
'वाघाला' त्याच्या क्षमतांवर विश्वास, म्हणून तो कुणाला घाबरत नाही - रोहीत पवार
राज्यात गेल्या काही दिवसांपासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळतोय. एकीकडे भाजप आणि दुसरीकडे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये सुरु असलेली चिखलफेक काही केल्या थांबण्याचं नाव घेताना दिसत नाहीये. त्यातच आज होळीच्या सणानिमित्त देखील राजकीय रंगांची उधळण सुरुच आहे. अनेक नेतेमंडळी आज धुलीवंदनाचा आनंद घेत आहेत. मात्र राष्ट्रवादीचे काँग्रेसचे युवानेते रोहीत पवार हे सध्या आपल्या कुटुंबासह जंगल सफारीमध्ये व्यस्त आहेत.
रोहीत पवार हे नेहमी आपल्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. सध्या ते आपल्या मुलांना घेऊन जंगल सफारीसाठी गेले आहेत. त्यांनी स्वत: काही वेळापूर्वी तसं ट्विट केलं आहे. "जंगलातला वाघ बघण्याची गेल्या तीन वर्षांपासूनची मुलांची इच्छा आज काहीशी सवड मिळाल्याने कुटुंबासह पूर्ण झाली." असं रोहीत पवारांनी सांगितलं. तसंच पुढे ते म्हणाले की, साक्षात वाघ बघून मुलं खूप आनंदी झाली आणि तो आपल्याला घाबरत का नाही?असं विचारलं. तेव्हा मी त्यांना म्हणालो, "वाघाला त्याच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असल्याने तो कुणाला घाबरत नसतो."
रोहीत पवार यांनी केलेलं हे ट्विट सध्या चर्चेत आहे. त्यांना या ट्विटमध्ये नेमकं काय म्हणायचंय? हे स्पष्ट होऊ शकलं नसलं तरी, त्यातून त्यांची खास शैली दिसून येतेय.