धक्कदायक! राज्य पोलिस दलात अनेक कर्मचाऱ्यांकडे बोगस क्रीडा प्रमाणपत्र, भावी पोलिस उपनिरीक्षकाचाही समावेश

many of the maharashtra police employees have bogus sports certificate
many of the maharashtra police employees have bogus sports certificate

नागपूर : राज्यातील पोलिस विभागातही स्पोर्ट्स कोट्यातून नोकऱ्या मिळविणाऱ्यांमध्ये काहींनी बनावट क्रीडा प्रमाणपत्र जोडून पोलिस शिपाई पदावर नोकरी मिळविली असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. क्रीडा विभागाने खेळांच्या स्पर्धा कालावधी आणि क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी सुरू केल्यानंतर हा प्रकार समोर आल्याचे धक्कादायक वृत्त हाती आले आहे. यापूर्वी सांगलीचे संजय सावंत या तरुणाने एमपीएससीमधून पोलिस उपनिरीक्षक पदाची परीक्षा पास केल्यानंतर त्याचे क्रीडा प्रमाणपत्र बोगस आढळले होते. संजय सावंतला अटक केली असून तो सध्या मध्यवर्ती कारागृहात बंद आहे.

विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पोलिस विभागासह अन्य विभागात स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी दिली जाते. यामध्ये राज्यस्तर, राष्ट्रीय स्तर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध खेळांच्या स्पर्धा खेळविल्या जातात. खेळाडूंना प्रोत्साहन मिळून खेळांना चालना मिळावी या उद्देशाने शासकीय विभागात खेळाडूंसाठी राखीव कोटा ठेवून नोकरी दिली जाते. परंतु, काही तरुणांनी नोकरी मिळविण्यासाठी क्रीडा संघटनांच्या माजी पदाधिकाऱ्यांशी आर्थिक व्यवहार करून  बनावट क्रीडा प्रमाणपत्र बनविले आहे. त्या बोगस क्रीडा प्रमाणपत्रावर पोलिस दलात नोकऱ्या मिळविल्या आहेत. त्यामुळे खऱ्या खेळाडूंवर अन्याय झाला असून ते खेळाडू नोकरीपासून वंचित राहिले आहेत. हा प्रकार लक्षात येताच 'सकाळ'ने वृत्तमालिका प्रकाशित करीत बनावट क्रीडा प्रमाणपत्र घोटाळा उघडकीस आणला.

मानकापूर पोलिसांनी आतापर्यंत क्रीडा अधिकाऱ्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करून अटक केली आहे. पोलिस दलात नोकरी मिळविण्यासाठी राज्यातील काही तरुणांनी बोगस क्रीडा प्रमाणपत्र जोडून नोकरी मिळविल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. त्यामुळे आता क्रीडा विभाग खेळांच्या प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करणार आहे. यामध्ये आढळलेल्या बोगस क्रीडा प्रमाणपत्रधारक पोलिस कर्मचाऱ्यांची नावे पोलिस विभागाला कळविणार आहेत. त्यानंतर मानकापूर पोलिस ठाण्यात दोषी पोलिस कर्मचाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

क्रीडा संघटनांनी घ्यावा पुढाकार -
प्रत्येक खेळांच्या राज्य संघटनांकडे स्पर्धेतील खेळाडूंची यादी असते. राज्य किंवा राष्ट्रीय संघात अधिक खेळाडू ठेवण्यासाठी पैशाची ऑफर पदाधिकाऱ्यांना देण्यात येते. अशा आमिषांना क्रीडा संघटनांनीही बळी पडू नये. तसेच संघटनेच्या नावाचा वापर करून बनावट क्रीडा प्रमाणपत्र बनवित असतील तर त्यालाही प्रतिबंध घालावा. जेणेकरून खऱ्या खेळाडूंवर अन्याय होणार नाही.

बनावट क्रीडा प्रमाणपत्रावर शासकीय नोकरी मिळविणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करणे सुरू आहे. पोलिस विभागासह कोणत्याही शासकीय विभागात जर बोगस प्रमाणपत्र वापरल्याचे उघडकीस आले तर निश्‍चितच गुन्हे दाखल करू. संबंधित क्रीडा विभाग क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी करीत आहे. त्यांनी दिलेल्या अहवालानंतर गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल.
- कृष्णा शिंदे, पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे मानकापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com