'फडणवीसांमुळं भाजपच्या 105 जागा आल्या नाहीत'

टीम ई-सकाळ
सोमवार, 2 डिसेंबर 2019

देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनमध्ये सत्तेचा दर्प होता. मुळात लोकांना असं आवडत नाही. मी म्हणजे महाराष्ट्र, असा त्यांचा वावर होता. ः शरद पवार 

मुंबई : महाराष्ट्रात भाजपला 105 जागा मिळाल्या आणि भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. पण, हे यश देवेंद्र फडणवीस यांचं नाही. राज्यात भाजपच्या मागं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद भाजप मागे होती, असं स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. एका वृत्तवाहिनीला पवार यांनी विशेष मुलाखत दिली. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांच्या निवडणूक प्रचारातील वर्तनावर स्पष्ट मतं व्यक्त केली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

फडणवीसांचं काय चुकलं?
फडणवीस सतत मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन म्हणत होते. त्यावर शरद पवार म्हणाले, 'राजकारणात मी पुन्हा येईन म्हणणं हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण, देवेंद्र फडणवीस यांच्या मी पुन्हा येईनमध्ये सत्तेचा दर्प होता. मुळात लोकांना असं आवडत नाही. मी म्हणजे महाराष्ट्र, असा त्यांचा वावर होता. मुळात महाराष्ट्राच्या जडणघडणीत त्यांचं काही योगदान नाही. ते नागपूरचे महापौर होते, हे त्याचं तिकडचं योगदान. सभागृहातील एक अभ्यासू सदस्य एवढीच त्यांची ओळख होती. पण, निवडणुकीत त्यांची वक्तव्य सत्तेचा दर्प दाखवत होती. महाराष्ट्रातील लोकांना असलं आवडत नाही. भाजप राज्यात सिंगल लार्जेस्ट पार्टी आहे. मान्य करावं लागेल. पण, हे फडणवीसांमुळे नाही. तर मोदींना मानणारा वर्ग त्यांच्या पाठिशी उभा राहिला म्हणून, हे शक्य झालं.'

बुलेट ट्रेनची गरज आहेच का?
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यामुळं पंतप्रधान मोदींच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यावर शरद पवार म्हणाले, 'मुळात अशा प्रकल्पांची महाराष्ट्राला गरज आहे का? याचा विचार पहिल्यांदा झाला पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेने एवढा मोठा कर्जाचा बोजा घ्यावा का? त्याची उपयुक्तता आहे का? याचा विचार आधी झाला पाहिजे. प्रकल्प रद्द करावा, असं माझं म्हणणं नाही. त्यावर नीट विचार व्हावा. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे तील मेट्रो कारशेडला स्थगिती दिली. माझा त्याविषयावर अभ्यास नाही. पण, मुंबई सारख्या शहरात अशा वृक्षसंपदा असलेल्या जागा राहिल्या पाहिजेत.'

काय म्हणाले शरद पवार?

का गेले अजित पवार भाजप सोबत? शरद पवारांनी सांगितलं कारण!

अजित पवारांचा तो निर्णय कुटुंबात कोणाला आवडला नाही : शरद पवार 

'अजित पवारांनी फडणवीसांबाबतचा एकच निर्णय मला सांगितला'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp leader sharad pawar statement about devendra fadnavis special Interview