Monsoon : महाराष्ट्रासाठी आजचा दिवस आपत्तींचाच!

टीम ई सकाळ
शनिवार, 29 जून 2019

मुसळधार पावसामुळे पुणे येथील कोंढवा भागात संरक्षक भिंत कोसळून १५ मृत्युमुखी पडले. त्यानंतर मुंबई शहरातही भिंत कोसळणे, झाड पडणे अशा घटना घडल्या. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली; पण याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही.

पुणे : अवघ्या महाराष्ट्रासाठी आजचा (शनिवार) दिवस उजाडला, तो निराशाजनक बातम्यांनीच.. काल मध्यरात्रीच्या सुमारास पुण्यातील कोंढवा येथे भिंत कोसळून 15 जणांचा मृत्यू झाला. याच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागला, तोच मुंबईतूनही अशाच स्वरूपाची आणखी एक घटना घडली. दुसरीकडे, कोल्हापूरमध्ये एका पेट्रोल पंपाच्या ऑफिसला आग लागली. मुंबईमध्ये गेल्या 24 तासांमध्ये घर किंवा भिंत कोसळण्याच्या 14 घटना घडल्या आहेत. 

नेमकं काय काय झालंय महाराष्ट्रात आतापर्यंत? 
पुणे : ज्या भिंतीच्या आधारे बांधकाम मजुरांचे संसार सुरु होते, त्याच भिंतीने घात केला. कोंढवा येथील एका बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांच्या झोपड्यांवर मध्यरात्री भिंत कोसळली. त्यात 15 जणांचे मृत्यू झाले. यात चार लहान मुलांचाही समावेश होता. 

पुणे : सिंहगड रस्त्यावरील वडगाव बुद्रुक येथे फनटाईम सिनेमाजवळ महापालिकेने नव्यानेच बनविलेला जॉगिंग ट्रॅक आज सकाळी आठच्या सुमारास कोसळला. त्यात जीवितहानी झालेली नाही. सकाळची वेळ असल्याने परिसरात वर्दळ नव्हती. या कॅनॉललगत जॉगिंग ट्रॅक आणि ओपन जिम तयार करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने भराव घातला आहे. पावसामुळे ही भिंत खचली. 

पुणे : सिंहगड रस्त्यावरील पादचारी मार्ग मागील वर्षी खचला होता. नंतर तो दुरुस्तही केला होता. काल तो पुन्हा खचला.

पिंपरी-चिंचवड : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दरड कोसळली. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर बोरघाटात ही घटना घडली. या घटनेचा मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीवर परिणाम झाला. 

पुण्यात इमारत कोसळून काय झालंय? वाचा पूर्ण कव्हरेज!

मुंबई : कालपासून सुरू असलेल्या पावसामुळे रात्री 12 च्या सुमारास टाटा नगर येथील गोवंडी भीम सेवा संघ चाळीतील एक भिंत कोसळून दोघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी तत्काळ शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मुंबई : पूर्व अंधेरीमधील मरोळच्या भवानी नगर येथे एक भिंत कोसळली. या भिंतीखाली उभ्या असलेल्या चारचाकी गाड्या त्या ढिगाऱ्यात दबल्या गेल्या. त्याचा सीसीटीव्हीचा व्हिडिओही प्रसिद्ध झाला आहे. 

मुंबई : कुर्ल्यात स्टेशन परिसरामध्ये संसार हॉटेलसमोर असलेली इमारत कोसळली. 'शकीना मंजिल' ही इमारत अतिधोकादायक होती. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. याशिवाय, उल्हासनगरमध्येही एक भिंत कोसळली. बचावपथकाने तातडीने धाव घेत जेसीबीच्या साह्याने ढिगारा हटविण्याचे काम सुरू केले. 

मुंबई : सायन कोळीवाडा येथे आज सकाळी एक झाड कोसळले. त्या झाडाला लागून असलेला वीजेचा खांबही कोसळला. त्यात काही वाहनांचे नुकसान झाले; पण जीवितहानी झालेली नाही. 

मुंबई : विरारमध्ये रेल्वे प्लॅटफॉर्मचा काही भाग कोसळला. यामध्ये कुणीही जखमी झालेले नाही. 

कोंढव्याचं जाऊ दे; आज वर्ल्ड कपमध्ये कुणाची मॅच आहे रे?
मुंबईत माणसाच्या जिवाची किंमत काय आहे? शून्य!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune and Mumabi faces damage due to heavy rain