'तुम्ही विदर्भातले वाघ'; नाना पटोले यांचं सभागृहात अभिनंदन 

nanabhau.jpg
nanabhau.jpg

मुंबई : विधानसभा अध्यक्षपदी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे नाना पटोले यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर नाना पटोले विधानसभा अध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यानंतर सभागृहातील ज्येष्ठ नेत्यांनी नाना पटोले यांचे अभिनंदन केले. त्यात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी नाना पटोले यांचा उल्लेख विदर्भातील वाघ असा केला. 

उद्धव ठाकरे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे म्हणाले, 'विधानसभा अध्यक्षपदावर नाना पटोले तुमच्या सारखा एक लढवय्या नेता विराजमान होत आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. तुमच्या सारखी शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातून व्यक्ती इथंवर आली याचा अभिमान आहे. सभागृहं काय असतं हे काल पाहिलं. त्यामुळं तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे. तुमच्यावरची जबाबदारी तुम्ही योग्यरित्या पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करतो.' 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'नाना पटोले तुमचे आमचे संबंध चांगले आहेत. तुम्ही आणि आम्ही एकत्र आणि विरोधात काम केले आहे. त्यामुळं तुम्हाला दोन्ही बाजू महिती आहेत. दोन्ही बाजूंच्या अपेक्षा, जमेच्या बाजू आपल्याला आपल्या माहिती आहेत. मुळात विरोधी पक्षाला आधार अध्यक्षांचा असतो. त्यामुळं तुम्ही डाव्या कानांनी जास्त ऐकावं आणि उजव्या कानांनी कमी ऐकावं, उजवीकडे कमी पहायचं, डावी कडे जास्त पहायचं, अशी अपेक्षा आहे. लोकहितासाठी जे जे मांडण्याचा प्रयत्न करू, त्यावेळी तुम्ही आमची दखल घ्या, ही अपेक्षा आहे.'

जयंत पाटील काय म्हणाले?
पटोले यांच्या निवडीनंतर बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले, ''विरोधी पक्षांनी आज घेतलेल्या समजुतदारपणाचे मी कौतुक करतो. काल झालेले डॅमेज आज त्यांनी भरून काढले आहे.
आज झालेल्या निवडीचे मी अभिनंदन करतो. नानाभाऊ यांनी कायमच शेतकरी हिताची भूमिका घेतली आहे. त्यांनी विदर्भांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न कायमच मांडले आहेत व त्यांसाठी ते लढले आहेत. शेतकऱ्सायाठी न्याय देता येत नसल्याने त्यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता.''  जयंत पाटील पुढे म्हणाले, सभागृह अध्यक्षांना डाव्या बाजूने ऐकायला येत नाही. असे म्हणताच सभागृहात हशा पिकला. विरोधी पक्षनेता कोण होणार याबद्दल आम्हाला औत्सुक्य आहे. पण मला अजून त्यांच्यात एकमत झाले की नाही याबद्दल प्रश्न आहे. असे म्हणताच विरोधक व सत्ताधारी पक्षात हास्याचे फवारे उडाले.

बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, ''मी नानाभाऊ यांचे अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो. हे सभागृह सांभाळण्यासाठी कामकाज चांगले करण्यासाठी चांगल्या नेत्याची गरज होती. आम्ही चर्चा करताना एकाच नावावरती येऊन थांबत होतो. ते म्हणजे नानाभाऊ पटोले. या झालेल्या निवडीला सर्वांनी एकमताने पाठिंबा दिला. शेतकऱ्यांच्या हितासाठी या लढणाऱ्या नेत्याची निवड अध्यक्ष म्हणून झाल्याने आम्हाला आनंद आहे. ही निवड यथायोग्य झाली आहे. मध्यंतरी नानाभाऊ भाजपमध्ये गेले खासदार झाले. पण त्यांना तेथील वातावरण मानवले नाही, हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिथे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत, हे लक्षात येताच राजीनामा देऊन परत आपल्यात परतले.''

अजित पवार काय म्हणाले?
अजित पवार म्हणाले, ''नानाभाऊ पटोले यांची सभागृहाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने मी त्यांचे अभिनंदन करतो. विरोधकांनी देखील सांमजस्यपणाची भूमिका घेतली, त्यांचेही मी कौतुक करतो.
सभागृहाची उंची तुम्ही नक्की वाढवाल यात मला तीळमात्र शंका नाही. तुमच्याकडून शेतकऱ्यांच्या मोठ्या अपेक्षा आहेत, त्या तुम्ही पुर्ण कराल यात देखील कोणालाही काहीच शंका असण्याचे कारण नाही. तुम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक आंदोलने केली आहे. तुम्ही हे एवढे मोठे सभागृह चालविण्यात कुठेही कमी पडणार नाही. तुमच्यावर खुप मोठी जबाबदारी आहे. सर्व सदस्यांना समान न्याय मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com