Dasara Melava : शिवसेना-तोडफोड सेना युती होणार; तेजस ठाकरे वडील आणि भावाला सावरणार का? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aaditya Thackeray Tejas Thackeray Shivsena
Dasara Melava : शिवसेना-तोडफोड सेना युती होणार; तेजस ठाकरे वडील आणि भावाला सावरणार का?

Dasara Melava : शिवसेना-तोडफोड सेना युती होणार; तेजस ठाकरे वडील आणि भावाला सावरणार का?

शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना. वर्षानुवर्षे महाराष्ट्रासह देशाने हेच समीकरण पाहिलेलं आहे. शिवसेना म्हटलं की प्रत्येक मराठी माणसाच्या समोर ठाकरेंचा कडवा मराठी चेहरा, आक्रमक आणि सडेतोड लेखणी आणि पहाडी आवाज डोळ्यासमोर येतो. ठाकरे परिवारापासून सुरू झालेला हा पक्ष आता दुभंगल्याचं दिसून येत आहे. एकेकाळचे शिवसेनेचे, बाळासाहेबांचेही जवळचे मानले जाणारे एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेच्या मुळालाच धक्का लावला आणि त्यामुळे हे संघटन अक्षरशः कोलमडलं. पण ज्यामुळे ठाकरे परिवाराची दखल इतिहासाने घेतली आणि घेईल, असं हे संघटन जपणं उद्धव ठाकरेंना भाग आहे आणि त्यामुळेच आता या राजकीय खेळात ठाकरे आपला हुकुमाचा एक्का बाहेर काढतायत. तो एक्का बाहेर काढण्यासाठी याहून योग्य वेळ नाही, हे मात्र नक्की. पण असं काय विशेष आहे यामध्ये? उद्धव ठाकरेंच्या या खेळीचा अर्थ काय आणि त्याला महत्त्व काय? या सगळ्याचा उहापोह करणं इथं गरजेचं आहे.

हेही वाचा: Dasara Melava Shivsena: ठरलं? शिंदे गटाचा अर्ज BMC ने स्विकारला तर शिवसेनेचा फेटाळला!

शिवसेनेत दोन गट पडले आणि सगळं समीकरणच पालटलं. १९६६ म्हणजे पक्षाच्या स्थापनेपासून पक्षाची परंपरा असलेल्या आणि सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेल्या दसरा मेळाव्यालाही या गटबाजीचा फटका बसला आहे. बाळासाहेब ठाकरेंची गर्जना ऐकू येणाऱ्या शिवतीर्थावर यंदा कोणाचा आवाज घुमणार हा मुद्दा आता न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या नेतृत्वाखालचा गट आपणच खरी शिवसेना असल्याचा दावा सांगतानाच दसरा मेळावाही आपणच घेणार यावर ठाम आहेत. तर दुसरीकडे शिवसेनाही दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कावरच अडून आहे. या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेची मात्र कोंडी झाली. परवानगी कोणत्या गटाला द्यावी, याबाबत संभ्रम आहे. त्यामुळे दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार, हा प्रश्न आता न्यायालयात पोहोचला आहे. मात्र याच दरम्यान, शिवसेनेने दसरा मेळाव्याचं पोस्टरही प्रदर्शित केलं आहे. या पोस्टरवर पत्ता आहे "शिवाजी पार्क, दादर." पण महत्त्वाचा मुद्दा हा नाही. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या तीन महाराष्ट्राच्या राजकारणाला सुपरिचित असलेल्या चेहऱ्यांसोबत एक नवखा चेहराही या पोस्टरवर झळकतोय. हा चेहरा म्हणजेच उद्धव ठाकरेंचा हुकुमी एक्का, त्यांचे दुसरे चिरंजीव, तेजस ठाकरे.

हेही वाचा: Shivsena : इकडे ठाकरे दसरा मेळाव्यासाठी न्यायालयात; तिकडे शिंदे गट राज्य पिंजून काढणार

हे पोस्टर पाहून आता राज्यभरात तेजस ठाकरेंच्या राजकारणातल्या एन्ट्रीची चर्चा सुरू आहे. दसरा मेळाव्याचा वाद, अस्तित्व टिकवण्याची लढाई आणि शिंदे गटावर कुरघोडी करणं, या सगळ्या गोंधळात ठाकरेंनी तेजस ठाकरेंना पुढे करणं एवढं महत्त्वाचं का आहे? आदित्य ठाकरेंपेक्षाही नवख्या तेजस ठाकरेंमुळे शिंदे गटातल्या मुरलेल्या नेत्यांना आणि राज्याच्या राजकारणाला, शिवाय पक्षाच्या अस्तित्वाला असा काय फरक पडेल? या काही प्रश्नांचा ठाव घेण्याचा प्रयत्न म्हणजे हा लेख.

