

solapur vidhan parishad election
sakal
प्रमोद बोडके
सोलापूर : भाजप उमेदवार राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात विधान परिषदेसाठी लढत होत आहे. लढत जरी राऊत-देशमुख यांच्यात असली तरीही या निकालावर पालकमंत्री जयकुमार गोरे व खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांची प्रतिष्ठा ठरणार आहे. या निवडणुकीत खांदा जरी राऊत-देशमुखांचा असला तरीही खरा सामना मात्र पालकमंत्री गोरेंविरुद्ध खासदार मोहिते-पाटील यांच्यातच असणार आहे.
२००९ च्या पुर्नरचनेत माढा लोकसभा मतदारसंघाचा जन्म झाला. सख्खे शेजारी असलेले माळशिरस आणि माण विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभेत आले आहेत. तेव्हापासून ते आतापर्यंत जवळपास १७ वर्षांपासून मोहिते-पाटील व गोरे यांच्यातील सत्तासंघर्ष कायम राहिला आहे. २०१४ व २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत हा संघर्ष प्रकर्षाने दिसला. सोलापूरचे पालकमंत्रीपद गोरे यांच्याकडे आल्यानंतर या संघर्षाची धार अधिक तीव्र झाली.
नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोहिते-पाटलांनी माळशिरस राखले आणि पालकमंत्री गोरेंनी सोलापूर जिंकले, त्यामुळे नक्की कोण जिंकले आणि कोण हरले? याचे उत्तर संभ्रमात टाकणारे आहे. आता पुन्हा एकदा अप्रत्यक्षरीत्या गोरे आणि मोहिते-पाटील समोरासमोर आले आहेत. या निवडणुकीनंतर सर्वात मोठी निवडणूक २०२९ च्या लोकसभेची असल्याने या निवडणुकीचा निकाल सोलापूरच्या राजकारणासाठी ‘टर्निंग पॉईंट’ ठरु शकतो.
‘या’ तीन लोकसभेवर थेट परिणाम
भाजप उमेदवार राजेंद्र राऊत हे धाराशिव लोकसभा मतदारसंघातील तर राष्ट्रवादीचे उमेदवार वसंतराव देशमुख हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील आहेत. पालकमंत्री गोरे व खासदार मोहिते-पाटील हे माढा लोकसभा मतदारसंघात येतात. तीन लोकसभा मतदारसंघाच्या राजकारणावर परिणाम टाकणारी निवडणूक म्हणूनही या निकालाकडे पाहिले जाणार आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सध्या नक्की कोण कोणासोबत आहे? याचे ठोस उत्तर या निवडणुकीच्या निकालातून मिळण्याची शक्यता आहे.
आमदार कल्याणशेट्टी व कोठे यांची परीक्षा
जिल्ह्याच्या राजकारणातील अस्वस्थतेच्या प्रमुख कारणांमध्ये पालकमंत्री गोरे यांचा वाढलेला हस्तक्षेप हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. भाजपमधील अस्वस्थतेच्या कारणात प्रमुख कारण म्हणून आमदार सचिन कल्याणशेट्टी व आमदार देवेंद्र कोठे यांची वाढलेली ताकद मानली जात आहे. या निवडणुकीत भाजपला साजेसा विजय मिळवून देण्यात आमदार कल्याणशेट्टी, आमदार कोठे यांची विशेष परीक्षा असणार आहे.
एकमेकांविरुद्ध लढलेल्यांमध्ये मैत्रीचे पर्व की नाईलाज
सांगोल्यातील पारंपारिक स्पर्धक आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार शहाजी पाटील व माजी आमदार दिपक साळुंखे भाजपसोबत आहेत. तशीच स्थिती करमाळ्यातही आहे. आमदार नारायण पाटील, माजी आमदार संजयमामा शिंदे व जिल्हा परिषदेतील भाजप गटनेत्या रश्मी बागल आज भाजपसोबत आहेत. आतापर्यंत एकमेकांच्या विरोधात लढलेले हे नेते आज भाजपसोबत आहेत, याचा अर्थ या तालुक्यात मैत्रीपर्व आले की या नेत्यांचा नाइलाज आहे?, या बद्दल कमालीची उत्सुकता आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.