
Hanuman Chalisa Row : महाराष्ट्र पोलिसांना ताण आणणाऱ्या मागील काही काळातील घटना
गेल्या काही दिवसात राज्याच्या राजकारणात बरीच प्रकरणे गाजली मग तो सिल्वर ओक हल्ला असो किंवा राणा दाम्पत्याचं प्रकरण आणि आता राज ठाकरे. या सर्व प्रकरणात राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले. याप्रकरणावरुन राज्याच तापलेले वातावरण असो किंवा राज्यात निर्माण झालेली अशांतता. यामुळे महाराष्ट्र पोलिसांना ताण आणणाऱ्या मागील काही काळातील या सर्व घटनांचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत. (Recent three major topics in maharashtra which are trending )
सिल्वर ओक हल्ला -
राष्ट्रावादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी 8 एप्रिल रोजी दुपारच्यावेळी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या दिशेनं चपला फेकल्या एवढंच काय तर महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत पवार कुटुंबियांविरोधात जोरदार नारेबाजी केली होती. साधराण तासाभराच्या प्रयत्नांनंतर पोलिसांनाी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं. याप्रकरणी आंदोलकांविरोधात गावदेवी पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला.
सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणी एसटी कामगारांचे वकील डॉ. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 115 एसटी कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर २२ एप्रिलला अॅड सदावर्ते यांना 50 हजाराच्या वैयक्तीक जाचमुचलका आणि तेवढ्याच रक्कमेचा हमीदार तर कामगारांना प्रत्येकी 10 हजाराच्या वैयक्तीक हमीवर जामीन देण्यात आला.
हेही वाचा: Hanuman Chalisa Row LIVE| पुण्यात महाआरती होताच मनसे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात
राणा दाम्पत्याचं प्रकरण -
सध्या राज्यात मशिदींवरील भोंगे, हिंदुत्व आणि हनुमान चालिसा यांवरुन राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती.
नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले
तब्बल तीन दिवस हाय व्होल्टेज ड्रामा सुरुच होता, त्यानंतर अखेर पंतप्रधान मुंबईत येत असल्यानं आपण मातोश्रीबाहेर हनुमान चालीसाचं पठण करण्यासाठी जाणार नसल्याचं राणा दाम्पत्यानं व्हिडीओ जारी करत सांगितलं. त्यानंतर राणा दाम्पत्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली. पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना अटक केली. त्या दिवशीची रात्र राणा दाम्पत्याची पोलीस कोठडीतच गेली. दुसऱ्या दिवशी रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केलं गेलं.
राजद्रोहाच्या आरोपाखाली न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. मात्र आज या दाम्पत्याच्या जामिनावर न्यायालयात सुनावणी झाली. यात राणा दाम्पत्याला दिलासा मिळाला असून त्यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय.
हेही वाचा: राणा दाम्पत्याला अखेर दिलासा, न्यायालयाकडून जामीन मंजूर
राज ठाकरे प्रकरण -
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं असं नाव आहे जे कायम त्यांच्या भाषणामुळे किंवा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतं. सध्या त्यांचं औरंगाबाद सभेतील भाषण बरंच गाजतय.. ठाकरे यांच्यावर औरंगाबादेतील सभेत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी न पाळल्याने गुन्हा दाखल झालाय. सोबतच भोंगा प्रकरणावरुन राज्यातील वातावरण पेटवून उठलंय. मशिदीवरील भोंग्याबाबत राज ठाकरे म्हणाले होते, “मशिदीवर लागणारे भोंगे खाली उतरवावे लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर , ज्या मशिदीबाहेर भोंगे लागतील. त्याच्या दुप्पट स्पीकर लावायचे आणि हनुमान चालीसा लावायची.” धर्म बनला तेव्हा लाऊड स्पीकर होता का? प्रार्थना घरात करा. अशा भूमिका राज ठाकरेंनी घेतली.
राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर राज्यभरातल्या विविध ठिकाणी मनसैनिकांनी मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात आंदोलन सुरू केलं आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटणार असून हिंदू-मुस्लिम वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे.
Web Title: Recent Three Major Topics In Maharashtra Which Are Trending
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..