अनाथांची माई : सिंधूताईंच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग माहितीये? | Sindhutai sapkal | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sindhutai sapkal
अनाथांची माई : सिंधूताईंच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग माहितीये?

अनाथांची माई : सिंधूताईंच्या जीवनाला कलाटणी देणारा प्रसंग माहितीये?

हजारो अनाथांना आईची माया देणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांचं आज निधन झालं. परिस्थितीमुळे स्वत:च शिक्षण पूर्ण करू न शकणाऱ्या सिंधुताईंनी चांगलं शिक्षण देऊन स्वावलंबी बनविलेली मुलं आज पुन्हा पोरकी झाली आहेत.

सिंधूताईंना लोक प्रेमानं, आदरानं माई म्हणत असत. विदर्भा वर्धा जिल्ह्यातलं नवरगाव इथं त्यांचा जन्म झाला. शिक्षणाची सोय नसलेल्या गावात बालपण गेल्यावर नंतर कुटुंबासह त्या पिंपरीत आल्या. जेमतेम चौथीपर्यंत शाळा शिकण्याची संधी मिळाल्यावर वयाच्या नवव्या वर्षीच त्यांचा त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठ्या असलेल्या व्यक्तीबरोबर विवाह लावून देण्यात आला. सासरी प्रचंड त्रास सहन कराव्या लागलेल्या सिंधूताईंना अठरा वर्षापर्यंत तीन अपत्ये झाली होती.

हेही वाचा: स्मशानात चितेवर भाजलेली भाकरी ते पद्मश्री; सिंधूताईंचा प्रवास थक्क करणारा

चौथ्यावेळी गर्भवती असताना त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळाली. शेतात चरायला जाणाऱ्या गुरांचं शेण गोळा करणाऱ्या महिलांना त्यांनी बंड पुकारले आणि हा लढा जिंकला. यामुळे महिलांना नेतृत्व मिळालं तरी त्यामुळे जमीनदार दुखावला गेला आणि त्याने सिंधूताईंच्या चारित्र्याबद्दल अपप्रचार केला. यातूनच सासर सुटलं. तशातच मुलगी झाल्यानं गावकऱ्यांनी हाकलून दिलं. माहेरी आईनेही स्वीकारलं नाही.

अशा परिस्थितीत पोट भरण्यासाठी त्यांनी परभणी, नांदेड इथं स्थानकांवर भीकही मागितली. रात्री झोपायला त्या स्मशानात जात असत. स्मशानात प्रेत जाळायला येणारे लोक त्यांना पीठ आणि पैसे देऊ लागले. त्यांनी चितेच्या निखाऱ्यावर भाकरी करून दिवस काढले. नंतर पुण्यात एक अनाथ मुलगा रडत बसला होता. त्याला घेऊन पोलिस स्थानकावर तक्रार नोंदविण्यासाठी गेल्या असता त्यांची तक्रारही कोणी घेतली नाही. या मुलाचा सांभाळ करायचा निर्णय त्यांनी घेतल्यावर त्यांना काही दिवसांनी अशीच अनाथ असलेली आणखी काही मुले आढळली.

हेही वाचा: पद्मश्री ते अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार वाचा सिंधुताईंचा प्रवास

त्यांचाही सांभाळ त्यांनी सुरु केला. या अनाथ मुलांसाठी त्यांनी बालसदनची स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आणखी अनाथ मुला-मुलींना आश्रय दिला. या आश्रमाद्वारे मुलांच्या राहण्या-खाण्याची, शिक्षणाची सोय करण्यात आली. त्यांना स्वावलंबी बनवून त्यांचा विवाहही लावून दिला जातो. राज्यात त्या ‘अनाथांची आई’ म्हणून प्रसिद्ध झाल्या.

सुरुवातीच्या काळात अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागलेल्या सिंधूताईंना नंतरच्या काळात समाजाकडून आणि सरकारकडून मदत मिळाल्याने मुलांचा सांभाळ करण्याचे काम त्यांनी अधिक जोमाने केले. त्यांनी नंतर महाराष्ट्रात चार अनाथआश्रम स्थापन केले. आजपर्यंत त्यांनी अडीच हजारांहून अधिक अनाथांना आश्रय दिला आहे. काही वर्षांपूर्वी चिखलदरा इथं वसतीगृह सुरु केले. इथं अनेक मुलींची राहण्याची सोय झाली आहे. ‘माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत,’ हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येत असे. त्यांची मुलगी ममता या देखील आईच्या कामात सहभागी आहेत.

