Unseasonal Rain Damage: अवकाळीग्रस्तांच्या मदतीसाठी विशेष पॅकेजचा प्रस्ताव : मंत्री अनिल पाटील

anil patil
anil patilesakal

Unseasonal Rain Damage : राज्यात अवकाळीचा सर्वाधिक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे करून येत्या शनिवार (ता. २)पर्यंत अंतिम अहवाल राज्य शासनाकडे सादर करावा.

या अहवालाच्या आधारे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडणार असल्याची ग्वाही राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांनी नाशिकमध्ये दिली.

रविवारी (ता. २६) झालेल्या गारपिटीसह अवकाळी पावसामुळे राज्यात ८५ हजार हेक्टरचे नुकसान झाले. त्यात नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ३४ हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. (Minister Anil Patil statement Special package proposed to help unseasonal rain victims news)

मंत्री अनिल पाटील यांनी मंगळवारी (ता. २८) निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेटी देत पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात नुकसानीचा आढावा घेतला. या वेळी पाटील म्हणाले, की नुकसानीची तीव्रता पाहता एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी शेतकऱ्‍यांना सोबत घेऊन पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शनिवारपर्यंत नुकसानीचा अंतिम अहवाल सादर करण्याचे प्रशासनाला निर्देशित करण्यात आले असून, हा अहवाल प्राप्त झाल्यावर शेतकऱ्यांना मदतीसाठी विशेष पॅकेज देण्यासाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. मदतीचे निकष बदलण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. निकष बदलण्याबाबतचा विषय हा केंद्राच्या पातळीवर घेतला जातो. यासाठी समिती स्थापन करून केंद्राशी चर्चा केली जाईल.

राज्यात निकषाबाहेर काही करायचे असेल तर मुख्यमंत्र्यांना याबाबतचे अधिकार असतात. त्यानुसार मुख्यमंत्र्यांशीही चर्चा करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी खासदार हेमंत गोडसे, आमदार दिलीप बनकर, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज अहिरे, जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे आदी उपस्थित होते.

दुष्काळग्रस्तांसाठी दोन हजार ६०० कोटींची मागणी

राज्यात यंदा दुष्काळ असल्याने जनतेला मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडे दोन हजार ६०० कोटी रुपयांची मागणी राज्य सरकारने केली आहे. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांनाही केंद्र सरकारने मदत करावी, अशी मागणी आम्ही करणार असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले.

anil patil
Nashik Unseasonal Rain Damage: येवल्याच्या उत्तर भागात कोट्यवधीचे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

जिल्ह्यातील नुकसानीचे आकडे

- सुमारे ३४ हजार हेक्टरवरील पिकांना फटका

- १२२ पैकी ६६ महसूल मंडळांत अवकाळीचा तडाखा

- सुमारे १२ हजार हेक्टरवरील द्राक्षबागा आडव्या

- १० हजार हेक्टरवरील कांदा पिकाचे नुकसान

- ९२७ गावांतील ७० हजार शेतकरी बाधित

- २०६ घरांचे अंशतः, ३१ घरांचे पूर्णपणे नुकसान

- ५० लहान, १५ मोठी जनावरे मृत

मंत्री पाटील काय म्हणाले..?

- राज्यात १६ जिल्ह्यांत ८५ हजार हेक्टर क्षेत्राचे नुकसान

- राज्यात सर्वाधिक नुकसान नाशिक जिल्ह्यात

- नाशिक, जळगावमध्ये फळपिकांचे नुकसान

- खास पॅकेज देण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

- अंतिम अहवाल मंत्रिमंडळात मांडणार

- निकष बदलण्यासाठी केंद्र सरकारशी चर्चा करणार

- राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांचे आदेश

- दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्राकडे दोन हजार ६०० कोटी रुपयांची मागणी

- मदतीचे प्रलंबित प्रस्ताव लवकरच निकाली काढणार

- गेल्या चार महिन्यांत प्रलंबित निधी अदा केला

anil patil
Nashik Unseasonal Rain Damage: इगतपुरीत 30, तर त्र्यंबकेश्वरमध्ये 46 मिमी पाऊस! ढगाळ वातावरणामुळे कीडरोगांचा धोका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com