लढवय्ये बाबा! वाचा सुप्रिया सुळेंचा भावनिक ब्लॉग

Supriya Sule Writes an article on Sharad Pawar as he celebrates his 79th birthday
Supriya Sule Writes an article on Sharad Pawar as he celebrates his 79th birthday

सोशल मिडियाचा हा जमाना आहे. विधानसभा निवडणूकीच्या काळात बाबांचा तो पावसात भिजलेला फोटो आणि त्याखालील एक कॅप्शन मनात घर करुन गेलं. त्यात लिहिलं होतं की, ‘सर्व काही संपत आल्यासारखं वाटू लागलं तर हा फोटो पहा, नवी भरारी मारण्याची उमेद मिळेल’.

बाबा लढवय्ये आहेत,प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करुन तिला अनुकूल करणारे जादूगार आहेत. बाबांचं हे विलक्षण रुप मी लहानपणापासून अनुभवतेय.पण यंदाच्या निवडणूका आणि त्यानंतरच्या घडामोडींमध्ये त्याचा परमोच्च बिंदू आम्ही सर्वांनीच अनुभवला. एवढी कठीण परिस्थिती अवतीभोवती असतानाही ते हताश,निराश झाल्याचं मी पाहिलं नाही. उलट सर्वांनाच ते धीर देत परिस्थिती बदलण्यासाठी लढण्याचं सामर्थ्य देत राहिले.

साताऱ्याच्या सभेत भर पावसात भिजत-भिजत केलेल्या भाषणामुळे महाराष्ट्रात अक्षरशः चमत्कार घडला. लोकांचा आपल्या नेत्यावरील विश्वास अधिक दृढ झाला. समोर हजारोंची गर्दी पावसात भिजत असताना ते भाषणाला उभे राहिले. जनतेशी अफाट निश्चयाने त्यांनी अगदी अंतरीचा संवाद साधला. त्यांचा हा संवाद सोशल मिडिया,वृत्तवाहिन्या यांच्या माध्यमातून देशभरात पोहोचला. जेंव्हा मी ही सभा पाहत होते, तेंव्हा त्यांचं हे असं भिजणं थोडं काळजीचं वाटलं. पण बाबा, पावसासारख्या अडचणींना पुरुन उरणारे आहेत, ही खात्री देखील मनात होतीच. बाबांनी, साताऱ्याच्या त्या पावसात लोकांच्या मनातील निराशा, हताशा हे सगळं धुवून काढलं. त्यांना बदलासाठी, लढण्यासाठी प्रवृत्त केलं. निवडणूकीनंतरच्या सत्तास्थापनेच्या काळातील सर्व अडचणींवर ते स्वतः लक्ष देऊन मार्ग काढत राहिले.केवळ जनतेलाच नाही तर मित्रपक्षांतील नेत्यांनाही त्यांनी लढत राहण्याचा विश्वास दिला.

अर्थात बाबांचा हा लढावू बाणा एका दिवसांत आलेला नाही. त्यामागे त्यांची किमान पाच दशकांची वैचारिक मशागत आहे. अगदी पूर्वीपासूनच बाबांची भवतालचं आकलन करुन घेण्याची क्षमता अफाट आहे. या आकलनातून ते अचूक अंदाज बांधतात आणि त्यानुसार कृती करतात.

लोकसभा निवडणूकीचं मतदान झाल्यानंतर ते लगेचच शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधू लागले. राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याला बाबांना असं थेट भेटणं खुपच आश्वासक वाटत होतं. गेल्या पाच वर्षांच्या काळात शेतीक्षेत्राचं अतोनात नुकसान झालं आहे. नैसर्गिक संकटांची साखळी आणि त्यात केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांची शेतीप्रश्नांबाबतची अनास्था यांमुळे या वर्गाच्या मनात मुख्य प्रवाहापासून तोडले गेल्याची असुरक्षितपणाची भावना आहे, हे त्यांच्या लक्षात आले होते. यामुळेच जेंव्हा ते थेट बांधावर जाऊन लोकांना भेटू लागले तेंव्हा लोकांना ते खुपच आश्वासक वाटलं. स्वतः बाबा देखील तब्येतीची कसलीही फिकीर न करता त्यांना भेटत होते. त्यांचं म्हणणं ऐकून घेत होते. त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या संकटावर कशी मात करता येईल याचा विचारही करीत होते. त्यांच्यातील हा लढवय्या त्यांना कधीच स्वस्थ बसू देत नाही,हेच त्यांचं वेगळेपण अधोरेखित करण्यासाठी पुरेसं आहे.

बाबा,यावर्षी आयुष्याची आठ दशकं पुर्ण करीत आहेत.पण जणू काळ त्यांच्यासाठी थांबलेला आहे.आजही बाबांची नव्या जगाशी ओळख करुन घेण्याची जिज्ञासा त्यांना स्वस्थ बसू देत नाही. सतत काही ना काहीतरी वाचन करीत राहणे हा त्यांचा आवडता छंद. मी तर अगदी लहानपणापासून सकाळी सकाळी त्यांना पाहतेय ते वर्तमानपत्रांची मोठी चळत घेऊन वाचत बसल्याचं. वर्तमानपत्रांतील ओळ न् ओळ ते वाचून काढतात. मान्यवरांचे आणि अगदी नवोदितांचेदेखील लेख ते वाचतात. त्यांची विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांशी मैत्री आहे. अगदी आमच्या दिल्लीतील घरी देखील आम्ही अनेकदा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक जमत असतो. बाबा, आमच्यात अगदी मिसळून जातात.हास्यविनोदात रमतात. रात्री कितीही जागरण झालं तरी भल्या पहाटे उठून त्यांचा नेहमीचा परिपाठ मात्र चुकत नाही आणि सकाळचं पेपरवाचनदेखील.

गेली पन्नास वर्षांहून अधिक वर्षे बाबा समाजजीवनात वावरत आहेत. त्यामुळे साहजिकच लोकांना बाबांबद्दल जाणून घेण्याची उत्सुकता असते. बाबांचे आणि माझे नाते कसे आहे याबद्दल त्यांना जाणून घ्यायचे असते. जे सर्वसामान्य घरांतील बाप-लेकीचं नातं असतं,अगदी तसंच हे नातं आहे. त्यात वेगळं असं काहीही नाही. माझ्या अगदी लहानपणापासून त्यांनी आपल्या कुटुंबात आपल्या समाजजीवनातील व्यस्तता आणलेली नाही.आपले काम आणि कुटुंब यांची सरमिसळ त्यांनी कधीच केली नाही.

कुटुंबासाठी त्यांनी नेहमीच वेळ काढून ठेवला. अगदी वेळात वेळ काढून बाबा माझ्यासाठी माझ्यासोबत आले आहेत. माझ्या शाळेतही अगदी मुख्यमंत्रीपदावर असतानाही इतर पालकांप्रमाणे रांगेत उभा राहिलेले आहेत. सत्ता ही क्षणभंगूर असते कायम राहते ती माणूसकी हे तत्त्व त्यांनी आम्हाला आपल्या कृतीतून सतत शिकविलं आहे. त्यांची ही शिकवण अंगी बाणवत आम्ही चालत आहोत. बाबा, माझ्यासाठी माझे रोल मॉडेल आहेत आणि राहतील. उलट यावर्षी त्यांचे हे स्थान आणखी घट्ट झालेय हे नक्की.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com