
'फडणवीस-शिंदे यांचे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे, ही त्यांची बतावणी म्हणजे ढोंग'
वासू सपना, प्रेमरोग, आशिकी; शिंदे-फडणवीसांवर सेनेची फिल्मी टीका
सत्तेत आल्यापासून शिंदे सरकारने महाविकास आघाडीने घेतलेल्या निर्णयांना स्थिगिती लावण्याचा सपाटा सुरु केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेते आणि शिंदे सरकार यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी न्यायप्रविष्ट असल्याने वेळकाढूपणा करण्याच्या दृष्टीने शिंदे आणि फडणवीस सरकार महाविकास आघाडी सरकारने घेतलेले निर्णय रद्द करुन पुन्हा तेच निर्णय घेत आहे, असं शिवसेनेनं म्हटलं आहे. दरम्यान, आज 'सामना' अग्रलेखातून अनेक चित्रपटांच्या नावांचा उल्लेख करत सेनेनं शिंदे-फडणवीस सरकारवर तोफ डागली आहे.
फडणवीस-शिंदे यांचे सरकार बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालले आहे. ही त्यांची बतावणी म्हणजे ढोंग असल्याची खरमरीत टीका सेनेनं केली आहे. ठाकरे सरकारने घेतलेले काही निर्णय ‘असंविधानिक’ असल्याचे सांगून त्या निर्णयांना स्थगिती देण्याचे पोरखेळ सुरू झाले आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री अधिकारावर आहेत, पण ज्याला सरकार म्हणावे अशी व्यवस्था पंधरा दिवसांनंतरही निर्माण होऊ शकलेली नाही हे दुर्दैव आहे. नेत्यांचे भवितव्य सर्वोच्च न्यायालयात टांगणीला लागले असून फणवीस-शिंदे सरकारच्या असंख्य गमती-जमतींची चेष्टा होऊ लागली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला आहे.
हेही वाचा: Presidential Election 2022 LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानभवनात दाखल
शिंदे सरकारवर शिवसेनेन काही चित्रपटांची नावं देत फिल्मी स्टाइलमध्ये टीका केली आहे. शिंदे-फडणवीस यांचे सरकार अस्तित्वात नाही. ‘एक दुजे के लिये’ चित्रपटातील ‘वासू-सपना’ या प्रेमवीरांप्रमाणे हे दोघेच फिरतात, मजा मारतात, गाणी गातात. एकंदरीत त्यांच्या जीवनात नव्याने फुलबाग बहरली आहे, पण चित्रपटाच्या पडद्यावरील वासू-सपनाचे प्रेम अस्सल होते. तसे या वासू-सपनाचे आहे काय? स्वार्थ, दगाबाजीच्या पायावर त्यांचे नाते उभे आहे. त्यांची ‘आशिकी’ सत्तेची आहे. त्यांना खुर्चीचा ‘प्रेमरोग’ जडला आहे, असा टोला सेनेनं लगावला आहे.
महाराष्ट्रात सध्या असलेले फडणवीस-शिंदे हे दोघांचेच सरकार व दोघांचेच मंत्रिमंडळ हा एक अनोखा प्रयोग म्हणायला हरकत नाही. राजकीय कुटुंब नियोजन म्हणायचे ते हेच, पण सर्वोच्च न्यायालयाने सक्तीची नसबंदी केल्यानेच वासू-सपना सरकारवर ही वेळ ओढवली आहे. ‘हम दो हमारे चालीस’चा प्रयोग सुरत-गुवाहाटी-गोवा असा चालला, पण मुंबईत येताच ‘हम दोनो’वरच भागवावे लागले. दोघांत तिसरा कधी? दोनाचे चार हात कधी? वासू-सपनाच्या संसारवेलीवर पाच-पंचवीस फुले कधी बहरणार? की कायमचेच ‘प्लॅनिंग’ करावे लागणार? याबाबत दोन्ही बाजूंचे वऱ्हाडी साशंक आहेत, असा खोचक टोलाही 'सामना'तून लगावला आहे.
हेही वाचा: देशाचा विकास जलद गतीने होतोय - PM मोदी
Web Title: Shivsena Criticized To Shinde Fadnavis Govt In Filmy Style Decision Stopped Of Thackeray Govt
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..