हेही वाचा: Shivsena : शिंदेही नाही अन् ठाकरेही; दसरा मेळावाच रद्द होणार? निर्णय न्यायालय घेणार

तेजस ठाकरेंना आत्ता पुढे करण्यामागची काही प्रमुख कारणं आपल्याला सांगता येतील. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे ठाकरे नावाभोवतीचं वलय आणि सहानुभूती. शिवसेना म्हणजे ठाकरे हे समीकरण पाहिलेल्या महाराष्ट्रातल्या जनतेची सहानुभूती एवढ्या मोठ्या बंडानंतर अजूनही उद्धव ठाकरेंकडे असल्याचं पाहायला मिळतं. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांच्या बोलण्यात आजही बाळासाहेबांच्या लेकराला शिंदेंनी धोका दिला, अशाच चर्चा येताना दिसून येत आहेत. शिवाय, संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीपासूनच महाराष्ट्रावर ठाकरे नावाचं गारुड आहे. प्रबोधनकार ठाकरेंनंतर बाळासाहेबांनी ठाकरे या नावाला प्रसिद्धीच्या आणि प्रभावाच्या शिखरावर नेऊन ठेवलं. आपल्या शेवटच्या भाषणात बोलताना "माझ्या उद्धव आणि आदित्यला सांभाळा" हे बाळासाहेब ठाकरेंचं भावनिक आवाहन महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनात अजूनही कायम आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेने उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना जितक्या सहजपणे स्विकारलं आणि काहीही अनुभव नसताना आदित्य ठाकरेंना निवडून दिलं. ते पाहता तेजसलाही राजकारणात रुळायला फारसा वेळ लागणार नाही.

हेही वाचा: Shivsena : 'थेट मैदानात उतरून दसरा मेळावा घेऊ'; शिवसेना आक्रमक, प्रकरण कोर्टात जाणार?

दुसरा मुद्दा म्हणजे तेजस ठाकरेंचा नवखेपणाच त्यांची जमेची बाजू ठरणार आहे. संजय राऊत, प्रताप सरनाईक, भावना गवळी, यशवंत जाधव, अनिल परब, शिवसेनेच्या बहुतांश नेत्यांवर आता भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. मुख्यमंत्री पदी असतानाच्या 'वर्क फ्रॉम होम'मुळे उद्धव ठाकरेही फार काही गुड बुक्समध्ये नाहीत. आदित्य ठाकरेंच्या शिवसंवाद दौऱ्यामुळे तर त्यांच्यावर रोजच आरोप प्रत्यारोप होत आहेत. या सगळ्या रगाड्यामध्ये आता शिवसेनेला टिकायचं असेल, थेट जमिनीवर जाऊन, लोकांच्या मनात स्थान मिळवायचं असेल, तर त्यांना एखाद्या अगदी स्वच्छ चेहऱ्याची गरज आहे. आणि हा चेहरा तेजस ठाकरेंच्या रुपाने शिवसेनेला मिळणार आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray : दसरा मेळाव्यात ठाकरे परिवार हुकुमाचा एक्का बाहेर काढणार? नव्या पोस्टरची चर्चा

तिसरा मुद्दा म्हणजे तेजस ठाकरेंचं सुशिक्षित असणं. तेजस ठाकरे एक वन्यजीवप्रेमी आहेत. त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये केलेली कामगिरी कौतुकास्पद मानली जाते. यावेळी त्यांनी खेकड्यांच्या काही प्रजातीही शोधून काढल्या आहेत. यातल्या एका प्रजातीला ठाकरे हे नावही देण्यात आलं आहे. काही दुर्मिळ सापांच्या प्रजातीही त्याने शोधून काढल्या आहेत. तेजस क्रिकेटप्रेमीही आहे. स्थानिक तसंच राज्य पातळीवरच्या काही क्रिकेट सामन्यांमध्येही ते सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल तरुणांमध्ये एक प्रकारचं आकर्षण आहे. शिवाय, त्यांचं शिक्षण आणि कार्यामुळे सुशिक्षित तरुणवर्गही शिवसेनेकडे आकर्षित होण्याची शक्यता आहे. जवळपास सगळेच ज्येष्ठ नेते पक्षातून वेगळे झाल्याने आता शिवसेनेला आणि ठाकरेंना नव्या तरुणवर्गाची गरज आहे. नव्या काळाच्या आणि पिढीच्या नव्या संकल्पना पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी उपयोगी पडतील. या कामात तेजस ठाकरेंचा पक्षाला आणि पर्यायाने ठाकरेंना नक्कीच फायदा होईल.

