Breaking : शिवसेना राष्ट्रवादीला देणार अडीच वर्षासाठी मुख्यमंत्रीपद!

सकाळ न्यूज नेटवर्क
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

अजित पवारांच्या वागण्याचा आम्हाला अगोदरच संशय आल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर दिली होती. 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंतची सर्वात मोठी उलथापालथ सुरू असताना सर्वांनाच एकावर एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर त्याचे असे परिणाम पाहायला मिळतील याची कोणालाही जाणीव त्यावेळी झाली नव्हती. 

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

त्यातच आता आणखी एक मोठी बातमी येऊन धडकली आहे. शिवसेनेने आता राष्ट्रवादी काँग्रेसला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दाखवली आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकासआघाडी बनविली.

या महाविकासआघाडीची शुक्रवारी (ता.22) बैठक झाली होती. त्याबैठकीत अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद राष्ट्रवादीला देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र, ती मागणी शिवसेनेने फेटाळून लावली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अजित पवार यांनी भाजपसोबत सरकार बनवत उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली.   

- तर मी आत्महत्या करणार; धनंजय मुंडेना धमकीचे ट्विट

मुख्यमंत्रीपदावर उद्धव ठाकरेंच्या नावाचे शिक्कामोर्तब झाल्यानंतर अजित पवार चालू बैठकीतून निघून गेले होते. त्यानंतर झालेल्या राजकीय भूकंपामुळे शिवसेनेने अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्याची तयारी दर्शविली आहे. अजित पवारांच्या वागण्याचा आम्हाला अगोदरच संशय आल्याची प्रतिक्रिया संजय राऊत यांनी राजभवनात झालेल्या शपथविधी सोहळ्यानंतर दिली होती. 

- अजित पवारांचे अश्रू महाराष्ट्राला पुन्हा दिसतील : संजय राऊत

दरम्यान, आमच्याकडे 155 आमदार आहेत, असा दावा भाजपने ठोकला आहे. यामध्ये भाजपचे 105, अजित पवार यांचे 25 समर्थक आमदार आणि 15 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे महाविकासआघाडीकडे शिवसेनेचे 56, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53, काँग्रेसचे 44 आणि 8 अपक्ष असे मिळून 161 आमदारांचे पाठबळ आहे.

- महाराष्ट्रात महाविकासआघाडीचेच सरकार : शरद पवार


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shiv Sena will give CM seat to NCP for two and a half years