"आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला"; पवार यांच्याकडून मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक

"आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला" पवार यांच्याकडून मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक
"आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला" पवार यांच्याकडून मुख्यमंत्री ठाकरेंचे कौतुक

मुंबई : आमचा विद्यार्थी सहा महिन्यातच पास झाला, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले. शिवसेना खासदार संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. पवार यांनी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरू नसल्याचे सांगतानाच मुख्यमंत्री ठाकरे यांना मात्र, त्यांनी आपला विद्यार्थी मानले आहे. तसेच या सहा महिन्याच्या परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे, असे सांगत ठाकरे यांचे कौतुकही केले.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत पवार यांनी राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारवरही भाष्य केले. या सरकारचे सहा महिन्यांचे प्रगती पुस्तक तुमच्याकडे आलंय का? असा सवाल राऊत यांनी गेला. त्यावर आता ही सहा महिन्यांची परीक्षा झाली असून, अंतिम परीक्षा पूर्ण झाल्याचे वाटत नाही. परीक्षेतला प्रात्यक्षिक भाग अजूनही बाकी आहे. आता कोठे लेखी परीक्षा झाली आहे. मात्र प्रात्यक्षिक परिक्षेमध्येही हे सरकार यशस्वी होईल, असा आता विश्वास वाटतोय. तसेच अवघ्या सहा महिन्यांच्या कालखंडासंबंधी लगेचच निष्कर्ष काढणे देखील योग्य नाही. शिवाय विद्यार्थी कष्ट घेताना दिसतोय. त्यामुळे निकालाची चिंता बाळगावी, अशी स्थिती दिसत नाही. राज्याचा विचार करून तुम्ही विचारत असाल तर या सहा महिन्यांत परीक्षेत आमचा विद्यार्थी संपूर्ण पास झाला आहे. तो पुढची परीक्षा, पुढचे पेपरही सहजपणाने सोडवेल अशी खात्री आहे, असे पवार म्हणाले. हे सर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासंबंधात बोलत असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार काम करत असल्याने सर्व कामाचे श्रेयही त्यांचेच आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. 


राजकारणात कोणी कोणाचा गुरू नाही
तुम्ही मोदींचे गुरू आहात का, असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले की, मला मोदींचा गुरू म्हणून त्यांना आणि मला दोघांनाही अडचणीत आणू नका. राजकारणात कोणी कोणाचा गुरू असत नाही. आम्ही लोक अनेकदा एकमेकांच्या संदर्भात सोयीची भूमिका मांडत असतो,' असा गौप्यस्फोट त्यांनी केला. 'अलीकडे काही माझी आणि त्यांची भेट झालेली नाही. कोरोनाचे संकट आल्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांप्रमाणे त्यांच्याशी बोललो असेन इतकेच. त्या पलीकडे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.


राज्यांसाठी कर्ज उभारावे
केद्र सरकारच्या उत्पन्नाचे सर्व मार्ग राज्यांतूनच जातात. राज्याची अर्थव्यवस्था, व्यवहार व उत्पादन वेगाने झाले तर संपत्ती निर्माण होईल आणि त्यातून त्याचा हिस्सा केंद्राला मिळेल हे साधे गणित आहे. त्यामुळे केंद्राला स्वत:चे दुकान चालवायचे असेल तर राज्यांची दुकाने आधी चालवली पाहिजेत,' असे पवार म्हणाले. 'केंद्राच्या तुलनेत राज्यांकडे कर्ज उभारण्याची क्षमता कमी असते. केंद्राकडे रिझर्व्ह बँक आहे. नोटा छापण्याचा अधिकार आहे. जागतिक बँक व आशियाई बँकेकडून कर्ज उभारण्याची क्षमता असते. त्यामुळे प्रसंगी आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज काढून राज्य स्थिरस्थावर करण्याची भूमिका केंद्राने घेतली पाहिजे,' अशी अपेक्षा पवार यांनी व्यक्त केली.


पाकिस्तान पेक्षा चीन शत्रू
पाकिस्तानपेक्षा चीन हा भारताचा मोठा शत्रू आहे, हे माझें मागील अनेक वर्षांपासूनचे मत आहे. लांब पल्ल्याच्या दृष्टीने विचार केल्यास आपल्या हितासंदर्भात खरे संकट निर्माण करण्याची ताकद, दृष्टी आणि कार्यक्रम फक्त चीनचा आहे, असे शरद पवार म्हणाले. यापूर्वी जॉर्ज फर्नांडीस यांनी देखील संरक्षण मंत्री असताना देखील चीन हा पाकिस्तानपेक्षा चीन मोठा शत्रू असल्याचे म्हटले होते. तेव्हा त्यांच्यावर खूप टीका झाली होती. याकडे पवार यांनी लक्ष वेधले.

ही बातमी वाचली का? राज्यकर्ते कोरोनाचे प्रायश्चित कधी घेणार?, संजय राऊतांचा रोखठोक सवाल

देशाला मनमोहन सिंग यांची गरज
देशाला मनमोहन सिंह यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज आहे. सिंग जेव्हा पहिल्यांदा केंद्रीय अर्थमंत्री झाले. तेव्हा त्या मंत्रिमंडळात होतो. मला माहिती आहे, त्यावेळी आर्थिक अडचणीतून आम्ही कसे जात होतो. पण मनमोहन सिंगांनी एक नवीन दिशा दिली. मनमोहन सिंहांनंतर नरसिंहरावांना श्रेय देतो. या दोघांनी नेहमीच्या चौकटीतला रस्ता बदलून वेगळ्या वळणावर गाडी नेली आणि संपूर्ण अर्थव्यवस्था सावरली. आज त्याची आवश्यकता होती. अशा प्रकारच्या लोकांची मदत घेऊन पंतप्रधान मोदी यांनी पावले टाकण्याची काळजी घ्यावी, त्या गोष्टींसाठी माझी खात्री आहे की, देश सहकार्य करेल, असेही पवार म्हणाले.
---------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com