esakal | SSC Result 2021: बैठक क्रमांकच माहिती नाही, निकाल बघणार कसा?
sakal

बोलून बातमी शोधा

result

SSC Result 2021: बैठक क्रमांकच माहिती नाही, निकाल बघणार कसा?

sakal_logo
By
संदीप लांडगे

औरंगाबाद: राज्यातील दहावीचा निकाल शुक्रवारी (ता.१६) दुपारी एकला जाहीर होणार आहे. राज्यातील ९० टक्के विद्यार्थ्यांना स्वतःचे बैठक क्रमांकच माहिती नसल्याने निकाल कसा पाहावा, असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यंदा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने दहावीची परीक्षा रद्द केली. त्यामुळे निकाल कसा लागणार याबाबत विद्यार्थी, पालकांमध्ये उत्सुकता होती. विद्यार्थ्यांचे मूल्यमापन त्यांच्या वर्षभरातील तसेच आधीच्या वर्षाच्या कामगिरीच्या आधारे निकाल जाहीर होईल. तो बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट mahahsscboard.maharashtra.gov.in किंवा mahasscboard.in यावर असेल.

कोरोनामुळे वर्षभर शाळा बंद होत्या. त्यामुळे शाळांनी विद्यार्थ्यांना हॉलतिकीट वाटले नाहीत. हॉलतिकीट नसल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा आसन क्रमांक देखील माहिती झालेला नाही. त्यामुळे निकाल कसा पाहावा? असा प्रश्‍न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे. राज्यातून यंदा १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी दहावीला आहेत. यात ९ लाख ९ हजार ९३१ मुलं; तर ७ लाख ४८ हजार ६९३ मुली आहेत. कोरोनामुळे यंदा शाळा सुरू झाल्या नाहीत. मात्र, विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी परीक्षा आसन क्रमांक उपलब्ध करून देण्यात यावा, अशा सूचना शिक्षण मंडळाकडून वारंवार शाळांना देण्यात आल्या होत्या; पंरतु शाळांनी विद्यार्थ्यांना आसनक्रमांकाची माहितीच दिली नसल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांशी संपर्क करता आला नाही. कोरोनामुळे विद्यार्थ्यांना हॉलतिकीट देणे शक्य नसल्याचे शाळांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: औरंगाबादेत E-Way Bill नसणाऱ्या वाहनांना तब्बल ६० लाखांचा दंड

आधी जावे लागणार शाळेत
विद्यार्थ्यांना घरात बसून मोबाईलवर तातडीने निकाल पाहता येणार नाही. पहिल्यांदा त्यांना शाळेत जाऊन बैठक क्रमांक घ्यावा लागणार आहे त्यानंतरच ते निकाल पाहू शकतील.

विभागातील सर्व शाळांना पंधरा दिवसांपूर्वीच आम्ही सूचना दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांचे नाव व त्यांचा बैठक क्रमांक फलकावर लावण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. बैठक क्रमांक माहीत नसलेल्यांनी त्यांच्या शाळेत जाऊन तो घेऊन निकाल पाहावा.
सुधाकर तेलंग, सचिव, विभागीय मंडळ.

हेही वाचा: जळगावात तहसीलदाराला धक्काबुक्की करत चालकाला बेदम मारहाण

शाळेने हॉलतिकीट दिले नसल्याने परीक्षा आसन क्रमांक माहीत नाही. त्यामुळे बोर्डाच्या संकेतस्थळावर निकाल कसा बघावा?
- जय घोडके (विद्यार्थी)

निकालाबाबत उत्सुकता आहे. मात्र तो पाहणार कसा? शाळांनी देखील हॉल तिकिटाबाबत कुठलीही माहिती दिलेली नाही.
- विश्‍वजित इतबारे (विद्यार्थी)

loading image