राज्यात बहुतांश ठिकाणी 'बंद' शांततेत; व्यवहार थंडावले

टीम ई सकाळ
सोमवार, 5 जून 2017

राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत. त्यांचे पुतळे शेतकऱयांनी जाळले आहेत.

शेतकरी संपाचा पुढचा टप्पा म्हणून आज (सोमवार) पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला राज्याच्या कानाकोपऱयातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. काही ठिकाणी झालेले दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता राज्यात सर्व ठिकाणी बंद शांततेत पार पडत आहे. ठिकठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले असून दुध-भाजीपाल्याची आवक पूर्णपणे रोखली गेली आहे. शेतकऱयांनी राज्य सरकारला पहिल्यांदाच थेट आव्हान दिले आहे. कर्जमाफीसह स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी, हमीभाव, पेन्शन योजना आदी शेतकऱयांच्या प्रमुख मागण्या आहेत. 

सकाळी नाशिक जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा खंडीत केली. कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, म्हणून प्रशासनाने ही खबरदारी घेतली. यापूर्वी ऑक्टोबर 2016 मध्ये प्रशासनाने आधी घोषणा करून इंटरनेट सेवा खंडीत केली होती. मात्र, आज तशी कोणतीही सूचना दिली गेलेली नाही. दोन तासांच्या खंडानंतर नाशिक जिल्ह्यात मोबाईल डेटा सर्व्हिस सेवा अखेर सुरू करण्यात आली. 

राज्यात अनेक ठिकाणी रस्ते अडविले गेले आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली आहे. दुधाचे टँकर शहरांमध्ये पोहोचविण्यासाठी पोलिस यंत्रणांचा आधार दूध संघांना घ्यावा लागला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत अनेक ठिकाणी शेतकऱयांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत. त्यांचे पुतळे शेतकऱयांनी जाळले आहेत. 

पश्चिम महाराष्ट्र ठप्प
पुणे 
येथे शेतकऱयांच्या आंदोलनास पाठिंबा देणाऱया छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार यूनियनतर्फे बाजार बंद करणार आहेत. मागण्यांबद्दल लवकर निर्णय घेण्याची मागणी युनियनने केली आहे. बाबा आढाव यांच्या नेतृत्वाखाली संलग्न संघटनांची बैठक झाली. त्यात हा निर्णय झाला.

कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील व्यवहार ठप्प झाले आहेत. नांदणी (ता.शिरोळ) येथून राज्यातील भाजीपाला जातो. तेथे सकाळपासून शुकशुकाट आहे.

जयसिंगपूर येथून होणारी बस वाहतूक पूर्ण बंद आहे. मिरज, इचलकरंजी, कोल्हापूरकडे जाणारी बस वाहतूक बंद झाली आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यातील सात दूध संघातून मुंबईकडे टँकर रवाना झाले आहेत. एकूण 27 दुधाचे टँकर असून त्यांना पोलिसांच्या पाच वाहनांची सुरक्षा देण्यात आली आहे. मुंबईसह नवी मुंबई आणि अन्य भागात हे दूध दुपारपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

पेठवडगावमध्ये बाजार समितीला टाळे ठोकले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने हे आंदोलन केले आहे. व्यापाऱ्यांना स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला आहे.

चांदेकरवाडी (ता. राधानगरी) येथे वाहने अडवली आहेत. बेलवळे, बाचणी, वडकशिवाले येथे रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. कोल्हापूरच्या बाजार समितीत स्वाभिमानी संघटनेने भाजीपाला उधळला. कालच्या भाजीपाल्याची सुरू असताना संघटनेचे कार्यकर्ते समितीत पोहोचले. त्यांनी भाजीपाला उधळून टाकला. समितीत पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. 

