
सेना-राष्ट्रवादीत धुसफूस? राजेश टोपेंच्या विधानाने खळबळ
औरंगाबाद : जिल्ह्यातील राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेनेच्या (Shivsena) स्थानिक नेत्यांमध्ये संघर्ष असल्याचे दिसून येत आहे. कारण, आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी एक धक्कादायक विधान केलं आहे. शिवसेनेचे दोन मंत्री राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना धमकावतात, असं खळबळजनक विधान राजेश टोपे (Rajesh Tope on Shivsena) यांनी केलं. ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.
हेही वाचा: शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या
औरंगाबादेत आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास होतो. त्याबाबत संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांना नेहमी सांगितले. तुम्ही सत्तेच्या बळावर आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, असं सांगितलं. आपण महाविकास आघाडीत एकत्र आहोत. त्यामुळे सर्वांनी युतीचा धर्म पाळायला पाहिजे, असं राजेश टोपे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये धुसफूस असल्याचे समोर आले आहे.
राजेश टोपेंच्या विधानावर संदीपान भुमरेंची प्रतिक्रिया -
राजेश टोपे पक्षाच्या मेळाव्यात काय बोलले मला माहिती नाही. पण, आम्ही आतापर्यंत पैठण तालुक्यात कधीही दादागिरी केली नाही. आम्ही सर्वांना सोबत घेऊन चालतो. त्यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत. आम्ही कधीही फोडाफोडीचं राजकारण केलेलं नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चुकीची माहिती दिली असावी. आम्ही राष्ट्रवादीच्या एकाही कार्यकर्त्यांना शिवसेनेत घेतले नाहीत. तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कायम तक्रार असते, असं संदीपान भुमरे म्हणाले. ते एबीपी माझासोबत बोलत होते.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. पण, या सरकारमधील तिन्ही घटक पक्षांमधील धुसफूस नेहमीच चव्हाट्यावर येत असते. काही दिवसांपूर्वी निधी वाटपावरून शिवसेनेने राष्ट्रवादीवर प्रचंड नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या काही नेत्यांनी ही नाराजी बोलून देखील दाखवली होती. आता औरंगाबादेत परत दोन्ही पक्षातील अंतर्गत वाद समोर आल्याचे दिसतेय.
Web Title: Shivsena Minister Threaten To Ncp Says Rajesh Tope In Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..