'हॅलो मोदीसाहेब रोहित पवार बोलतोय, नाव ऐकलचं असेल'

टीम ई-सकाळ
Friday, 17 January 2020

संगमनेरमध्ये राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने युवा आमदारांशी संवाद या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं

संगमनेर (नगर) :  व्यासपीठावर धीरज देशमुख, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील आणि रोहित पवार होते. घराणेशाही, महाविकास आघाडीचं सरकार, महाराष्ट्रापुढचे प्रश्न या सगळ्यांवर चर्चा सुरू होती. या चर्चेच्या दरम्यान रोहित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. फोनवर त्यांच्याशी बोलताना, रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यापुढं तरुणांच्या प्रश्नांची मालिका मांडली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

संगमनेरमध्ये राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वतीने युवा आमदारांशी संवाद या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. व्यासपीठावर धीरज देशमुख, आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, झिशान सिद्दीकी, ऋतुराज पाटील आणि रोहित पवार हे युवा नेते उपस्थित होते. अवधूत गुप्ते यांनी या सगळ्यांनी महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती आणि त्यांची विकासकामांबाबतची भूमिका यावर चर्चा केली. सर्व युवा नेत्यांनी अतिशय स्पष्टपणे प्रश्नांची उत्तरे दिलीत. अवधुत गुप्ते यांनी खुमासदार शैलीत त्यांना प्रश्न विचारले. त्यामुळं कार्यक्रमाची रंगत वाढत गेली. 

कोणी कोणाला फोन केला?
अवधूत गुप्ते यांच्या खुपते तिथं गुप्ते या कार्यक्रमातील एका सेगमेंटप्रमाणे, या कार्यक्रमातही मॅजिक फोन देण्यात आला होता. यात एखाद्या व्यक्तीला फोन केल्याचं दाखवून, त्याला आजवर जे बोलता आलेलं नाही, ते बोलायचं, अशी अटक होती. ऋतुराज पाटील यांनी पत्नीला फोन केला आणि 'लग्नानंतर निवडणुकीमुळं तुला वेळ देता आला नाही, आता तुला वेळ देईन', अशी ग्वाही दिली. आदिती तटकरे आणि आदित्य ठाकरे यांनी कॉन्फरन्स कॉल करून, सोनिया गांधी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी संवाद साधला. पाच वर्षे काम करण्याची संधी देण्याचं आवाहन त्यांनी केलं. 

आणखी वाचा - उदयनराजेंना 'तो' शब्द खरा करण्याची संधी

काय म्हणाले रोहित पवार?
रोहित पवार यांनी मात्र वेगळा फोन केला. त्यांनी सुरुवातच चिमटे काढून केली. जे व्यक्ती सहसा भेटत नाहीत त्यांना फोन केला तर चालतो का? असं विचारत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन लावला. 'मोदीसाहेब रोहीत पवार बोलतोय, नाव ऐकलच असेल', अशी सुरुवात रोहित पवार यांनी केली. ते म्हणाले, 'महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीचं सरकार आलंय जो पाच वर्षे विकास झाला नव्हता तो होईलच. आमच्या या युवक-युवतींना भविष्यात नोकरी मिळावी. केंद्र सरकार म्हणून, तुमची जबाबदारी मोठी आहे. तुम्ही ते पार पाडाल, असा विश्वास आहे. सध्या केंद्राचं इंडस्ट्रीयल धोरण थोडं बदलावं लागतंय, असं वाटतंय. तुम्ही कराल असं वाटतंय. आम्ही इथे सगळे आनंदी आहोत. पण, युवकांचे प्रश्न सोडवायला पाहिजेत. आपण लक्ष द्याला, अशी अपेक्षा व्यक्त करतो. 'आता चारच वर्षे राहिली आहेत,' असं म्हणत त्यांनी भाजपला चिमटाही काढला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader rohit pawar calls pm narendra modi sangamner ngara yuva aamdar savad