कायदा मोडल्यास सहा महिन्यांची शिक्षा। मनसे पदाधिकारी अन्‌ सोशल मिडियावर वॉच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra police
कायदा मोडल्यास सहा महिन्यांची शिक्षा। मनसे पदाधिकारी अन्‌ सोशल मिडियावर वॉच

कायदा मोडल्यास सहा महिन्यांची शिक्षा! मनसे पदाधिकारी अन्‌ सोशल मीडियावर वॉच

सोलापूर : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) प्रमुख राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर पोलिसांनी शहरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. मनसेच्या आठ कार्यकर्त्यांना विजापूर नाका पोलिसांनी तर ग्रामीणमधील काही कार्यकर्त्यांना संबंधित पोलिसांनी नोटीस बजावली आहे. नेत्यांच्या सांगण्यावरून कोणतेही प्रक्षोभक वर्तन, भाषण, घोषणाबाजी किंवा गैरकृत्य केल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे त्यातून स्पष्ट केले आहे. या नोटिशीनुसार संबंधिताला किमान सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा: महापालिका निवडणुकीसाठी महाआघाडीचा ४०: ४० :३३ फॉर्म्युला

सध्या रमजान ईद, बसवेश्वर जयंती, शिवजयंती, अक्षय तृतीया, दुर्गाष्टमी असे सर्व धर्मीयांचे सण-उत्सव साजरे होत आहेत. विविध धर्मीयांचे सण-उत्सव पारंपरिक रीतिरिवाज, चालिरीती व प्रार्थनेने साजरे केले जातात. पण, राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी तसेच धार्मिक नेत्यांकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांकडून खबरदारी घेतली जात आहे. २८ एप्रिलच्या आदेशानुसार सोलापूर शहरात जमावबंदीचे आदेश लागू झाले आहेत. त्यानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र फिरण्यास बंदी असून इतरांना इजा होईल अशी काठी, शस्त्र जवळ बाळगणेही गुन्हा ठरणार आहे. दरम्यान, आठ पदाधकाऱ्यांनाच पोलिसांनी नोटीस दिल्याचे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर यांनी सांगितले. तर ग्रामीण पोलिसांनी तेथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बोलावून शांतता पाळावे, असे आवाहन केले आहे.

हेही वाचा: शाळा सुरु होताच मुलांना मिळणार दोन गणवेश! राज्याकडून २१५ कोटींचा निधी

 • नोटिशीतील ठळक बाबी...
  - जमावबंदी व शस्त्रबंदीच्या आदेशाचे सर्वांनीच काटेकोरपणे पालन करावे
  - सहकारी, पाठिराखे व समर्थकांकडून कोणतेही गैरकृत्य होणार नाही याची दक्षता घ्यावी
  - कोणतेही प्रक्षोभक भाषण, वर्तन, घोषणाबाजी किंवा बेकायदेशीर कृत्य होऊ नये
  - समाजातील शांतता व सुव्यवस्था बिघडेल असे कृत्य घडल्यास त्याबद्दल कायदेशीर कारवाई होईल
  - गुन्हा दाखल झाल्यानंतर भक्कम पुरावा म्हणून ही नोटीस न्यायालयात सादर केली जाईल

हेही वाचा: ५६ रुपयांच्या इंधनाची किंमत १२० रुपये। पेट्रोल-डिझेलवरील टॅक्स कोणी कमी करायचा?

नोटिशीतील कलमानुसार...
नोटिशीतील बाबींचे उल्लंघन करून कायदा हातात घेतल्यास संबंधितांवर महाराष्ट्र पोलिस अधिनियम ३७ (१)(३) १३५ नुसार कारवाई केली जाणार आहे. जमावबंदी, शस्त्रबंदीचा नियम मोडणाऱ्यांविरुद्ध सर्वप्रथम ३७(१)(३) हे कलम लागते. त्यानंतर १३५ अन्वये संबंधितांवर गुन्हा दाखल होऊन त्याच्यावर कारवाई होते. या कलमांनुसार समोरील व्यक्तीला किमान सहा महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

हेही वाचा: शाळकरी मुलींचे बालविवाह! मुख्याध्यापकही असणार जबाबदार?

जिल्ह्यात तीन हजार पोलिसांचा बंदोबस्त
अक्कलकोट, बार्शी येथे राज्य राखीव पोलिस बलाची प्रत्येकी एक तुकडी असेल. तसेच ग्रामीणमधील सात पोलिस उअधीक्षकांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी १५ पोलिसांची टीम बंदोबस्तासाठी असेल. ग्रामीणसाठी ८०० होमगार्ड आणि जवळपास बाराशे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त आहे. शहरात साडेपाचशे होमगार्ड आणि जवळपास नऊशे पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी (ता. ३) दंगा पथकाची रंगीत तालिम घेतली. दरम्यान, मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरही लक्ष ठेवून असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: विद्यापीठाची २५ मेपासून परीक्षा ऑफलाईनच! १५ मिनिटांचा ज्यादा वेळ

कोणत्याही गैरकृत्याने सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडू नये, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. काहींना १४१ अंतर्गत नोटीस बजावली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. पोलिसांचा सोशल मिडियावरील आक्षेपार्ह पोस्टवर वॉच आहे. आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.
- हिम्मत जाधव, अप्पर पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण

Web Title: Six Months Imprisonment For Breaking The Law Manase Office Bearers And Watch On Social Media A

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top