नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसच्या गटनेतापदी संजय महाकाळकर यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. आज काँग्रेसकडून महानगरपालिकेतील आपल्या गटाची अधिकृत नोंदणी केली जात असून यासाठी नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी दहाच्या सुमारास प्रक्रिया पार पडत आहे. या गटनोंदणीसाठी काँग्रेसच्या सर्व नगरसेवकांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
प्रभाग तीस मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले संजय महाकाळकर यांची गटनेतापदी निवड निश्चित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ज्येष्ठता, संघटनात्मक अनुभव आणि नागपूरमधील जातीय समीकरणांचा विचार करता त्यांच्या नावावर पक्षात एकमत झाल्याची माहिती मिळते. नागपूरातील काँग्रेसचा प्रमुख चेहरा म्हणून संजय महाकाळकर यांच्या नावाला प्रदेशाध्यक्ष आणि शहराध्यक्षांची पसंती असल्याचाही दावा केला जात असून आजच्या गटनोंदणीनंतर यावर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.