खरं की काय! आता चक्क फुलपाखरांची होणार निवडणूक.. निसर्गप्रेमी निवडणार 'राष्ट्रीय फुलपाखरू'

मिलिंद उमरे
Saturday, 12 September 2020

आता त्यासाठी निसर्ग संस्थांनी विशेष मोहीम प्रारंभ केली असून लवकरच राष्ट्रीय फुलपाखरू घोषित होणार आहे. या निवडणुकीत सात प्रजातींची फुलपाखरे उमेदवार म्हणून उभी आहेत.

गडचिरोली :  यापूर्वी राज्यात भाजपचे सरकार असताना तत्कालीन वन तथा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ब्ल्यू मॉरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला होता. विशेष म्हणजे पशू, पक्षी, प्राण्यानंतर फुलपाखराला मानचिन्हाचा दर्जा देणारे महाराष्ट्र देशातील पहिलेच राज्य ठरले होते. त्यानंतर इतर काही राज्यांनीही महाराष्ट्रापासून प्रेरणा घेत आपल्या राज्यातील विशिष्ट फुलपाखरू प्रजातीला मानचिन्हाचा दर्जा दिला. पण, अद्याप राष्ट्रीय मानचिन्हात फुलपाखराचा समावेश नाही. 

आता त्यासाठी निसर्ग संस्थांनी विशेष मोहीम प्रारंभ केली असून लवकरच राष्ट्रीय फुलपाखरू घोषित होणार आहे. या निवडणुकीत सात प्रजातींची फुलपाखरे उमेदवार म्हणून उभी आहेत.

हेही वाचा - वीज ग्राहकांनो लक्ष द्या! अचूक वीजबिल हवंय? मग ५ दिवसांच्या आत हे कराच.. अन्यथा..

महाराष्ट्र राज्याच्या मानचिन्हामध्ये प्राणी म्हणून शेकरू किंवा देवखार, पक्ष्यांमध्ये हरियाल , वृक्षांमध्ये आंब्याचा वृक्ष, तर फुलांमध्ये जारूळ किंवा ताम्हण यांना स्थान होते. तेव्हा निसर्गप्रेमी संस्थांनी यात फुलपाखरांचाही समावेश असावा, अशी मागणी केली. त्यानंतर ब्ल्यू मोरमॉन या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करण्यात आले. महाराष्ट्राच्या प्राणीकोषात "राणी पाकोळी' असे मराठी नाव या फुलपाखराला दिले आहे. हे फुलपाखरू संपूर्ण महाराष्ट्रातील आणि दक्षिण भारतातील जंगलांमध्ये आढळते. 

म्हणून मिळाला  हा दर्जा 

सह्याद्री पर्वतरांगा आणि आसपासच्या प्रदेशात ते इतर ठिकाणांच्या तुलनेत अधिक प्रमाणात आढळते. सातपुडा पर्वतरांगा तसेच ताडोबा व विदर्भातील इतर जंगलांमध्ये ते तुरळक प्रमाणात आढळते. विशेष म्हणजे हे फुलपाखरू खूप शहरीकरण झालेल्या मुंबईला अगदी कुलाब्यापर्यंत तसेच नागपूरला अगदी महाराजबाग परिसरातसुद्धा दिसते. त्यामुळे या फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देण्यात आला. 

अशी होणार निवडणूक 

त्याचप्रमाणे भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे. राष्ट्रीय पक्षी मोर, राष्ट्रीय फुल कमळ, राष्ट्रीय फळ आंबा, राष्ट्रीय वृक्ष वटवृक्ष आहे. मात्र, यात फुलपाखराला स्थान नाही. म्हणून आपलेही राष्ट्रीय फुलपाखरू असावे, यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. यात निसर्गप्रेमी नागरिकांचे सार्वमत घेण्यात येणार आहे. त्याकरिता संशोधन व अभ्यासाअंती सात फुलपाखरू प्रजाती निवडण्यात आल्या आहेत. यातून सर्वाधिक पसंती मिळालेल्या फुलपाखराला राष्ट्रीय फुलपाखरू घोषित करण्यात येईल.

ठळक बातमी - काय सांगता! नागपुरातील या तलावातून होतो चक्क एका मोठ्या नदीचा उगम; जाणून घ्या काय काय आहे इतिहास

हे आहेत उमेदवार

राष्ट्रीय फुलपाखरू होण्याच्या निवडणुकीत एकूण सात फुलपाखरू प्रजाती आहेत. यात कृष्णा पिकॉक, ऑरेंज ओकलिफ, इंडियन जेझेबल/कॉमन जेझेबल, येलोव्ह गॉरगॉन, इंडियन नवाब/कॉमन नवाब, फाईव्ह-बार स्वॉर्डटेल, नॉदर्न जंगलक्‍विन या फुलपाखरू प्रजातींचा समावेश आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now election held for Butterflies nature lovers will select National Butterfly