..तर आम्ही ते खपवून घेणार नाही; 'लाल महाल'प्रकरणी उदयनराजेंचा थेट इशारा I Udayanraje Bhosale | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Udayanraje Bhosale

लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण गेलं आहे.

..तर आम्ही ते खपवून घेणार नाही; 'लाल महाल'प्रकरणी उदयनराजेंचा थेट इशारा

सातारा : लाल महाल (Lal Mahal) ही ऐतिहासिक वास्तू असून या वास्तूला फार मोठा इतिहास आहे. त्यामुळं लाल महाल हा संपूर्ण शिवप्रेमींची अस्मिता आहे. या वास्तूतील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या (Rajmata Jijau) शिल्पाचे पावित्र्य लक्षात घेता, लाल महाल ही वास्तू सिनेमातील नाच गाण्यांचे चित्रीकरण करण्याची जागा नाहीय. याचं संबंधितांनी भान ठेवायला हवं होतं. मात्र, या वास्तूत एका सिनेमाचे चित्रीकरण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यांनी कोणी हे चित्रीकरण केलं असेल, त्यांनी ते चित्रीकरण सिनेमात वापरू नये. त्यांनी ते तात्काळ थांबवावे. तसेच हे चित्रीकरण करण्यास ज्या अधिकाऱ्यांनी परवानगी दिली. त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केलीय.

उदयनराजे पुढं म्हणाले, खरं तर लाल महाल ही वास्तू नाच गाण्यांच्या चित्रीकरणाची जागा नाहीय. मात्र, या ठिकाणी कोणतेही ऐतिहासिक, सामाजिक किंवा सांस्कृतिक प्रसंगाशी संबंधित चित्रीकरण करण्यास आमचा आक्षेप नाही. पण, या वास्तूचा इतिहास लक्षात घेवून चित्रीकरण करणं गरजेचं आहे. केवळ व्यावसायिक हेतूनं कोणी या वास्तूचा वापर करत असेल, तर आम्ही ते खपवून घेणार नाही. त्यामुळं संबंधित दोषींवर पोलिसांनी (Police) कडक कारवाई करावी, असं त्यांनी नमूद केलंय.

मुळात ही वास्तू पुणे महानगर पालिकेच्या (Pune Municipal Corporation) ताब्यात असून या चित्रिकरणासाठी महापालिकेची रितसर परवानगी घेतली आहे का? महापालिकेच्या कोणत्या अधिकाऱ्यांनी ही परवानगी दिली? तसेच जर परवानगी दिली असेल कर कोणत्या अटी व शर्तींवर परवानगी दिली? याची चौकशी झाली पाहिजे. याच वास्तूत चित्रीकरण करण्याचा नेमका हेतू काय आहे? त्याचबरोबर जे चित्रिकरण झाले असेल ते तपासून पोलिसांनी दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणीही खासदार उदयनराजेंनी केलीय.

लाल महालात लावणी करणं पडलं महागात; वैष्णवी पाटीलसह चौघांवर गुन्हा

पुण्याच्या लाल महालात लावणी करणं डान्सर वैष्णवी पाटीलला (Vaishnavi Patil) महागात पडलं आहे. पुण्याच्या फरासखाना पोलिसांकडून (Faraaskhana Police) वैष्णवी पाटीलसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. लाल महालामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे बालपण गेले आहे. ऐतिहासिक महत्त्व असलेल्या लाल महालात लावणी केल्याने भावना दुखावल्याचं सांगत संभाजी ब्रिगेडने कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार कलम 295, 186 अंतर्गत करवाई करण्यात आलीय.