासक्रमाचे प्रवेश शून्य फेरीत न करता नियमित फेरीत करण्यात येतील
-    नियमित फेऱ्यांनंतर आवश्यकतेनुसार विशेष प्रवेश फेऱ्या होतील.
-    विशेष फेऱ्यांतील प्रवेश आरक्षणाऐवजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होतील
-    नियमित फेऱ्यांमध्ये पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळूनही प्रवेश न घेतलेले विद्यार्थी विशेष फेरीमध्ये सहभागी होऊ शकतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Learn the changes in the eleventh admission process this year; Read detailed