Teacher Recruitment : शिक्षक भरती ठरणार ‘नाकापेक्षा मोती जड’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teachers Recruitment

Teacher Recruitment : शिक्षक भरती ठरणार ‘नाकापेक्षा मोती जड’

इगतपुरी : राज्यातील जिल्हा परिषद, महापालिका व नगर परिषद अशा सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या सरकारी शाळांमध्ये एकूण ३१ हजार शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने तेथे भरती होणार आहे. यातील जवळपास २० हजार रिक्त पदे ही जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये असून, ही संख्या कशी भरली जाणार ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

राज्यात सध्या दोन लाख १४ हजार ११९ शिक्षक कार्यरत आहेत. गेल्या ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या माहितीनुसार तसेच २०१८-१९ च्या पटसंख्येनुसार दोन लाख ४५ हजार ५९१ शिक्षक कार्यरत असणे गरजेचे आहे. यामुळे चार वर्षांपूर्वीच्या संचमान्यतेनुसारही राज्यात ३१ हजार ४७२ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: Job Opportuities : येत्या तीन वर्षीत या क्षेत्रात ६५ लाख नोकऱ्या अन् ब्राईट करियरची संधी

संचमान्यता आधारवरच

विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकानुसार राज्यामध्ये संचमान्यता होऊ घातली आहे. यामुळे पटसंख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. ही वाढ काही हजारांमध्ये होणार असल्याने रिक्त पदांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. त्यातच नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. अशा वेळी शाळांमध्ये पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसतील, तर धोरण कसे राबविणार, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

हेही वाचा: सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

महापालिकांत ४५ टक्के रिक्त पदे

राज्यातील सर्व महापालिकांमध्ये एकूण ४५ टक्के शिक्षकांची कमतरता असल्याचे आकडेवारीतून दिसून आले आहे. अशावेळी शिक्षणाची गुणवत्ता कशी टिकून राहणार? ही पदेही तातडीने भरण्याची मागणी केली जात आहे.

अशी होणार शिक्षक परीक्षा

आता पहिली ते आठवीच्या शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टीईटी’, तर नववी ते अकरावीपर्यंत शाळांवरील शिक्षकांसाठी ‘टेट’ परीक्षा घेण्याचे नियोजन शालेय शिक्षण विभागाने केले आहे. फेब्रुवारीत ही परीक्षा होणार असून, त्यासाठी सहा हजारांहून अधिक केंद्रे असतील. साडेतीन ते चार लाख उमेदवार परीक्षा देतील, असा अंदाज शालेय शिक्षण विभागाने वर्तविला आहे.

परीक्षेपूर्वी शालेय शिक्षण विभाग परीक्षेच्या नियोजनासंदर्भात उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार आहे. परीक्षेचा निकाल जाहीर होताच भरती प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. परंतु, वित्त व नियोजन विभागाकडून त्याला ‘हिरवा कंदील’ आवश्यक असणार आहे.

हेही वाचा: Job Switch : या महिन्यांत चुकूनही घेऊ नका नोकरी बदलण्याचा निर्णय; योग्य वेळ कोणती ?

''शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने रिक्त जागा भरणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्हा परिषद, महापालिकेच्या अनेक शाळा एका शिक्षकाच्या जोरावर सुरू आहेत. असे असेल, तर शैक्षणिक गुणवत्ता कशी राहील. यामुळेच सरकारी शाळांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर परिणाम होत आहे.'' - विजय कोंबे, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

आकडे बोलतात :

राज्यातील प्राथमिक शिक्षक संख्या :

विभाग मंजूर पदे : कार्यरत पदे : रिक्त पदे

जिल्हा परिषद : २१९४२८ : १९९९७६ : १९४५२

महापालिका : १९९६० : ८८६२ : ११०९८

नगर परिषद : ६०३७ : ५१३६ : ९०१

कॅन्टोन्मेंट : १६६ : १४५ : २१

हेही वाचा: Rat Killing Job : या श्रीमंत शहरातले उंदीर मारा आणि कमवा १ कोटी रुपये

जिल्हा परिषद शाळांची सद्यःस्थिती :

एकूण शाळा : ६० हजार ९१२

एकूण विद्यार्थी : ४३ लाख ५५ हजार ०७०

शाळांवरील शिक्षक : दोन लाख १४ हजार ६६०

रिक्त पदे : २९ हजार ६००