सोलापूर-पुणे ई-बससेवा १५ ऑगस्टपासून! चार्जिंग स्टेशनवर ट्रायल झाली, आता बस मिळताच सेवेला सुरवात

इंधन खर्चात बचत व्हावी, लालपरीला पुन्हा ऊर्जितावस्था यावी म्हणून राज्यभरात इलेक्ट्रिक बससेवा सुरु केली जात आहे. सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बससेवा आता १५ ऑगस्टपासून सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडून सुरू आहे.
electric bus
electric bus esakal

सोलापूर : इंधन खर्चात बचत व्हावी, लालपरीला पुन्हा ऊर्जितावस्था यावी म्हणून राज्यभरात इलेक्ट्रिक बससेवा सुरु केली जात आहे. याअनुषंगाने सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बससेवा आता १५ ऑगस्टपासून सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाकडून सुरू आहे.

उन्हाळा असो वा पावसाळा, प्रवाशांना गावापर्यंत सेवा देणारी लालपरी आता अडचणीतून मार्ग काढू लागली आहे. वातानुकूलित बससेवेसोबतच आता इलेक्ट्रिक बससेवा देखील सुरू होत आहे. दरम्यान, सोलापूर विभागीय कार्यशाळेत चार्जिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. ‘महावितरण’च्या माध्यमातून त्याची ट्रायल देखील नुकतीच पार पडली आहे. आता कंपनीकडे दहा बसगाड्यांची मागणी केली असून त्या १४ ऑगस्टपूर्वी मिळतील, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्या दिवशी इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे.

पण, बस उपलब्ध न झाल्यास ऑगस्टअखेर ही सेवा सुरु होईल, असेही अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले. परिवहन महामंडळाला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या राज्यातील विभागांमध्ये सोलापूर हे टॉपटेनमध्ये आहे. दररोज सोलापूर विभागाच्या २० ते २२ गाड्या सोलापूर-पुणे या मार्गावर धावतात. त्या गाड्यांमध्ये प्रवासी देखील पूर्ण क्षमतेने असतात. महिलांना ५० टक्के तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत आणि ६५ वर्षांवरील ज्येष्ठांना ५० टक्के सवलत असल्याने त्यांचीही संख्या लक्षणीय आहे. विशेषत: पंढरपूर, बार्शी, अक्कलकोट व सोलापूर या आगारातून सवलतीचे प्रवासी खूप मोठ्या प्रमाणावर आहेत. आणखी १०० गाड्यांची सोलापूर विभागाला आवश्यकता आहे, पण बसगाड्यांची उपलब्धता नसल्याची वस्तुस्थिती आहे.

सकाळी साडेपाचपासून पुण्याला बस

सकाळी साडेपाच वाजल्यापासून सोलापूरहून पुण्याला बसगाड्या उपलब्ध आहेत. सोलापूर विभागासह अक्कलकोट, सांगोला, मंगळवेढा, बार्शी, पंढरपूर येथूनही परजिल्ह्यातील बसगाड्या पुण्याला जातात. पुण्याला जाणाऱ्या प्रवाशाला खूपवेळ बस स्थानकांवर उभारावे लागत नाही. या पार्श्वभूमीवर आता पहिल्यांदा सोलापूर-पुणे ही इलेक्ट्रिक बससेवा सुरू केली जाणार आहे.

लवकरच सुरु होईल बससेवा

सोलापूर-पुणे या मार्गावर काही दिवसांतच इलेक्ट्रिक बससेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. चार्जिंग स्टेशनची ट्रायल देखील झाली आहे. या बससेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास आहे.

- विनोद भालेराव, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, विभाग नियंत्रक, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com