भाजपनं संभाजीराजेंचा सन्मान केला, आता शिवसेनेनंही करावा; चंद्रकांतदादांची अपेक्षा I Chandrakant Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandrakant Patil Sambhajiraje Chhatrapati

भाजपनं संभाजीराजे यांना थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार केले होते.

भाजपनं संभाजीराजेंचा सन्मान केला, आता शिवसेनेनंही करावा : चंद्रकांत पाटील

कोल्हापूर : राज्यसभेसाठी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांच्या नावाला शिवसेनेकडून आता पूर्णविराम मिळाल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळं राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना (Shiv Sena) मंगळवारी त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे. दोन जागांसाठी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यासह कट्टर शिवसैनिकाला संधी दिली जाणार असल्याचं निश्चित झालंय. त्यामुळं आता दुसरं नाव कोणतं, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून ज्येष्ठ शिवसैनिकाचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं. त्यानंतर येत्या २६ मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत आणि उद्या जाहीर होणारे उमेदवार राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु, राज्यसभेच्या जागेबाबत भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मोठं विधान केलंय. भाजपनं संभाजीराजे यांना थेट राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार केले होते. आता शिवसेनेनं संभाजीराजेंची अपेक्षा पूर्ण करून त्यांचा सन्मान करावा, अशी अपेक्षा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज, सोमवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली.

हेही वाचा: 'पुढील 25 वर्ष आमचचं राज्य'; राऊतांच्या विधानाचा फडणवीसांनी घेतला चांगलाच समाचार

पाटील पुढं म्हणाले, ज्या वेळी संभाजीराजेंना राज्यसभा देण्याचा निर्णय झाला तेव्हा महाराष्ट्रातील तीन जागांमधून एक जागा देण्याचं नियोजन होतं. परंतु, हे जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना समजलं तेव्हा त्यांनी ‘राजांना तुम्ही भाजपच्या (BJP) कार्यालयात एबी फॉर्मवर सह्या करण्यासाठी बोलावणार आहात का’ असा आम्हांला प्रश्न विचारला. त्यांना आपण सन्मानपूर्वक राष्ट्रपती कोट्यातून खासदार करू, असा शब्द त्यांनी दिला. त्यानुसार त्यांनी सहा वर्षे काम केलं. आता शिवसेनेनंही संभाजीराजेंचा सन्मान करावा, अशी अपेक्षा प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त केलीय. चंद्रकांतदादांच्या या विधानाचा शिवसेना कितपत विचार करते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Web Title: Rajya Sabha Election Shiv Sena Should Honor Sambhajiraje Bjp State President Chandrakant Patil

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top