अनेक पुरस्कारांच्या मानकरी

सिंधूताई यांना सन २०१६ मध्ये सामाजिक कार्यासाठी डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्चतर्फे डॉक्टरेट देण्यात आली. सिंधूताई यांना एकूण २७३ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. महिला व बालकांसाठी कार्यरत सामाजिक कार्यकर्त्यांना प्रदान केला जाणारा ‘अहिल्याबाई होळकर पुरस्कार’ त्यांना मिळाला आहे. महिलांना समर्पित भारताचा सर्वोच्च नारी शक्ती पुरस्कार त्यांना सन २०१७ मध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी प्रदान केला होता. सन २०१० मध्ये सिंधूताई यांच्यावर जीवनावर आधारित ‘मी सिंधूताई सपकाळ’ हा एक मराठी चित्रपट प्रसिद्ध झाला होता. ५४व्या लंडन फिल्म फेस्टिव्हलसाठीही या चित्रपटाची निवड केली होती. गेल्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याहस्ते त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा: "माई गेल्या नाहीत..."; सिंधुताईंची लेक ममतांनी फोडला हंबरडा

हजार मुलांची आजी

सिंधूताई यांना लोक प्रेमाने ‘माई’ आणि ‘अनाथांची आई’ म्हणतात. त्या १४०० पेक्षा जास्त अनाथ मुलांची आई आणि १००० हून अधिक मुलांची आजी आहे. आज त्यांना १७२ जावई आहेत. कुंभारवळण येथील आश्रमात ५० मुली व ६५ मुले राहतात. तसेच, शिरूर येथील आश्रमात ४८ मुले आहेत. तर, चिखलदरा येथे ७८ मुले यांचा सांभाळ केला जात आहे. त्यांची स्वतःची मुलगी वकील आहे. पुरस्कारातून आलेल्या पैशाचा उपयोग त्या अनाथाश्रमांसाठी करीत होत्या.

सिंधूताईंनी उभारलेल्या संस्था

  • बाल निकेतन हडपसर, पुणे

  • सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, चिखलदरा

  • अभिमान बाल भवन, वर्धा

  • गोपिका गाई रक्षण केंद्र, वर्धा ( गोपालन)

  • ममता बाल सदन, सासवड

  • सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षणसंस्था, पुणे

पुन्हा अशी व्यक्ती होणे नाही - तेजस्विनी पंडित, अभिनेत्री

माझी आणि माईंची पहिली भेट पुण्यामध्ये झाली होती. अनाथ मुलांच्या अस्तित्वाची लढाई त्या शेवटपर्यंत लढत राहिल्या. सतत प्रयत्न करत राहा. कधीही हार न मानणे. कितीही कठीण परिस्थिती असली तरीही त्या परिस्थितीमध्ये न डगमगता खंबीरपणे उभे राहणे हे त्यांचे गुण ‘मी सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटाच्या काळात मी त्यांच्याकडून शिकले. सिंधूताईंनी उभे केले काम अतिशय महान आहे. त्यांच्यासारखी व्यक्ती परत होणे नाही.

आपली चित्रपटसृष्टी प्रत्येक महान व्यक्तीच्या कार्याला लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करते. माईंचे आयुष्य ‘मी सिंधूताई सपकाळ’ या चित्रपटामार्फत मला लोकांपर्यंत पोचविण्यात खारीचा वाटा उचलता हे मी माझे भाग्यच समजते.

हेही वाचा: 'मी सिंधुताई सपकाळ' चित्रपटाच्या दिग्दर्शकानं विशेष शब्दांत वाहिली आदरांजली

सिंधूताई सपकाळ यांचे अकाली निधन चटका लावणारे आहे. अनाथ मुलांसाठी मायेची सावली धरणाऱ्या सिंधूताईंनी उभे केलेले सामाजिक कार्य अनेक पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल.

- शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

ज्येष्ठ समाजसेविका व ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधूताई सपकाळ यांच्या निधनाची बातमी समजली. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली.

- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री

खडतर परिस्थितीशी संघर्ष करत हजारो अनाथ बालकांना सिंधुताईंनी मायेचा आधार दिला. तीन दशकांहून अधिक काळ सुरू असलेला त्यांचा हा प्रवास आज थांबला असला तरी त्यांनी सुरू केलेला सेवायज्ञ कायम तेवत ठेवणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.

- अशोक चव्हाण, काँग्रेसचे नेते

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top