राज्यात १५ लाख हेक्टरवर ऊस! हमखास भावामुळे शेतकऱ्यांची उसालाच सर्वाधिक पसंती

शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती उसालाच आहे. १ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आगामी गाळप हंगामासाठी २१० साखर कारखान्यांना राज्यातील तब्बल १५ लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा दोन लाख २० हजार हेक्टरवर ऊस आहे.
ऊस
ऊस sakal

सोलापूर : शेतमालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांची सर्वाधिक पसंती उसालाच आहे. १ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या आगामी गाळप हंगामासाठी २१० साखर कारखान्यांना राज्यातील तब्बल १५ लाख हेक्टरवरील ऊस उपलब्ध असणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यंदा दोन लाख २० हजार हेक्टरवर ऊस आहे. मागच्या वर्षी राज्यात १४.८७ लाख हेक्टरवर ऊस होता.

कोल्हापूर, सोलापूर, नगर, सांगली, सातारा, धाराशिव, पुणे या जिल्ह्यांमध्ये उसाची लागवड सर्वाधिक आहे. दरम्यान, अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी, महापूर, दुष्काळ अशा संकटांमुळे राज्यातील बळीराजा पुरता संकटात सापडला आहे. दरवर्षी काही ना काही नैसर्गिक संकट त्याच्या नशिबी असतेच.

अशावेळी केळी, द्राक्ष, आंबा, कांदा, तूर, सोयाबीन, कापूस यासह इतर पिकांना हमीभाव अजूनही मिळालेला नाही. त्यातच लाखोंचा खर्च करूनही पुन्हा नैसर्गिक संकटाची भीती आणि वेगवेगळी रोगराई, यामुळे बॅंकांच्या कर्जाचा हप्ता फेडता येईल इतके पण उत्पन्न येत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे दरवर्षी १२ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना खासगी सावकारांचा दरवाजा ठोठवावा लागत असल्याचे चित्र महाराष्ट्रात आहे. या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात उसाचे क्षेत्र वाढले आहे. शेतकऱ्यांना उसाची शेतीच शाश्वत वाटत असल्याने दरवर्षी सरासरी ३५ ते ४० हजार हेक्टरवर उसाची लागवड वाढत आहे. २०२२-२३ च्या तुलनेत यंदा ४३ हजार हेक्टरवर उसाची लागवड वाढली आहे.

ऊस लागवडीबद्दल शेतकरी म्हणतात...

  • १) महिनाभरातच मिळतो प्रतिक्विंटल बावीसशे ते अडीच हजार रुपयांचा पहिला हप्ता

  • २) अन्य पिकांच्या तुलनेत उसाला रोगराईचा फारसा धोका नसतो; उत्पन्नाच्या तुलनेत खर्च कमीच

  • ३) मशागतीचा (खुरपणी वगैरे नाही) खर्च कमी, ऊस बांधणीला येईपर्यंत घेता येते आंतरपीक

  • ४) नैसर्गिक संकटात जादा नुकसान होत नाही; एकदा लागवड केली की किमान तीनवेळा घेता येते उत्पन्न

  • ५) गाळपाला पंधरा महिन्यात जातो ऊस; १५ दिवसात एफआरपी मिळाल्याने आर्थिक गणित बिघडत नाही

बॅंकांकडून उसाच्या पीककर्जात वाढ

राष्ट्रीयकृत बॅंकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांनी आता उसाच्या पिकावर वाढीव पीककर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला राज्यस्तरीय बॅंकर्स कमिटीने यापूर्वीच मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर एप्रिल २०२३पासून आडसाली उसासाठी हेक्टरी एक लाख २६ हजार ५०० रुपये, पूर्व हंगामी व सुरु उसासाठी एक लाख २१ हजार रुपये, खोडवा उसासाठी एक लाख १० हजार रुपये आणि टिश्यूकल्चर उसासाठी हेक्टरी ९९ हजारांचे पीककर्ज बॅंकांकडून दिले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com