
Raj Thackeray : शिंदेंना टोला, ठाकरेंवर टीका अन् "लाव रे तो व्हिडीओ; सभेतले महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आजही सभाही इतर सभांप्रमाणेच मोठ्या जनसमुदायाच्या समोर पार पडली. या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं. या सभेत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला आहे. तसंच राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांना काही सूचना केल्या असून काही तक्रारीसुद्धा त्यांनी या व्यासपीठावरुन केल्या आहेत.
राज ठाकरे आजच्या सभेमध्ये कोणकोणते मुद्दे मांडणार यावर चर्चा सुरू होती. या सभेमध्ये राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख करतानाचा एक किस्साही सांगितला आहे. त्यानंतर त्यांनी नारायण राणे यांच्या शिवसेना सोडण्याच्या घटनेला उजाळा दिला. पुढे त्यांनी जावेद अख्तर यांचा एक व्हिडीओ दाखवून कौतुक केलं. मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्द्याला हात घालत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी मुख्यमंत्री शिंदेंकडे केली. माहिमच्या दर्ग्याचा मुद्दाही त्यांनी व्हिडीओमधून दाखवून दिला.
या सभेतले काही ठळक मुद्दे खालीलप्रमाणे :
"मला कारण नसताना त्रास दिला जात होता"; उद्धव ठाकरेंवर आरोप
उद्धव ठाकरे यांना शिवसेना पक्षप्रमुख करण्याआधीचा एक किस्सा राज ठाकरे यांनी सांगितला. त्यातून त्यांनी आपल्याला मुद्दाम त्रास दिला गेल्याचा आरोपही उद्धव ठाकरेंवर केला आहे. राज ठाकरे म्हणाले की, मी उद्धवसोबत हॉटेलमध्ये गेलो, त्याच्याशी बोललो, त्याला काय हवंय, पक्षप्रमुख व्हायचंय की मुख्यमंत्री हे विचारलं. आणि मला फक्त प्रचारासाठी बाहेर काढू नकोस एवढंच सांगितलं. मला उद्धव म्हणाला की मला काहीही प्रश्न नाहीत, मग मी बाळासाहेबांना सांगितलं की सगळी समस्या सुटली, आता आमच्यात वाद नाहीत. बाळासाहेबांनी मला उद्धवला बोलवायला सांगितलं. मी बोलावलं पण तो तिथून निघून गेलेला. मला कारण नसताना त्रास दिला गेला, मी पक्षातून बाहेर पडावं यासाठी प्रयत्न केले गेले.
नारायण राणेंनी शिवसेना का सोडली?
नारायण राणेंनी शिवसेना सोडली नसती, असं सांगताना राज ठाकरे म्हणाले, "राणे पक्ष सोडणार हे कळल्यावर मी राणेंना फोन केला. ते मला म्हणाले की नाही जायचंय. मी त्यांना सांगितलं की मी बाळासाहेबांशी बोलतो. बाळासाहेबांना फोन केल्यावर ते म्हणाले की राणेला घेऊन ये. थोड्या वेळाने पुन्हा फोन आला की नको आणू. मला कळलं की त्यांच्या मागून कोणीतरी बोलतंय. मग मला राणेंना पुन्हा सांगायला लागलं की तुम्ही येऊ नका आणि मग पुढे सगळं काही घडलं. लोकांनी बाहेर पडावं अशी परिस्थिती मुद्दाम निर्माण केली. आणि त्याचा शेवट हा असा झाला."
"उद्धव जिथे सभा घेईल तिथे पुन्हा सभा घेत बसू नका, काम करा"; एकनाथ शिंदेंना टोला
राज ठाकरेंनी आजच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनाही चांगलंच सुनावलं आहे. धनुष्यबाणाच्या वादावरही त्यांनी भाष्य केलं आहे. त्याबद्दल बोलताना राज ठाकरे म्हणाले, "ते फक्त धनुष्य नाही तर शिवधनुष्य आहे. ते बाळासाहेबांच्या शिवाय कोणाला झेपणार नाही. एकाला ते झेपलं नाही आणि एकाला झेपेल की नाही माहित नाही."
राज ठाकरे पुढे शिंदेंना सुनावताना म्हणाले, "मुख्यमंत्री शिंदेंना एकच सांगणं आहे की जरा काम करा. उद्धव जिथे सभा घेईल तिथे पुन्हा सभा घेऊ नका. राज्यात बरेच विषय प्रलंबित आहे, पेन्शनचा विषय आहे, शेतकऱ्यांचा विषय आहे. अवकाळीनंतर शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यांना भेटा. सभा कसल्या घेता? एकदा काय तो त्यांचा विषय मिटवून टाका."
मला असे मुस्लीम हवे आहेत; राज ठाकरेंनी थेट व्हिडीओ दाखवूनच सांगितलं!
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान बोलताना जावेद अख्तरांचा एक व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये जावेद अख्तर यांनी पाकिस्तानवर आणि तिथल्या दहशतवादी कारवायांवर टीका केली आहे. हा व्हिडीओ दाखवून बोलताना राज ठाकरेंनी आपल्याला असे मुस्लिम हवे आहेत, असं म्हटलं आहे.राज ठाकरे म्हणाले, "मला जावेद अख्तरांसारखे मुस्लिम हवे आहेत. त्यांनी पाकिस्तानात जाऊन सांगितलं. आमच्या शहरावर हल्ला झालेला आम्ही विसरणार नाही. तिथे जाऊन त्यांनी सांगितलं. मला असेल मुस्लिम लोक हवे आहेत."
माहीमच्या दर्ग्यावरुन राज ठाकरेंचा सरकारला अल्टिमेटम
माहीमच्या मगदूम बाबाच्या दर्ग्यासमोर अनधिकृतरित्या झेंडे लावून अतिक्रमण होत असल्याचं राज ठाकरेंनी निदर्शनास आणून दिलं आहे. मुंबईच्या समुद्रात अनधिकृतरित्या झेंडे लावले जात आहेत. माहीम पोलिस स्टेशन जवळ आहे पण लक्ष नाही. महानगरपालिकेचे लोक तिथे जातात, परंतु बघितलं जात नाही. समुद्रात नवीन हाजी अली करणार असाल तर याद राखा. प्रशासन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिस आयुक्त, मनपा आयुक्त यांना मी आजच सांगतो महिन्याभराच्या आत कारवाई झाली नाही, ते तोडलं गेलं नाही तर त्याच्या बाजूला सगळ्यात मोठं गणपती मंदिर उभारल्याशिवाय राहणार नाही. मग काय व्हायचंय ते होऊन जावू दे. सगळ्यांकडे दुर्लक्ष करीत असाल तर आमच्याकडेही दुर्लक्ष करा. तुम्हाला सांगतो, हे राज्य माझ्या हातात आलं तर सुतासारखं सरळ करेन, असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.