राज्यात स्प्रेयरच्या सुट्या भागांची टंचाई

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 28 जून 2020

देशात स्प्रेयर्स वेळेत उपलब्ध न झाल्यास कोविड-१९ सारखे दुसरे संकट कृषी क्षेत्रात येईल. अन्नधान्याच्या उत्पादनात मोठी घट होईल आणि देशाला उपासमारीला सामोरे जावे लागेल.
- तुषार पडगीलवार, अध्यक्ष, ॲग्री स्प्रेयर्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन

पुणे - स्प्रेयर (फवारणीयंत्र) निर्मितीसाठी अत्यावश्यक ठरणाऱ्या सर्व सुट्या भागांची टंचाई स्प्रेयर उद्योगात तयार झाली आहे. आयात केलेल्या कंटेनरमधील मालाचे वितरण वेळेत बंदरातून होत नसल्याने ही स्थिती उद्भवली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

इंडियन ॲग्री स्प्रेयर्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने या समस्येवर चिंता व्यक्त करीत, यातून तातडीने मार्ग काढण्याची विनंती केली. कृषी क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या फवारणी यंत्रांची संख्या सतत वाढते आहे. मात्र, चीनमधून आयात होणाऱ्या कच्च्या मालाशिवाय उत्पादन होत नसल्याने ही समस्या तयार झाली आहे. 

आरोग्यमंत्र्यांनी दिला 'हा' मूलमंत्र! कोरोनाचा संसर्ग अन्‌ मृत्यूदर होईल कमी

‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर स्प्रेयर्सचा वापर वाढला होता, त्यामुळे एरवी गोदामांत असणारे साठेदेखील संपले आहेत. १०० टक्के आयात होणारे स्प्रेयर्स, तसेच देशी स्प्रेयर्ससाठी लागणारे सुटे भाग अशा दोन्ही बाबींची टंचाई उद्भवल्यामुळे स्प्रेयर्स निर्मितीमधील सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग अडचणीत आले आहेत. स्प्रेयर्स विक्रेते, आयातदार आणि शेतकरीदेखील हैराण झाले आहेत,’’ अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष तुषार पडगीलवार यांनी दिली. 

जेईई, नीट परीक्षा पुढे ढकला; का होतीय अशी मागणी?

स्प्रेयर्स चीन, तैवान किंवा कोरियातून आयात केले जातात. देशी स्प्रेयर्समध्ये अत्यावश्यक असलेले ९५ टक्के सुटे भाग चीनमधून येतात. देशात विकल्या जाणाऱ्या ६० लाख पॉवर स्प्रेयर्सपैकी किमान ५५ लाख स्प्रेयर्स थेट चीनमधून आयात होतात. मात्र, सध्या चीनमधून येणारे कंटेनर तपासणीसाठी बंदरात अडविले जात असल्याने टंचाई निर्माण झाली आहे. 

पंढरीत पादुका नेमक्या कशा येणार? हेलिकॉप्टरने की...; आमदार राम सातपुते संतापले

स्प्रेयर्स उद्योगाच्या म्हणण्यानुसार, मुंबई, कोलकता, विशाखापट्टणम्, चेन्नई या सागरी बंदरांसह देशातील दोन ड्रायपोर्टस् मध्ये स्प्रेयर्स अडकून पडलेले आहेत. चीनमधून येणाऱ्या प्रत्येक कंटेनरची १०० टक्के तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तपासणीला हरकत नाही. मात्र, कृषी स्प्रेयर्स व सुटे भाग असलेल्या कंटेनरची तपासणी प्राधान्याने करण्याची गरज आहे. स्प्रेयर्स विक्रीत जून व जुलै महिने महत्त्वाचे ठरतात. या कालावधीत ते उपलब्ध न झाल्यास खरीप पिके कीड-रोगाला बळी पडू शकतात.

भारतातील स्प्रेयर्स उद्योगाची स्थिती

  • देशात वर्षाकाठी होणारी एकूण स्प्रेयर्स विक्री - ३ कोटी नग 
  • हस्तचलित स्प्रेयर्सची वार्षिक विक्री - ६० लाख नग 
  • बॅटरी ऑपरेटेड वार्षिक विक्री - १६० लाख नग 
  • पॉवर स्प्रेयर्सची वार्षिक विक्री - ६० लाख नग 
  • स्प्रेयर्स निर्मितीमधील मुख्य उद्योगांची संख्या - २०
  • स्प्रेयर्सचे सुटे भाग पुरविणारे देश व प्रमाण - चीन ८० टक्के, तैवान १५ टक्के, कोरिया ५ टक्के 
  • देशात स्प्रेयर्स उद्योगात होणारी उलाढाल - सहा हजार कोटी रुपये 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shortage of sprayer spare parts in the state