चौथा मुद्दा म्हणजे ठाकरेंची परंपरा. उद्धव ठाकरेंचा राजकारणातला प्रवेश हाही दसरा मेळाव्याच्या दिवशीच झाला. शिवाय आदित्य ठाकरेही राजकारणात येण्यापूर्वी दसरा मेळाव्याच्या माध्यमातून बाळासाहेबांकडूनच त्यांची महाराष्ट्राला अधिकृत ओळख करून देण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या दसरा मेळाव्याच्या परंपरेसोबतच ठाकरे नवा चेहरा लाँच करण्याची परंपराही कायम राखण्याच्या प्रयत्नात असल्याचं स्पष्ट आहे.

आता या सगळ्या काहीशा तांत्रिक बाबींनंतर तेजस ठाकरेंसंदर्भातल्या एका भावनिक मुद्द्याचीही माहिती घेऊ. तेजस ठाकरेंच्या राजकारणातल्या प्रवेशाची चर्चा सुरू झाली आणि बाळासाहेब ठाकरेंचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला. काय म्हणाले होते यात बाळासाहेब ठाकरे? तेजस माझ्यासारखाच आहे, असं म्हणत बाळासाहेबांनी तेजस लहान असतानाच त्याच्या राजकीय प्रवेशाचे संकेत दिले होते. बाळासाहेब म्हणाले होते, "तो कडक डोक्याचा पोरगा आहे, माझ्यासारखाच आहे. मला जी आवड आहे, तीच आवड त्यालाही आहे. माझ्याप्रमाणेच त्यालाही प्राण्यांची आवड आहे. तो मला सांगत असतो, मला तुमची शिवसेना आवडत नाही. माझी स्वतःची सेना आहे. तोडफोड सेना. त्यानं स्वतःच नाव दिलंय आणि तो एकटाच आहे त्यात."

आता तेजस बाळासाहेबांसारखा आहे, ही या व्हिडीओतून अधोरेखित होणारी एकच गोष्टही तेजस ठाकरेंना राजकारणात पाय रोवायला पुरेशी आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यामुळे या तरुण चेहऱ्यामुळे शिवसेनेला चांगले दिवस येतील, पुनर्बांधणीसाठी मदत होईलच असं ठामपणे सांगता येणार नाही. शिवसेनेला सध्या सौम्य नेतृत्व नव्हे, तर एखाद्या आक्रमक चेहऱ्याची गरज आहे. बाळासाहेबांसारख्या असलेल्या तेजसच्या रुपाने तो चेहरा शिवसेनेला मिळण्याची शक्यता आहे. शिवाय शिंदे गटाकडे असं विशेष प्रभावी तरुण नेतृत्व अजूनतरी दिसत नाही. म्हणायला एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आहेत. मात्र त्यांच्या कार्याची चमक अद्याप राज्यात तरी दिसलेली नाही. शिवाय, त्यांची विशेष शैली अधोरेखित होईल, एवढा राज्याला त्यांचा परिचयही नाही. त्यामुळे तेजसला शह द्यायला श्रीकांत उभा राहील, ही शक्यता कितपत योग्य आहे, याबाबत शंकाच आहे. मात्र भविष्यात तेजस शिवसेनेला एकहाती यश मिळवून देऊ शकतो, अशी आशा सेनेने बाळगायला हरकत नाही. बाकी उद्धव ठाकरे आणि आदित्य यांनी आता कच खाऊ नये. तेजसला समोर आणण्यासोबतच आपलेही आत्ता सुरू असलेले प्रयत्न तसेच ठेवावेत, ही अपेक्षा.

Web Title: Tejas Thackeray Shivsena Uddhav Thackeray Aaditya Thackeray Balasaheb Thackeray Maharashtra Politics

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..