सोलापुरात विमानाने आल्या ‘नीट’च्या प्रश्नपत्रिका! उद्या परीक्षा, कडेकोट पोलिस बंदोबस्त; जिल्हाधिकाऱ्यांनी घेतल्या ४ बैठका, टेलिग्रामवर ‘या’मुळे बंदी, वाचा...

पेपरफुटीनंतर पुन्हा होत असलेल्या नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका विमानाने सोलापुरात दाखल झाली असून ती कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहे. रविवारी (ता. २१) होणाऱ्या परीक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांच्या उपस्थितीत आणि तगड्या पोलिस बंदोबस्तात सोलापुरातील १६ परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे.
NEET Exam
NEET Exam sakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : पेपरफुटीनंतर पुन्हा होत असलेल्या नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका विमानाने सोलापुरात दाखल झाली असून ती कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत ठेवण्यात आली आहे. रविवारी (ता. २१) होणाऱ्या परीक्षेसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांच्या उपस्थितीत आणि तगड्या पोलिस बंदोबस्तात सोलापुरातील १६ परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिकांचे वितरण केले जाणार आहे.

यापूर्वी ३ मे रोजी झालेल्या नीट-यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याचा प्रकार समोर आल्यानंतर ती परीक्षा रद्द करण्यात आली होती. आता रविवारी दुपारी २.३० ते सायंकाळी ५.१५ या वेळेत परीक्षा घेतली जाणार आहे. सोलापूर शहरातील १६ शाळा व महाविद्यालयांमध्ये परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना सकाळी ११ ते दुपारी १.३० या वेळेत परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहावे लागणार आहे.

परीक्षेच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आतापर्यंत चार बैठका घेऊन सुरक्षा व्यवस्था आणि प्रशासकीय तयारीचा आढावा घेतला आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर यंत्रणेला विशेष सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोलापुरातील १६ केंद्रांवर एकूण ४ हजार ५०७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. स्ट्राँग रूममधून प्रश्नपत्रिकांचे वितरण, परीक्षा प्रक्रिया तसेच उत्तरपत्रिकांचे संकलन या सर्व टप्प्यांचे चित्रीकरण केले जाणार आहे. परीक्षेदरम्यान सोलापूर शहर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार असून महापालिकेची रुग्णवाहिका सेवाही ‘स्टँड बाय’ ठेवण्यात येणार आहे.

भरारी पथके, राज्यस्तरीय निरीक्षकांची नियुक्ती

रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली १६ भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. तसेच राज्यस्तरीय निरीक्षक म्हणून १६ अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परीक्षेदरम्यान आढळणाऱ्या कोणत्याही संशयास्पद बाबींची कसून तपासणी केली जाणार आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रासाठी एक याप्रमाणे १६ ड्युटी मॅजिस्ट्रेटची नियुक्ती करण्यात आली आहे.

टेलिग्राम वापरकर्त्यांची ओळख अन्‌ लोकेशन शोधणे कठीण

सायबर गुन्ह्यांमध्ये टेलिग्रामचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. टेलिग्रामवरील वापरकर्त्यांची ओळख आणि त्यांचे नेमके लोकेशन शोधणे कठीण असल्याने तपास यंत्रणांसमोर अनेक अडचणी निर्माण होतात, अशी माहिती सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली. सोलापूर जिल्ह्यातील सुमारे पाच हजार विद्यार्थी ‘नीट’ परीक्षा देतात. ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणानंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील संशयास्पद हालचालींवर केंद्र व राज्य यंत्रणांनी विशेष लक्ष केंद्रित केले आहे. यापूर्वी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेसाठी अर्ज केलेल्या काही उमेदवारांची हॉलतिकिटे टेलिग्रामवर प्रसारित झाल्याच्या घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे परीक्षांदरम्यान टेलिग्रामच्या वापरावर विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सायबर पोलिसांच्या माहितीनुसार, टेलिग्रामवरील माहितीचा मागोवा घेणे तुलनेने कठीण असते. अनेक सायबर गुन्हेगार संवाद साधण्यासाठी किंवा माहिती प्रसारित करण्यासाठी या माध्यमाचा वापर करतात. तपासासाठी आवश्यक माहिती मागविल्यानंतरही ती त्वरित उपलब्ध होत नाही, त्यामुळे तपास प्रक्रियेला वेळ लागू शकतो. दरम्यान, व्हॉट्सॲप, फेसबुक आणि इन्स्टाग्रामसारख्या अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्रुप किंवा समुदायांसाठी सदस्यसंख्येच्या काही मर्यादा असतात. मात्र, टेलिग्रामवरील चॅनेल्स आणि मोठ्या ग्रुप्समध्ये तुलनेने मोठ्या संख्येने सदस्य जोडता येतात, असेही सायबर पोलिसांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com