सांगली शहरासह जिल्हाभर शेतकऱ्यांच्या बंदला प्रतिसाद मिळाला आहे. "अन्नदात्यासाठी एक दिवस बंद'च्या आवाहनाला प्रतिसाद देत सांगली शहरासह जिल्हाभरात आज बंद आंदोलन सुरु झाले आहे. अपवाद वगळता बहुतांश पेठांनी शटर डाऊन करत शेतकऱ्यांच्या संपाला पाठींबा दर्शविला आहे. सांगली, मिरज, इस्लामपूर, विटा, तासगाव या प्रमुख मोठ्या शहरांसह जिल्ह्यातील बहुतांश गावांत आंदोलन सुरु आहे. दूध संकलन बंद ठेवून बहुतांश संघांनी आंदोलनात सहभाग घेतला आहे. या काळात जिल्हाभरातून शांततेत आंदोलन करण्यात येत आहे. एसटी किंवा खासगी वाहने अडविण्याचा प्रयत्न करू नका, असे आवाहन आधीच करण्यात आले होते. त्यामुळे तोडफोड किंवा तीव्र आंदोलनाची गरज भासली नाही. 

सातारा येथे महाराष्ट्र बंदला १०० टक्के प्रतिसाद आहे. सातारा शहरातील बाजारपेठ पूर्णत: बंद आहे. मार्केट यार्ड तसेच तिन्ही प्रमुख भाजी मंडईत शुकशुकाट आहे.

बारामती येथे शेतकरी मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी व्यापा-यांनी आपली दुकाने बंद ठेवली. सर्व संघटना व संस्थांनीही या बंदमध्ये सहभागी होत आपला पाठिंबा जाहिर केला. कालच बारामतीतील व्यापा-यांनी शेतक-यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी बारामती बंदमध्ये सहभागी व्हायचा निर्णय घेतला होता. आज त्या नुसार सकाळपासूनच सगळी दुकाने बंद होती. अत्यावश्यक सेवांना मात्र या बंदमधून वगळण्यात आले होते. त्यामुळे या सेवा सुरळित सुरु होत्या. 

उत्तर महाराष्ट्रात वाढली संपाची धग 
नाशिक
 हा प्रयोगशील आणि लढवय्या शेतकऱ्यांची कृषीपंढरी म्हणून राज्यभर ओळखला जातो. नाशिक जिल्ह्यातील बहुतांश गावे सलग आज पाचव्या दिवशी कडकडीत बंद राहिली आहेत. आठवडे बाजार भरले नाहीत. एवढेच नव्हे, तर आज थेट सरकारला आव्हान देत प्रतिकात्मक पुतळ्याची गावा-गावांमधून अंत्ययात्रा काढत नदीकाठी अग्निडाग देण्यात आला आहे. रस्त्यावर उतरुन भाजीपाला-दुधाची वाहने रोखत शेतकऱ्यांनी संपाची धार वाढवली. जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या पाचव्या दिवशी बंद राहिल्याने पाच दिवसांमधील शेतमालाची 132 कोटींची उलाढाल ठप्प झाली आहे. त्याचबरोबर मुंबई आणि गुजरातला दिवसाला जाणाऱ्या 2 हजार टन भाजीपाला-कांदे-दुधाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. नाशिकमधील हॉकर्स आणि टपरीधारक संघटनेने बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने शहराच्या विविध भागामध्ये संपाच्या काळात मिळणाऱ्या फळभाज्या शहरवासियांना मिळणे मुश्‍कील झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात शेतकरी संघटनासह सर्व पक्षीयांनी आयोजित केलेल्या महाराष्ट्र बंदला समिश्र प्रतिसाद मिळत आहे. बाजार समितीतील आवक आज कमी झाली, भडगाव, कजगाव येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. तर काही ठिकाणी संघटनातर्फे दुपारी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील भडगाव तालुक्‍यातील भडगाव, कजगावात कडकडीत बंद पाळण्यात आला.

अकोल्यात दोनशेवर अटकेत
बुलडाणा 
जिल्ह्यातील टुनकी गावकऱ्यांनी पाठिंबा देत गाव बंद ठेवले आहे. मानवत येथे शेतकऱ्यांनी सकाळी बाजारपेठेतुन दुचाकी फेरी काढली.

अकोला जिल्ह्यात व्याळा, घुसर, वाडेगांव येथे रास्ता रोको आंदोलन तीव्र झाले आहे. व्याळा येथ शेतकरी जागरमंच व इतर संघटनेच्या कार्यकत्यांसह २०० शेतकऱ्यांना अटक झाली आहे. घुसर येथेही कार्यकर्ते, शेतकऱ्यांना अटक करण्यात आली. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही आंदोलन पेटले. शेतकर्‍यांनी मुंबई- कोलकता हायवे रोखला आहे.

