उदयनराजेंना टक्कर देणाऱ्या नरेंद्र पाटलांनी घेतली पवारांची भेट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात विशेष घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

सातारा : उदयनराजे भोसले यांचा भाजपप्रवेश होत असताना माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शनिवारी (ता. 14) राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांची भेट घेतली. त्यामुळे आता साताऱ्याच्या राजकारणात विशेष घडामोडी घडण्याची शक्यता आहे.

माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आमची त्यांच्याशी पूर्वनियोजित भेट ठरली होती. त्यानुसार ही भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले असले तरी सध्या राजकीय घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. कारण पाटील यांनी यापूर्वी उदयनराजेंविरोधात लोकसभेची निवडणूक लढवून चार लाख 46 हजारांवर मते घेतली होती. 

उदयनराजे म्हणतात, माझं नाव काय माहिती आहे का?

उदयनराजेंनी भोसले यांनी राष्ट्रवादीसोडून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता या जागेची पोटनिवडणूक विधानसभेसोबतच घेण्याचे सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहेत. त्यामुळे या मतदारसंघात राजकीय हालचालींना गती आली आहे. उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे.

उदयनराजे पुन्हा विक्रमी मतांनी निवडून येतील : फडणवीस

सध्यातरी राष्ट्रवादीकडून माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील, जिल्हा बॅंकेचे संचालक नितीन पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांची नावे घेतली जात आहे. यासोबतच आघाडीचा उमेदवार म्हणून कॉंग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचाही उमेदवारीसाठी राष्ट्रवादीकडून विचार होऊ शकतो. या सर्व घडामोडीच्या पार्श्‍वभूमीवर आज शिवसेनेचे नेते व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांची भेट घेतली. ही भेट माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर होती असे ते सांगत असले तरी उदयनराजेंनी भाजप सोडण्यास आणि नरेंद्र पाटील यांनी पवारांची भेट घेण्याचा योगायोग कसा, असा प्रश्‍न राजकीय वर्तुळातून उपस्थित होऊ लागला आहे.

महाराष्ट्राचं गेलेलं वैभव फडणवीसांनी कष्ट करुन परत आणलंय : अमित शहा

यासंदर्भात पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ही भेट केवळ योगायोग असून, माथाडी कायद्याला 50 वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने पवार यांच्याशी आमची भेट घेण्याचे ठरले होते. त्यानुसार ही भेट असून आजच उदयनराजेंनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे या भेटीचा केवळ योगायोग आहे. मी मुख्यमंत्र्यांचा विश्‍वासू माणूस असल्याने मी कशाला गडबड करू, असे सांगून साताऱ्याच्या जागेचा निर्णय पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे.

शिवरायांच्या विचाराप्रमाणे भाजपचे कार्य : उदयनराजे

साताऱ्याची जागा शिवसेनेच्या वाट्याची आहे. उद्या निवडणूक लागली तर कोणत्या चिन्हावर ही निवडणूक लढविली जाईल, हे नेते ठरवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Narendra Patil meet Sharad Pawar