
मोठी लॉटरी एकदाच लागते पवार साहेब नेहमी नाही, निलेश राणेंचा टोला
'भाजपची सत्ता पवार साहेबांना कशी परवडेल, कारण त्यात...'
देशातील पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपाने जोरदार मुसंडी मारली आहे. यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असल्याची कृती नेतेमंडळींच्या वक्तव्यातून पहायला मिळत आहे. २०२४ मध्ये महाराष्ट्रात भाजप (BJP) बहुमतानं सत्तेत येईल असं सूचक विधान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं. त्यांच्या या विधानावर पलटवार करत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार भाजपाला सत्तेत येऊ देणार नाही असं म्हणाले आहेत. दरम्यान, पवार यांच्या या वक्तव्यावरून आता त्यांच्यावर भाजपाकडून टीका सुरु आहे.
भाजपाचे निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत पवारांच्या या वक्तव्यावरून निशाणा साधला आहे. ते म्हणतात, भाजपची सत्ता पवार साहेबांना कशी परवडेल? कारण त्यात दाऊदचा सहभाग नसेल. पवार साहेबांनी (Sharad Pawar) खरं जनमत घेतलं तर त्यांना कळेल की त्यांच्या राजकारणाचा आता लोकांना कंटाळा आला आहे. मोठी लॉटरी एकदाच लागते पवार साहेब नेहमी नाही, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंड या राज्यातील यशानंतर आता देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज्यात २०२४ मध्ये भाजपाची एकहाती सत्ता येईल, असा दावा भाजपा नेते करत आहेत. या दाव्याला शरद पवार यांनी जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे. तसेच, विधिमंडळातही भाजपाला आक्रमकपणे उत्तर देण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. आता निलेश राणे यांच्या वक्तव्यानं पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.