शरद पवारांच्या उपस्थितीत ऊस कामगार बैठक, सुरेश धस यांना 'नो एन्ट्री', आंदोलनानंतर पुन्हा 'एन्ट्री'  

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 27 October 2020

ऊस कामगारांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला आहे.  

त्यानंतर धस यांनी आपल्या समर्थकांसह आंदोलन सुरु केले. अभ्यासू लोकांना बैठकीच्या जाणीवपूर्वक बाहेर ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

पुणे : ऊस तोडणी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मांजरी येथे आयोजित आजच्या बैठकीत नाट्यमय घडामोडी पाहावयास मिळाल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत ऊस तोडणी कामगार संघटनांच्या प्रतिनिधींची मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये बैठक सुरु आहे. या बैठकीला विविध संघटनाचे प्रतिनिधी आले असून गेल्या काही दिवसांपासून ऊस कामगारांमध्ये आपला प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे भाजपचे आमदार सुरेश धस यांना या बैठकीत प्रवेश नाकारण्यात आला आहे.  

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

त्यानंतर धस यांनी आपल्या समर्थकांसह आंदोलन सुरु केले. अभ्यासू लोकांना बैठकीच्या जाणीवपूर्वक बाहेर ठेवले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. ज्यांना खऱ्या समस्यांची माहिती नाही, अशा लोकांशी करार करुन जुजबी वाढ देण्याचा साखर संघाच्या लोकांचा प्रयत्न आहे. मला शरद पवार यांच्याविषयी काहीही म्हणायचे नाही. मात्र, खऱ्या समस्या पुढे येऊ नयेत, यासाठी मला बाहेर ठेवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला होता. यानंतर त्यांना चर्चेसाठी बैठकीत बोलावून घेण्यात आले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मजुरीच्या दरात वाढ करण्याच्या मागणीसाठी ऊस तोडणी कामगार संघटना साखर कारखानदारांशी वाटाघाटी करत आहेत. सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह इतर संघटनांच्या प्रतिनिधींना बैठकीस बोलावण्यात आले आहे. सुरेश धस हे गेले काही दिवस आक्रमकपणे या ऊस मजुरांचे प्रश्न मांडत आहेत. तसेच तोडगा निघाल्याशिवाय मजुरांना साखर कारखान्यावर जाऊ नये, असे आवाहन ते करत आहे. तसेच मजुरी दरात शंभर टक्क्यांहून अधिक वाढीची आक्रमक मागणी त्यांनी केलेली आहे. त्यांच्या या मागणीमुळे पंकजा मुंडे यांच्याशी देखील त्यांचे मतभेद झाल्याचे दिसून येत होते. ऊस तोडणी कामगारांमध्ये धस हे आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न करत असल्याचे लक्षात आल्यानंतर पंकजा मुंडे समर्थक त्यांच्यावर टीका करत होते. तसेच पंकजा व धस यांच्यातही आधीप्रमाणे सख्य नसल्याचे या निमित्ताने दिसून आले. 

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

म्हणून घडला चर्चेचा विषय 
शरद पवार यांच्याशी चर्चा केल्याशिवाय ऊसतोड कामगारांचा विषय मार्गी लागणार नाही. तर ऊसतोड मजुरांनी देखील कामावर जाऊ नये अशी भूमिका सुरेश धसांनी घेतली. मात्र, आजच्या बैठकीत सुरेश धसांनाच प्रवेश नाकारल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे. 

पत्रकार परिषदेत केली मागणी 
तुमच्या घामाच्या, रक्ताच्या, कष्टाच्या मजुरीमध्ये वाढ जाहीर झाल्याशिवाय हा संप मिटणार नाही. मंगळवारी साखर संघ आणि मजुरांच्या संघटनांची बैठक खासदार शरद पवार यांच्या बरोबर होणार आहे. त्या बैठकीमध्ये निर्णय होणार असल्याने तोपर्यंत मजुरांनी गावीच थांबावे, कारखान्याकडे जाऊ नये असे आवाहन भाजप आमदार सुरेश धस यांनी गेल्या आठवड्यात केले होते. धस यांनी शनिवारी आष्टीत पत्रकार परिषद घेतली होती. ऊसतोडणी मजुरांच्या दरांमध्ये दीडशे टक्के वाढ मिळावी, मुकादमच्या कमिशनमध्ये साडे आठरा रुपयांवरुन ३७ रुपये वाढ द्यावी आणि वाहतूक ठेकेदारांना ५० टक्के वाढ मिळावी यासह कारखान्यांवर सार्वजनिक स्वच्छतागृह असावेत आदी मागण्या केल्या.

(संपादन-प्रताप अवचार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shugar meeting pune suresh dhas no entry movement after entry