नागपूर येथे जय जवान जय किसान संघटनेने दुधाचे टँकर अडवून दूध रस्त्यावर फेकले, महाराष्ट्र बंदला नागपूर शेतकरी संघटना आणि शेतकऱयांकडून प्रतिसाद आहे. 
नागपूर जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफी साठी आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र बंदला प्रतिसाद आहे. काटोल राज्य महामार्ग रोखून धरला आहे. भाजीपाला आणि दूध रस्त्यावर फेकले असून रस्त्यावर टायर जाळले आहेत. 

मराठवाड्यात शुकशुकाट
औरंगाबाद 
कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळभाजीपाला मार्केट पुर्णपुणे ठप्प झाले असून सकाळी काही प्रमाणात दुकाने उघडल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मराठा संघटनांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी दुकाने बंद केली. त्यामुळे फळभाजीपालासह, धान्य यार्डातील मार्केट शंभर टक्के बंद झाले. औरंगाबाद शहराला फळ, भाजीपाला, धान्यांचा औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधूनच पुरवठा होता. संप असल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी भाजीपाला आणलाच नव्हता मात्र सकाळच्या सत्रात काही प्रमाणात भाजीपाला विक्री होत असल्याची माहिती मिळताच काँग्रेसचे माजी आमदार कल्याण काळे, मराठा संघटनांचे माणिक शिंदे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी बाजार समिती येऊन सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे जे ग्राहक खरेदीसाठी बाजारात आले होत त्यांना माघारी जावे लागले. औरंगाबाद बाजार समितीमध्ये धान्याची मोठ्या प्रमाणात आवक, विक्री होत मात्र संप असल्याने धान्याच्या गाड्या आल्याच नाहीत. संपामुळे धान्य मार्केट यार्डाला कुलुप लावण्यात आले होते. हिंगोलीत बंदला मोठा प्रतिसाद आहे. तेथे शिवसेनेने भजन आंदोलन केले आहे. बाजारपेठ बंद आहे.

हिंगोली जिल्ह्यातील येहळेगाव येथे शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी जाळपोळ करत रास्ता रोको आंदोलन केले. आखाडा बाळापूर मार्गावर 5 बसच्या काचा फोडल्याचे वृत्त आहे. 

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूरात शेतकरी संपाला पाठिंबा आहे. शहरात कडकडीत बंद आहे. शहरातील सर्व व्यवहार ठप्प आहेत. 

परभणी जिल्ह्यातील पालममध्ये बंदला ऊत्स्फुर्त प्रतिसाद आहे. व्यापाऱयांनी आपली दुकाने बंद ठेवत बंदला पाठिंबा दिला. मानवत शहरातील महाराणा प्रताप चौकात शेतकरी नेत्यांनी सभा घेउन संपूर्ण कर्ज माफीची मागणी केली. शेतकऱ्यांनी सकाळी बाजारपेठेत आलेला भाजीपाला रस्त्यावर फेकुन देत आंदोलन केले.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
नाशिकमध्ये वाढली शेतकरी संपाची धग
जळगाव जिल्ह्यात बंदमुळे बाजारातील आवक कमी
कोल्हापूरच्या 3000 वकिलांचा शेतकऱयांच्या राज्यव्यापी बंदला पाठिंबा 
औरंगाबाद बाजार समितीतील व्यवहार ठप्प

ज्येष्ठ पत्रकार प्रणव रॉय यांच्या निवासस्थानी छापे
काश्मीर: सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला करणारे 4 दहशतवादी ठार
महाराष्ट्र 'बंद' यशस्वी करण्याचा शेतकऱ्यांचा निर्धार
#स्पर्धापरीक्षा - भारताची संपूर्ण स्वदेशी उपग्रह यंत्रणा 'नाविक'​
'दानवेंच्या शेतकऱ्यांसंदर्भातील वक्तव्याचा तपास करा'
मॉन्सूनचे महाराष्ट्रात गुरुवारी आगमन​

Web Title: Maharashtra breaking news Marathi news farmer called for bandh