esakal | तंत्र प्राणवायूचे - नाशिकची पुनरावृत्ती टाळायची तर...

बोलून बातमी शोधा

nashik oxygen

तंत्र प्राणवायूचे - नाशिकची पुनरावृत्ती टाळायची तर...

sakal_logo
By
टीम-ईसकाळ

कोरोनाच्या संकटाचा सामना करताना ऑक्सिजन अर्थात प्राणवायू हा शब्द परवलीचा झाला आहे. रुग्णसंख्या वाढल्यामुळे ऑक्सिजन हाताळणीचे प्रमाण वाढले आहे. त्यात हलगर्जीपणा झाल्यास नाशिकसारखी दुर्घटना घडू शकते. या पार्श्‍वभूमीवर सुरक्षिततेसाठी तज्ज्ञांनी सुचविलेले उपाय...

द्रवरूप ऑक्सिजन हॉस्पिटलमध्ये पोचल्यावर कन्व्हर्टरमार्फत त्याचे गॅसमध्ये रूपांतर होते. तत्पूर्वी त्याची वाहतूक, हाताळणी आणि वापर या टप्प्यांवर वेगवेगळ्या प्रकारची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी विशेष तंत्रज्ञही (टेक्निशिअन) असतात. तसेच डॉक्टर, परिचारिका, वॉर्डबॉय यांनाही त्यासाठी प्रशिक्षण द्यावे लागते. तसेच रुग्णाला ऑक्सिजन देताना पुरेसा दाब (प्रेशर) आहे का, याचीही वारंवार तपासणी करावी लागते. त्यातूनच ऑक्सिजन सुरक्षितपणे रुग्णांपर्यंत पोचून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकते.

हेही वाचा: डॉक्टर म्हणताहेत..!"नाशिक-नगरची झंझट नको, आम्हाला ऑक्सिजन द्या"

सुरक्षित वितरणासाठी...

1. द्रवरूप ऑक्सिजनचा ट्रक ठरवून दिलेल्या जागेतच पार्क करावा.

2. ट्रक रिकामा करण्यापूर्वी उत्पादकाने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचा अवलंब करावा.

3. दवाखान्याच्या मागणीनुसारच दाब सेट करावा.

4. साठवणुकीसाठी केलेल्या व्यवस्थेनुसार सेफ्टी व्हॉल्व, रप्चर डिस्क व व्हेंट बसविलेले असतात. त्यांची नियमित तपासणी आवश्यक .

5. टाकी व पाइपलाइनची थीकनेस टेस्ट व प्रेशर टेस्ट करणे आवश्यक.

6. अतिदक्षता विभागात ऑक्सिजनचे वितरण करण्यापूर्वी दाब नियंत्रक आणि अलार्म सिस्टीम असणे आवश्यक.

7. रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर बँक असणे आवश्यक आहे.

8. अतिदक्षता विभागाबाहेरील ऑक्सिजन वितरण व्यवस्था ऑटो चेंज व्हॉल्व असणारी हवी, ज्यामुळे जर मुख्य लाइनचा दाब कमी झाला तरी ती सिलिंडर बँकेतील ऑक्सिजन आपोआप सुरु करेल

- सुधीर शिंदे, उपसंचालक, औद्योगिक सुरक्षा विभाग

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती : केंद्र सरकारकडून मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत

-कुशल तंत्रज्ञ आवश्‍यक

-टॅंकमधून सिलिंडरमध्ये पुरेशा दाबाने पुरवठा आवश्यक.

-सेन्सरची माहिती असणारे कुशल तंत्रज्ञ उपस्थित राहणे आवश्यक. अन्यथा नाशिकसारखी दुर्घटना घडू शकते.

-एखाद्या हॉस्पिटलमध्ये सिलिंडर बॅंक असेल, तर त्याचे दोन भाग केले पाहिजे. त्यामुळे सिलिंडर बदलताना दुसरी लाइन सुरू राहू शकते.

-रुग्णालयाच्या गरजेनुसार गॅसचे प्रेशर निश्चित करून त्यात सेन्सर बसविणे गरजेचे.

-म्हणजे गॅसची गळती झाली तर वेळीच समजू शकते.

-सिलिंडर बॅंकेतून तांब्याच्या पाइपमधून गॅसचा पुरवठा केला जातो. ती फ्लेक्झिबल असल्यास उत्तम.

-दर सहा महिन्यांनी रुग्णालयाचे फायर ऑडिट हवे. त्यात आढळणाऱ्या त्रुटींची पूर्तता झाल्यावरच पुढील प्रशासकीय कायदेशीर सोपस्कार व्हायला हवे.

- मोहन जाधव, अध्यक्ष, फायर कॉन्ट्रॅक्टर ॲड कन्सलटंट असोसिएशन, पुणे

हेही वाचा: नाशिक ऑक्सिजन गळती दुर्घटना : पोलिस बंदोबस्तात कर्मचाऱ्यांचे जाब-जबाब

आमच्याकडे १९ टन क्षमतेचे दोन ऑक्सिजन स्टोअरेज टँक असून, ३७५ ऑक्सिजन बेड आहेत. सेंट्रल लाइनमधून त्यांना ऑक्सिजन पुरवठा होतो. लिक्विड ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी हवेचा पुरेसा दाब आवश्यक असतो. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी २४ तास तीन टेक्निशियन कार्यरत असतात. टॅंक, सेंट्रल लाइन, कन्व्हर्टर, ॲडॉप्टर, वॉशर्स, नोझल्स यांची वारंवार तपासणी करावी लागते. ऑक्सिजनची गळती होणार नाही, याची दक्षता घेतली जाते. टेक्निशिअनचे रोजचे काम तेच असते. तसेच बेडला जोडलेला ऑक्सिजन कसा हाताळायचा याचे डॉक्टर, परिचारिका आणि वॉर्डबॉय यांनाही प्रशिक्षण दिले जाते.-डॉ. संजय ललवानी, वैद्यकीय संचालक, भारती हॉस्पिटल

ऑक्सिजन ऑडिट हवे

रुग्णालयांत ऑक्सिजन वापरताना काही वेळेस त्याची गळती होते. उदाः पेशंट जागेवरून उठताना मास्क काढून ठेवतो. परंतु, त्यावेळी ऑक्सिजन सुरूच राहतो. तसेच नोझल किंवा ॲडॉप्टर योग्य पद्धतीने न बसल्यास त्यातूनही ऑक्सिजनची गळती होते. त्यामुळे तो वाया जातो. हे टाळण्यासाठी वारंवार तपासणी आणि त्याचे ऑडिट करणे हाच उपाय योग्य आहे.

- शहरातील ऑक्सिजन बेड - ६८२१

- आयसीयू बेड - ६२०

- व्हेंटिलेटरवरील बेड - ७५१

- ऑक्सिजनची रोजची मागणी - ३०० टन