esakal | हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय

बोलून बातमी शोधा

ncp
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळताच शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय
sakal_logo
By
- मिलिंद संगई

बारामती : ज्यांची नाळ समाजाशी जुळलेली असते व ज्यांना सातत्याने समाजाच काहीतरी भलं व्हावं असं वाटत असतं असे नेते स्वभान हरपून सतत काहीतरी करत राहतात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातून डिसचार्ज मिळताच राज्यातील आरोग्य यंत्रणेचा तातडीने आढावा घेतला. राष्ट्रवादीच्या सर्व आमदार व खासदारांचे एक महिन्याचे वेतन व राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या वतीने मुख्यमंत्री सहायता निधीला एक कोटी रुपयांची मदत करण्याची सूचना शरद पवार यांनी केली. कोरोनाच्या लढाईत जे पोलिस, शासकीय कर्मचारी किंवा आरोग्य विभागाचे कर्मचारी मृत्यूमुखी पडले त्यांना मदत व्हायला हवी या भावनेतून पवार यांनी हे पाऊल उचलले आहे.

हेही वाचा: बारामती लोकसभा मतदार संघातील रस्त्यांसाठी 25 कोटींचा निधी मंजूर

पवार यांच्या स्वहस्ताक्षरातील हा निरोप राष्ट्रवादीच्या फेसबुकवर आज दिसला. हेमंत टकले यांना हा निरोप पवार यांनी एका कागदावर लिहून दिला आहे. पवार यांच्या सूचनेनुसार आजच उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे आदींनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एक कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. रुग्णालयात असतानाही सतत राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा पवार घेत होते. रुग्णालयातून बाहेर पडताच पुन्हा नव्या जोमाने त्यांनी राज्यातील स्थितीवर मात करण्याच्या दृष्टीने उपाययोजना हाती घेतल्याचे दिसले. पक्षस्तरावरही या संकटात आपणही काही वाटा उचलला पाहिजे या भावनेतूनच ही मदत पवार यांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली आहे.

केवळ पक्षस्तरावरुनच नाही तर राष्ट्रवादीच्या प्रत्येक नेत्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही या संकटाला सामोरे जाताना सढळ हाताने काही मदत करणे गरजेचे आहे हा संदेशही शरद पवार यांनी या निमित्ताने दिला आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्याच्या काळातही पवार यांनी आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांसाठी मदतीचा हात पुढे केला होता.

हेही वाचा: पुणे स्मार्ट सिटीतर्फे ६३ प्रकल्पांवर काम  सुरू